मायभाषा : डॉ. वीणा सानेकर
दिवे लागले रे दिवे लागले,
तमाच्या तळाशी दिवे लागले…”
दीपवालीच्या पर्वानिमित्ताने मला शंकर रामाणी यांची कविता आठवली. गायिका पद्मजा फेणाणी यांनी अप्रतिम गायलेलं हे गीत! मुळात अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याची आस हा आपल्या संस्कृतीचा गाभा आहे. जिथे-जिथे अंधार आहे, तो दूर करण्याकरता दीप प्रज्ज्वलित करणे या कृतीचे मोल आपल्या संतांनीही समाजमनावर बिंबवले आहे.
आज सर्वत्र पाश्चात्त्य परंपरेनुसार केक कापून वाढदिवस साजरा करणे, तो साजरा करताना मेणबत्या विझवणे अशी आधुनिक प्रथा सुरू झाली आहे. मात्र लागलेला दिवा विझवणे ही आपली संस्कृती नाही. अंधार दूर व्हावा म्हणून ज्योत तेवत ठेवणे ही आमची परंपरा आहे.
दिवेलागण, दिवेलागणीची वेल, दिव्यांचा सण, विशेष अतिथींच्या स्वागतासाठी दिव्यांची पंचारती, गावाकडच्या कौलारू घरातल्या कोनाड्यातील मंद दिव्यांची वात या सर्वच गोष्टींना आमच्याकडे मोठे महत्त्व आहे.
लोकसाहित्यात कथा आणि गीतांच्या माध्यमातून सणांचे मनोहर दर्शन घडते. ओवीगीतांमधून किंवा स्त्रीगीतांमधूनदेखील उत्सव, परंपरा यांची लोभस चित्रे उमटली आहेत. सासरी नांदणारी एक सई दिवाळसणाला माहेरी जाऊ इच्छिते. ती म्हणते,
“वर्षा वर्षा दिवाळी, माणिकमोती ओवाळी
दिवाळीच्या सनाला, बंधू आल्याती न्हीयाला
धाडा धाडा, जाते म्हायेराला…,
घेऊन आला तो बघ गाडी
जुंपून आणली खिलारी जोडी,
भेटेन मी आईला, माझ्या त्या बापाला
धाडा धाडा, जाते म्हायेराला……”
वर्षाचा सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी! यानिमित्ताने माहेरी जावसं वाटणं, त्याकरिता भावाने थाटामाटात घेऊन जाणं या सर्व तिच्या मनीच्या स्वाभाविक इच्छा आहेत. त्या भावपूर्ण गीतांमधून व्यक्त झाल्या आहेत.
आपल्या संस्कृतीत ऋतुचक्राशी जोडून सण-उत्सव आनंदाने साजरे केले जातात. प्रत्येक सणामागे काही ना काही कथा असते. नि एकच असते असंही नाही. कितीतरी कथा हातात हात घालून एकत्र नांदतात. दिव्यांच्या सणाच्या तर प्रत्येक दिवसाच्या एकेक गोष्टी आहेत.
एक मात्र खरं, दिव्यांचा सण आशा पल्लवित करतो. आळस झटकून ऊर्जा नि चैतन्य रुजवतो. निराशा, वैफल्य, एकटेपण या सर्वांतून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे अंतर्यामी दीप तेवत ठेवणे. सूर्य पूर्व दिशेला अधिष्ठित होऊन जगाला प्रकाशाची जाणीव देतो आहे. तसा ज्ञानाचा दीप अंत:करणात अखंड तेवत राहू दे.
संत ज्ञानदेवांचे हे शब्द किती प्रेरक आहेत. ज्ञानेश्वरांनी ज्ञानाची दिवाळी, विवेकाची दिवाळी शब्दांतून उभी केली. अविवेकाची काजळी पुसण्याकरता नि अज्ञानाचा अंध:कार सरण्याकरिता ज्ञानदेवांनी उभी केलेली दिवाळीच निरंतर मार्ग दाखवेल.
“सूर्ये अधिष्ठिली प्राची, जगा जाणीव दे प्रकाशाची
तैसी श्रोतया ज्ञानाची, दिवाळी करी……
मी अविवेकाची काजळी, फेडोनि विवेक दीप उजळी
ते योगिया पाहे दिवाळी निरंतर……”