Saturday, October 18, 2025
Happy Diwali

पेण वाशीनाका येथे बिबट्याची कातडी जप्त

पेण वाशीनाका येथे बिबट्याची कातडी जप्त

वन विभागाची मोठी कारवाई

पेण : मुंबई-गोवा महामार्गावरील पेण उंबर्डे फाट्याच्या दक्षिणेकडे वाशीनाका येथे असलेल्या म्हात्रे चाळीत वन्य प्राण्यांच्या कातडीची विक्री होणार असल्याची गुप्त माहिती अलिबाग वनविभाग पथकाला मिळाली होती. त्यानुसार माहितीच्या आधारे वन अधिकारी व पेण वन विभाग कर्मचाऱ्यांनी वेगवेगळे पथक करून सायंकाळी ५ वाजता त्याठिकाणी सापळा रचून आरोपीचा पाठलाग करत बिबट्याचे सुकलेले कातडे व एक मोटार सायकल जप्त केली. परंतु सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी फरार झाला असून त्यांचा कसून शोध सुरू आहे.

सदर कारवाई ही अलिबाग वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील (भा.व.से.) आणि डब्ल्यू सीसीबीचे उपसंचालक योगेश वरकड यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक वनसंरक्षक अलिबाग गायत्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग वन विभाग व डब्ल्यू सीसीबी, डब्ल्यूआर नवी मुंबई यांनी संयुक्तरीत्या केली असून यावेळी पेण वनक्षेत्रातील वनपाल, वनरक्षक व फिरते पथक आदि सहभागी होते.

या वन्य प्राणी तस्करीसह त्याची कातडी विक्री प्रकरणी वन विभागाकडून सखोल तपास केला जात आहे. वन्य प्राण्यांची शिकार करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. या गुन्ह्यात आरोपींना तीन ते सात वर्षाचा सक्षम कारावासाची शिक्षा होते. त्यामुळे नागरिकांनी अंधश्रद्धा व अमिषांना बळी पडू नये. तसेच वन्य प्राण्यांच्या तस्करी करणाऱ्यांची माहिती मिळाल्यास ती वन विभागाकडे द्यावी. संबंधित व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाईल. - गायत्री पाटील - सहाय्यक वनसंरक्षक, अलिबाग, रायगड

Comments
Add Comment