- अर्थनगरीतून… : महेश देशपांडे, आर्थिक घडामोडींचे अभ्यासक
दिवाळीचा जल्लोश उद्योग आणि व्यापारविश्वाच्या नभांगणामध्ये पहायला मिळत आहे. म्हणूनच दिवाळी आणि त्या सुमारचा काळ समोर धरुन विविध आर्थिक घडामोडींचा अदमास घेतला जात आहे. कदाचित म्हणूनच कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त थेट कार भेट देण्याच्या किंवा लक्षवेधी फंड्यांद्वारे रेस्टारंटमध्ये मोफत भोजन देण्याच्या योजना चर्चेत आहेत. लोक दिवाळीमध्ये मौजमजेसाठी पाकिट खाली करत असल्याचेही याच काळात दिसत आहे तर वाहनविक्रीचे आकडे आणि चहा व्यापारातल्या घडामोडी उद्योगांची स्थिती दाखवून देत आहेत.
दिवाळीच्या काळात अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना बोनस देतात. काही मालक कंपन्यांच्या नफ्यातला भाग देतात. सुरतचा एक हिरे व्यापारी आपल्या कर्मचाऱ्यांना कधी कार तर कधी फ्लॅट भेट देतो. आता अशाच एका मालकाने आपल्या कामगारांना कार भेट दिल्या आहेत. दिवाळी हा जसा दिव्यांचा सण असतो, तसाच तो आनंद वाटण्याचा सण आहे. या सणाचा उत्साह सर्वत्र असतो. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच कंपन्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू देत असतात. या सणाला कंपन्यांकडून मिळणाऱ्या भेटवस्तूंना नोकरदारांना एक विशेष महत्व असते. दिवाळीनिमित्त कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू, बोनस देत असतात. भारतात जवळपास बहुतांश कंपन्या दिवाळीनिमित्त फूल ना फुलाची पाकळी भेट देतात. हरियाणातील ‘एमआयटीएस हेल्थकेअर फार्मास्युटिकल कंपनी’ने आपल्या अनेक कर्मचार्यांना दिवाळी भेट म्हणून कार दिल्या आहेत. कंपनीने आपल्या१२ कर्मचार्यांना कार गिफ्ट केल्या आहेत. अर्थात सर्व कर्मचाऱ्यांना कार मिळालेल्या नाहीत. चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या भेटवस्तू मिळाल्या आहेत. आता कंपनी आणखी ३८ कर्मचाऱ्यांना कार देणार आहे. अशा प्रकारे औषध कंपनीच्या ५० कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून गाड्या मिळणार आहेत. या कंपनीचे मालक एम. के. भाटिया यांची कंपनी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेलिब्रिटीसारखे वागवते. मेहनती कर्मचाऱ्यांच्या जोरावरच कंपनी सध्याच्या स्थितीपर्यंत पोहोचू शकली आहे, असे भाटिया म्हणतात. त्यांच्या मेहनतीचे आणि निष्ठेचे फळ म्हणून या भेटवस्तू दिल्या जातात.
आता एक लक्षवेधी माहिती. जगातील अनेक देशांमध्ये अशी रेस्टॉरंट्स आहेत, जिथे भेट देणाऱ्या लोकांना उत्तम जेवण मोफत मिळते. भारतातही अशी व्यवस्था लवकरच पहायला मिळेल. निखिल कामथ यांनी या धाटणीच्या उपक्रमाची तयारी केली आहे. निखिलचे सहकारी रियाझ अमलानी हे इंप्रेसारियो एंटरटेनमेंट अँड हॉस्पिटॅलिटीचे संस्थापक आणि सीईओ आहेत. इंप्रेसारियो एंटरटेनमेंट अँड हॉस्पिटॅलिटी ही कंपनी सोशल, स्मोक हाऊस डेली आणि बॉस बर्गर सारखे फूड जॉइंट्स चालवते. कालरा फर्जी कॅफे, मसाला लायब्ररी आणि पा पा सारखे ब्रँड या संस्थेतर्फे चालवले जातात. निखिलची दुसरी सहकारी पूजा धिंग्रा ली १५ ब्रँडशी संबंधित आहे. स्पेनमध्ये छुपिटो बार आणि तपस बारमध्ये फक्त पेयाचे पैसे द्यावे लागतात. तिथे जेवण मोफत मिळते. असे प्रघात भारतातदेखील येऊ शकतात. फक्त वाय-फायसाठी पैसे द्या आणि मोफत जेवण मिळवा, अशी स्कीमही येऊ शकते.
