स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर
राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाला पुन्हा सत्ता मिळवायची असेल, तर वसुंधरा राजे यांना दुर्लक्ष करून चालणार नाही. राजस्थानच्या दोन वेळा मुख्यमंत्री झालेल्या वसुंधरा राजे यांचे जनमानसातील स्थान मोठे आहे. एकीकडे राजघराण्याचा वारसा आहे आणि दुसरीकडे अगोदर भारतीय जनसंघ व नंतरच्या भारतीय जनता पक्षाशी राजकीय नाळ जोडलेली आहे. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणींपासून अनेक बड्या नेत्यांचा वसुंधरा राजे यांच्या कुटुंबीयांवर पक्षाचा आशीर्वाद आहे.
वसुंधरा राजे या सन २००३ मध्ये पुरुषप्रधान राज्य असलेल्या राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या. त्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे १२० आमदार निवडून आले होते. वसुंधरा राजे या महिला म्हणून व त्यांची ऐषआरामी जीवन पद्धती ऐकून त्यांच्यावर विरोधी पक्षांतून सडकून टीका झाली होती. पोलो खेळणारी महिला अशी टीका त्यांच्यावर होत असे. आमदार म्हणून निवडून आल्यावर व मुख्यमंत्री झाल्यावर त्यांचे अभिनंदन करायला चोहोबाजूंनी लोकांच्या झुंडीच्या झुंडी येत होत्या. महिलांची संख्या लक्षणीय होती. तेव्हा त्या टीकाकारांना म्हणाल्या, बघा माझ्यावर इथल्या लोकांचे किती प्रेम आहे…
वसुंधरा राजे हे राजकारणातील एकदम वेगळे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात राजघराण्याचे तेज आहे. पण दुसरीकडे सर्वसामान्य जनतेला व महिलांना आपलेसे करण्याचे त्यांच्याकडे कौशल्य आहे. त्या सफाईदारपणे इंग्रजी बोलू शकतात, त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील महिलांचा सहजपणे विश्वास संपादन करू शकतात. त्या आपल्या भूमिकेवर नेहमी ठाम असतात. पक्षातही भल्याभल्या नेत्यांना विरोध करण्याचे धारिष्ट्य त्यांनी अनेकदा दाखवले आहे. त्यांचा पक्षात दरारा आहेच, पण भीतीयुक्त आदरही आहे.
दोन वेळा मुख्यमंत्री झालेल्या वसुंधरा राजे यांनी दोन टर्म पू्र्ण काळ सत्ता उपभोगली. दोन टर्म पूर्णवेळ मुख्यमंत्रीपदावर राहणे हे राजस्थानसारख्या राज्यात कोणा महिलेला सोपे नाही. ‘जाट बहूं’ म्हणून त्यांचा राजस्थानात सर्वत्र आदर केला जातो. एकेकाळी हायकमांडच्या परिघात असलेल्या विजया राजे-शिंदे यांच्या वसुंधरा या कन्या. हिंदी भाषिक राज्यात विजया राजे यांना विरोधी पक्षात व सामान्य जनतेतही आदराचे स्थान होते. ते स्थान वसुंधरा राजे यांनी मिळवले आहे. राजस्थानमध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या पहिल्या यादीत वसुंधरा समर्थकांची कोणाचीच नावे नव्हती, त्यानंतर पक्षात खदखद वाढलेली बघायला मिळाली. वसुंधरा राजे यांचे कट्टर समर्थक नरपतसिंग रजवी हे सन २००८ पासून सतत विद्याधर नागर मतदारसंघातून विधानसभेवर विजयी होत आहेत, पण त्यांना उमेदवारी नाकारून पक्षाने राजसमंदच्या खासदार दिव्या कुमारी यांची त्यांच्या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. दुसऱ्या यादीत मात्र रजवीसह वसुंधरा राजेंच्या बहुतेक समर्थकांना पक्षाने तिकिटे दिली. स्वत: वसुंधरा राजे या झालरपाटण येथून निवडणूक लढवत आहेत.
आपल्याला काही मिळावे म्हणून वसुंधरा राजे पक्षाकडे काही मागणार नाहीत, पण आपल्या मनाविरोधात घडले, तर नाराजी व्यक्त करायला कमी करणार नाहीत. पक्षात आपल्याला बाजूला सारले जात आहे, तसे काही प्रमाणात त्यांच्याबाबत घडले. निवडणुकीच्या अगोदर भाजपाने राजस्थानात परिवर्तन संकल्प यात्रा काढली होती. सर्वत्र लावलेल्या पोस्टर्सवर भाजपाच्या प्रदेश व स्थानिक पातळीवरील नेत्यांचे फोटो झळकत होते. पण माजी मुख्यमंत्री असलेल्या वसुंधरा राजेंचा फोटो अशी पोस्टर्सवर कुठेच नव्हता. हे कोणी मुद्दाम केले की कुणी कोणाच्या सांगण्यावरून केले? या परिवर्तन यात्रेत वसुंधरा राजे सहभागी झाल्या नाहीत, त्याचीच चर्चा मोठी झाली.
