हास्यजत्रा सोडलेला ओंकार भोजने पुन्हा करणार एन्ट्री?
मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) हा विनोदी प्रहसनांचा (Comedy skits) कार्यक्रम सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. यातील कलाकारांच्या विनोदाचं अचूक टायमिंग, नवनवीन विषय व ते हाताळताना प्रेक्षकांना हसवण्याची पद्धत यांमुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. यातील प्रत्येक कलाकाराने जी वेगवेगळी पात्रं रंगवली आहेत, तीदेखील प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. यामध्ये नम्रता संभेरावची (Namrata Sambherao) लॉली असो, प्रसाद खांडेकरचा (Prasad Khandekar) स्लोमॅन, समीर चौघुलेचा (Samir Choughule) सुमारिया चौघुलिया किंवा लोचन मजनू अशी अनेक पात्रे प्रेक्षकांना खळखळून हसवतात.
याच हास्यजत्रेतून प्रसिद्धी मिळालेला कलाकार म्हणजे ओंकार भोजने (Onkar Bhojane). ओंकारने काही महिन्यांपूर्वी हास्यजत्रा सोडली होती. तो पुन्हा येणार नाही अशी चर्चा असल्याने प्रेक्षकांची चांगलीच निराशा झाली होती. ओंकारचं अगं अगं आई हे स्किट असो, किंवा वायरमॅन तात्या, किंवा वनिता खरातसोबत मामा मामीचं स्किट अशी ओंकारची सर्वच पात्रं प्रेक्षकांना आवडत असताना त्याने असा का ब्रेक घेतला असा प्रश्न पडला होता.
दरम्यान, ओंकारचे ‘सरला एक कोटी’ व ‘बॉईज ४’ असे दोन चित्रपट आले. या चित्रपटांच्या शूटिंगमुळेच हास्यजत्रेतून ब्रेक घ्यावा लागला असं त्याने स्पष्ट केलं आहे. यानंतर तो पुन्हा एकदा हास्यजत्रेतून प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज आहे. त्याच्या नव्या स्किटचा प्रोमो आला असून यात ओंकार ‘माझं असंच आहे, मला वाटलं तर मी येतो, नाही तर मी येत नाही…’ असा एक डायलॉग म्हणतो आणि त्यावर सगळे खूप हसतात. म्हणजेच ओंकारची एन्ट्री होणार हे आता स्पष्ट झाले आहे.
ओंकार भोजने याविषयी सांगतो की, ‘सगळं छान सुरु होतं, पण मला पुढे दोन चित्रपटांसाठी थांबायचं होतं. त्यांना पण अॅडजेस्टमेंट करावी लागणार होती. माझ्या प्रकृतीच्या पण काही तक्रारी होत्या. तेव्हा सुट्टी घेतली ती कायमचीच. नंतर मी फू बाई फू मध्ये काम केलं. मी या सगळ्यामधून शिकत आहे.’ ओंकार भोजने आता हास्यजत्रेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.