आयटीसीसारखे सिगारेट ब्रँडदेखील रेस्टॉरंट आणि बारमध्ये जागा भाड्याने देऊ शकतात. या क्षेत्रात कार्यरत असलेले श्री. जोरावर यांनी अशा काही रेस्टॉरंट्सची उदाहरणेही दिली. त्यांच्या जागेत क्रोकरी आणि कटलरी विकून पैसे कमावले जातात. रेस्टॉरंटच्या भिंतींवर कला प्रदर्शनाद्वारे मालक पैसे कमवू शकतात. अमलानी यांनी सांगितले की आगामी काळात रेस्टॉरंटचे कामकाज टीव्हीसारखे असू शकते. जिथे जाहिराती या उत्पन्नाचा स्रोत असतील आणि लोकांना मोफत जेवण मिळेल. लोक रेस्टॉरंटमध्ये बराच वेळ घालवतात आणि तो वेळ त्यांना प्रभावित करण्यासाठी पुरेसा आहे. अशा परिस्थितीत, ब्रँड त्या वेळेचा वापर स्वत:साठी ग्राहक निर्माण करण्यासाठी अनेक मार्गांनी करू शकतात. हे एक मॉडेल आहे जे अशक्य नाही. त्यासाठी प्रयत्न करता येतील.
एव्हाना सणासुदीला सुरुवात झाली आहे. देशातील सर्वात मोठा सण दिवाळी आता समोर आहे. दिवाळीपूर्वी धनत्रयोदशीला लोक भरपूर खरेदी करतात. दरवर्षीप्रमाणे या वेळीही लोक खुलेआम खर्च करत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालात भारतीयांच्या खर्चाच्या पद्धतीची माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार, या सणासुदीच्या हंगामात लोक एसी, फ्रीजपासून लक्झरी वाहनांपर्यंत आणि घरासाठी आवश्यक नसलेल्या अनेक गोष्टींवर आपला पैसा खर्च करत आहेत. ‘अॅक्सिस माय इंडिया’ने भारतीय ग्राहक भावना निर्देशांकाची नवी आवृत्तीदेखील जारी केली आहे. निर्देशांकानुसार, भारतीय कुटुंबांच्या एकूण घरगुती खर्चात वाढ झाली आहे. अशा सुमारे ६० टक्के कुटुंबांमध्ये अनावश्यक आणि घरगुती वस्तूंवरील खर्च वाढला आहे. दिवाळीचा सण जसजसा जवळ आला, तसतसा लोकांनी खर्च करण्यात अधिक रस दाखवला आहे. या वेळी लोक ब्रँडेड कपडे आणि फॅशनजगताशी संबंधित वस्तू जास्त खरेदी करत आहेत. सणासुदीच्या खरेदीच्या बाबतीत फॅशन पहिल्या क्रमांकावर आली आहे. ६७ टक्के लोक फॅशन आणि कपड्यांवर खर्च करतात. या बाबींवर होणारा खर्च खूप वाढला आहे. अहवालानुसार, ४४ टक्के कुटुंबांचा वैयक्तिक काळजी आणि घरगुती वस्तूंसारख्या जीवनावश्यक बाबींवर होणारा खर्च वाढला आहे. हे गेल्या महिन्याच्या तुलनेत एक टक्क्याने अधिक आहे. दरम्यान, आठ टक्के कुटुंबांचा एसी, फ्रीज आणि कार या अत्यावश्यक वस्तूंवरचा खर्च वाढला आहे. त्याच वेळी ३७ टक्के कुटुंबांचा आरोग्य आणि अन्नाशी संबंधित गोष्टींवर होणारा खर्च वाढला आहे.
