डेहराडून : उत्तराखंडमध्ये आज बांधकामाधीन इमारतीचा काही भाग कोसळल्याने अनेक कामगार बोगद्यात अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हा बोगदा उत्तराखंडच्या उत्तरकाशीमधील सिल्क्यरा ते दंडलगावला जोडणार आहे. हे चार धाम रोड प्रकल्पांतर्गत बांधले जात आहे आणि उत्तरकाशी ते यमुनोत्री धाम हा प्रवास २६ किलोमीटरने कमी करण्याचे उद्दिष्ट आहे.
पोलिसांनी सांगितले की, साडेचार किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा १५० मीटर लांबीचा भाग कोसळल्याने पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आणि उत्तरकाशीचे पोलीस अधीक्षक अर्पण यदुवंशी घटनास्थळी पोहोचले.
राज्य आपत्ती निवारण दल (एसडीआरएफ) आणि पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४० कामगार अडकल्याची भीती आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी सुमारे २०० मीटर स्लॅब साफ करावा लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बोगद्यात ऑक्सिजन पाईप टाकण्यासाठी आणि अडकलेल्या मजुरांना मदत करण्यासाठी एक अरुंद ओपनिंग करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, “मला घटनेची माहिती मिळाल्यापासून मी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ घटनास्थळी आहेत. आम्ही प्रत्येकाच्या सुखरूप परतण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो.”