कितीही आपत्ती आल्या आणि सामाजिक वातावरण अशांततेने घुसळून निघाले असले, विषमतेने उच्चांक गाठला असला तरीही दीपावलीच्या मंगलमय सणाचे महत्त्व विलक्षण आहे. गणशोत्सवाप्रमाणेच हा सण देखील मने चैतन्याने ओसंडून भरणारा आहे आणि कसलेही कर्मकांड आणि सोवळे-ओवळे यांचे अवडंबर नसलेला आहे. दीपावलीच्या निमित्ताने आता सर्वत्र नवीन कपडे, फटाके, फराळ वगैरेंची रेलचेल सुरू होईल आणि सारी मने चैतन्याने ओसंडून वाहतील. दीपावली अंकांनी बाजारपेठ भरून राहील. सामाजिक परिस्थिती कितीही तणावपूर्ण असली तरीही दीपावलीच्या आगमनाने वातावरणात आणि मनामनात चैतन्य भरून वाहते. नेहमीच्या बेरोजगारी आणि महागाई या समस्यांना विसरून लोकांना आनंदात मन भरून सहभाग घ्यायला लावणारा हा सण आहे. दीपावलीच्या सणानिमित्ताने लोकांची मने अनावर उत्साहाने खळखळून येत असतात. एका अर्थाने दीपावली हा सणही अर्थव्यवस्थेला नव चैतन्य प्रदान करणारा असतो. बाजारपेठा नव्या वस्तूंच्या आगमनाने तुडुंब भरलेल्या असतात आणि लोकांकडे अल्प का होईना पण तुटपुंज्या अशा क्रयशक्तीने नवीन खरेदी करण्याचा उत्साह असतो. खरेदी होते, बाजारपेठांत तर पाऊल ठेवायलाही जागा उरत नाही. कितीची उलाढाल होते, हा आकडा गुलदस्त्यात राहिला तरीही सर्वांना सुखाची एक झलक पाहायला मिळतेच. महाराष्ट्रात यंदा एक मोठ्या प्रमाणावर सामाजिक घुसळण सुरू झाली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाने राज्यातील सामाजिक वातावरण पार ढवळून निघाले. तणाव सर्वत्र होता. पण आता सारे काही तात्पुरते का होईना पण शांत झाले आहे. त्यामुळे दीपावलीचे तेच जुने चैतन्य लोटल्यासारखे वाटत आहे. दीपावली हा खरोखर केवळ आनंदाचा सण आहे. धनाढ्यांच्या महालांमध्ये जसा त्याचा प्रकाश पसरतो तसाच तो गरिबांच्या झोपड्यात पसरतो. खरे तर हा प्रकाशाचा सण आहे. अंधारावर प्रकाशाने मात केल्याचा हा सण आहे. त्यामुळे सर्वत्र दीपोत्सव साजरा केला जातो. दीपावली हा सणही केवळ भारतात नव्हे तर जेथे म्हणून भारतीय मन असते, तेथे हा सण साजरा होतो. परदेशात तर जास्तच उत्साहाने दीपावली साजरी केली जाते. पण यंदा मात्र दीपावलीवर अशांत सामाजिक परिस्थितीचे आरक्षण आंदोलनाने वेगवगेळ्या समाजाची मने एकमेकांविरोधात कलुषित झाली आहेत. त्यातच जागतिक युद्धाचे सावट या दीपावलीवर आहेच. अर्थात भारतात त्याचे काहीही परिणाम अजून दृष्टिपथात आलेले नाहीत. पण कुठेतरी क्षितीजावर युद्धाचे ढग घोंघावत आहेत. या परिस्थितीत दीपावलीचे आगमन झाले आहे. दीपावली साजरी करण्याची ही अनुकूल स्थिती नसली तरीही या याच विनाशातून उद्याच्या उज्ज्वल भवितव्याचे अंकुर फुटणार आहेत. त्यामुळे दीपावलीचे चैतन्य आले आहे आणि त्याचे मनापासून स्वागत करायला हवे.