आता कानोसा वाहन विक्रीचा.‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल असोसिएशन(फाडा)’च्या अहवालानुसार, ऑक्टोबरच्या पहिल्या १५ दिवसांमध्ये श्राद्ध पक्षामुळे वाहनांची विक्री खूपच कमी होती आणि किरकोळ विक्रीमध्ये आठ टक्कयांची घट नोंदवलेली गेली. तथापि, यानंतर विक्री पुन्हा वाढली आणि ऑक्टोबरच्या उर्वरित १५ दिवसांमध्ये वाहनविक्रीमध्ये १३ टक्के वाढ नोंदवली गेली. सणासुदीच्या हंगामामुळे ऑक्टोबरमध्ये ऑटो क्षेत्रातल्या जवळपास सर्वच श्रेणींमध्ये वाढ झाली आहे. नवरात्रीच्या काळात दहा दिवसांमध्ये किरकोळ वाहनविक्रीने वार्षिक आधारावर १८ टक्के वाढ नोंदवली. याआधी २०१७ मध्ये नवरात्रीच्या काळात सर्वाधिक विक्रीचा विक्रम झाला होता, तो यंदा मोडला गेला. ‘फाडा’च्या अहवालात नमूद केले आहे की ऑक्टोबर महिन्यात ३.५३ लाख प्रवासी कार्सची विक्री झाली. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ३सस.५८ लाख प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. मारुतीने सर्वाधिक १.४५ लाख कार विकल्या. या महिन्यात कंपनीचा प्रवासी वाहन श्रेणीतील बाजारपेठेतील हिस्सा ४०.९७ टक्के आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कंपनीने १.४९ लाख कार विकल्या होत्या. तेव्हा तिचा बाजार हिस्सा ४१.७३ टक्के होता.
ऑक्टोबरमध्ये १५.०७ लाख दुचाकी विकल्या गेल्या. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये १७.२५ लाख दुचाकींची विक्री झाली होती. ऑक्टोबरमध्ये व्यावसायिक वाहनांच्या ८८ हजार ६९९ युनिट्सची विक्री झाली. ऑक्टोबर २०२२ मध्ये ८० हजार ४४६ व्यावसायिक वाहने विकली होती. तीनचाकी वाहन श्रेणीत सर्वाधिक वाढ दिसून आली. गेल्या महिन्यात ६२ हजार ४४० ट्रॅक्टरची विक्री झाली. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ५८ हजार ८२३ ट्रॅक्टरची विक्री झाली होती.
दरम्यान, चहा उत्पादकांची संघटना असलेल्या ‘टी असोसिएशन ऑफ इंडिया (टीएआय)’ ने म्हटले आहे की उत्तर बंगालचा चहा उद्योग गंभीर संकटातून जात आहे आणि या भागातील अनेक बागा बंद पडल्या आहेत. ‘टीएआय’चे सरचिटणीस पी. के भट्टाचार्य यांनी सांगितले की ऑक्टोबर २०२३ मध्ये उत्तर बंगालमध्ये चहाच्या १३-१४ बागा बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ११ हजारांहून अधिक लोक प्रभावित झाले होते. बागा बंद झाल्यामुळे चहाच्या उत्पादनावर परिणाम होणार असून त्यामुळे आगामी काळात चहाच्या पानांच्या किमती वाढणार आहेत. हिवाळ्यात चहाच्या पानांचा जास्त वापर होतो. त्यामुळे भाव वाढतात. या वर्षी एप्रिलमध्ये पश्चिम बंगाल सरकारने जाहीर केलेल्या अंतरिम वेतनवाढीमुळे संघटित आणि लहान चहाच्या कारखान्यांसह सुमारे ३०० बागांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचे ‘टी असोसिएशन ऑफ इंडिया’ने म्हटले आहे. या भागात दर वर्षी सुमारे ४० कोटी किलो चहाचे उत्पादन होते. भट्टाचार्य यांच्या म्हणण्यानुसार, उत्तर बंगालमध्ये चहाच्या जवळपास ३०० बागा आहेत. त्यापैकी १५ बंद आहेत. ‘टी असोसिएशन ऑफ इंडिया’ने सांगितले की उद्योगाला लागणारी खते, कोळसा आणि रसायनांच्या उत्पादन खर्चात अचानक वाढ होत आहे तर लिलावात अत्यंत कमी किमती मिळतात. आर्थिक संकट कमी करण्यासाठी उद्योगाने पश्चिम बंगाल सरकारशी आधीच चर्चा केली आहे.