फटाक्यांच्या आतषबाजीविरोधात सारे पुरोगामी चढाओढीने घसा ताणून बोलत असतात. केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळेसच प्रदूषणाच्या संदर्भात कठोर भूमिका घेतली जाते, हे दुर्दैव आहे. पण अन्य धर्मीयांकडून जेव्हा जनावरांची कत्तल केली जाते तेव्हा पुरोगामी कुठे दडून बसलेले असतात, हा संशोधनाचा विषय आहे. बहुसंख्य हिंदू धर्मासाठी पक्षपाती भूमिका दुर्दैवी आहे. प्रदूषण आहे हे तर सत्य आहेच. पण प्रदूषणाबाबत केवळ हिंदूंनाच सदोदित उपदेशाचे डोस पाजत राहाणे कारण ते सहिष्णू आहेत म्हणून, ही भूमिका कुणीही घेतली तरीही ती स्वीकारार्ह नाहीच. हा देश हिंदूंचा आहे तरीही केवळ हिंदूंच्या सणानिमित्ताने प्रदूषण आणि इतर सारे मुद्दे उपस्थित होत असतात. अशी निवडक भूमिका घेण्याने एका मोठ्या समाजाला मात्र लक्ष्य केले जाते. पंजाब आणि हरियाणा या राज्यांना शपराली जाळू नयेत असे निर्देश दिले आहेत. हिंदू सणाच्या वेळेस ‘आवाज फाऊंडेशन’ ही संस्था सक्रिय होत असते. पण पंजाब आणि हरियाणा राज्यांना पराली जाळण्यापासून परावृत्त करण्यासाठी कडक निर्देश दिले जात नाहीत. दीपावली साजरी करताना बिन आवाजाचे आणि धूर न होणारे फटाके वाजवून ती साजरी केली पाहिजे, याचे भान जेव्हा सर्वांना येईल तेव्हाच दीपावली साजरी करण्याचे सार्थक झाले असे म्हणता येईल. दीपावलीला धार्मिक महत्त्वही आहेच. हा दिव्यांचा सण आणि प्रकाशाने अंधारावर मात करण्याचा सण आहेच. पण नरकासुराचा वध केला म्हणून नरक चतुर्दशी साजरी केली जाते. म्हणजे असुरांचा वध करणारा हा सण आहे. आपल्यातील वाईट आणि अमंगल विचारांच्या असुरांचा वध करून मंगलमय विचार धारण करण्याचा हा सण आहे. दीपावली साजरी करण्याची परिस्थिती आहे का, हा प्रश्न आपल्या मनाशीच विचारला तर असे उत्तर येते की अमंगल विचारांचा वध करून सर्वांच्या कल्याणाचा विचार करणारा हा सण आहे. त्यामुळे तो साजरा केलाच पाहिजे. नवकोट नारायणांपासून ते शेवटच्या पायरीवर असलेल्या गरिबांपर्यंत सर्वजण तो तितक्याच आनंदाने साजरा करतात. दहीहंडी असो, दिवाळी असो किंवा दसरा, फटाके पेटवण्यावर न्यायालयाचे अगोदर निर्बंध येत असतात. राज्यातील सामाजिक परिस्थिती आणि गरिबीचे भान राज्य सरकारला असल्यानेच ‘आनंदाचा शिधा’ ही अभिनव कल्पना घेऊन शिंदे सरकार पुढे आले आहे. धनाढ्यांच्या महालात जर फराळाची रेलचेल असेल तर गरिबांच्या झोपडीतही प्रकाश असावा, याच हेतूने शिंदे सरकारने ही कल्पना राबवली आहे आणि त्यातून आनंदाचा शिधा ही मोठी योजना लोकप्रिय झाली आहे. दीपावली साजरी सर्वांनीच केली पाहिजे, या विचारातूनच आनंदाची शिधा ही कल्पना घराघरांत दीपावलीचा आनंद पसरवत आहे. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यापूर्वी हा एक शेर.
सभी के दीप सुंदर है तुम्हारे क्या हमारे क्या…
उजाला हर तरफ है इस किनारे क्या उस किनारे क्या…