झालरपाटण हा त्यांचा मतदारसंघ त्यांच्याशी वर्षानुवर्षे जोडलेला आहे. १९८४ मध्ये त्यांची भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर सदस्य म्हणून नेमणूक झाली, तेव्हापासून त्यांनी कधी मागे वळून बघितले नाही. १९८५ मध्ये त्या भाजपाच्या राजस्थानच्या युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष होत्या. १९९९ पासून त्या सतत लोकसभेवर भाजपाच्या खासदार म्हणून निवडून आल्या. केंद्रात परराष्ट्रमंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी संभाळली. भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही त्यांना बहुमान मिळाला. २००३ नंतर २०१३ मध्ये त्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या. त्यांचा जन्म मुंबईचा. शिक्षण मुंबईतील सोफिया कॉलेज फॉर वुमेन्समधून झाले. अर्थशास्त्र व राजनिती या विषयात त्यांनी पदवी प्राप्त केली. ग्वाल्हेरचे महाराजा जीवाजीराव शिंदे यांच्या त्या कन्या. विजया राजे या त्यांच्या मातोश्री. यशोधरा राजे या त्यांच्या भगिगी. उद्योगपती ललित मोदी यांना मदत केल्यावरून त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. सन २०१४ मध्ये जसवंत सिंह यांच्या बाडनेर मतदारसंघात काँग्रेसमधून आलेल्या कर्नल सोनाराम यांना पक्षाचे तिकीट त्यांनी मिळवून दिले म्हणून जसवंत सिंग यांनी भाजपा सोडण्याचा निर्णय घेतला होता. तरीही वसुंधरा राजे यांचे राजस्थानातील स्थान हे त्यांच्या विरोधकांनाही मान्य करावेच लागते.
संसदेने लोकसभा व विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक नुकतेच मंजूर केले. पण आजवर देशाच्या राजकारणात राजकीय पक्षांनी महिलांना फारसा सन्मान दिलेला नाही किंवा सर्वोच्च पदांवर नेमणूक करतानाही महिलांना फारशी संधी दिलेली नाही. भाजपाने द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती केले व यापूर्वी काँग्रेसने प्रतिभाताई पाटील यांना या सर्वोच्च पदावर बसवले होते. पण महिलांना लोकसंख्येच्या तुलनेने अधिकाराची व सन्मानाची पदे दिली जात नाहीत हे वास्तव आहे. भाजपाने सुषमा स्वराज यांना १९९८ मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री केले होते. लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या म्हणून त्यांची कारकिर्द गाजली होती. काँग्रेसप्रणीत २००९ ते २०१४ या यूपीएच्या काळात सरकारला धडकी भरविण्याचे काम सुषमा यांनी केले. मोदी सरकारच्या काळात सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. ट्विटर फ्रेंडली केंद्रीय मंत्री अशी त्यांची प्रतिमा होती.
भाजपाच्या फायरब्रँड नेत्या साध्वी उमा भारती यांनी हिंदुत्वाचा प्रचार करून पक्षाला मतांचा ओघ मिळवून दिला, तेव्हा उमा भारती (आज योगी आदित्यनाथ) हा भाजपाचा हिंदुत्वाचा चेहरा होता. तेव्हा उमा भारती यांचा उल्लेख साध्वी संन्यासीन असा केला जात होता. आज तसा उल्लेख खासदार साध्वी प्रज्ञा यांच्या संदर्भात केला जातो. उमा भारती या मध्य प्रदेशच्या २००३- २००४ मध्ये मुख्यमंत्री होत्या. पण आता त्या कुठे आहेत ते शोधावे लागते. गेल्या काही वर्षांत प्रादेशिक पातळीवर एकही महिला चेहरा काँग्रेस किंवा भाजपाच्या प्रकाशझोतात नाही, हे वास्तव आहे.
काँग्रेसमध्ये इंदिरा गांधी या सर्वाधिक शक्तिशाली काँग्रेस अध्यक्ष होत्या, तसेच ताकदवान पंतप्रधान होत्या. इंदिरा गांधी या देशाच्या एकमेव महिला पंतप्रधान झाल्या. आज कोणत्याही पक्षाकडे पंतप्रधानपदासाठी महिला चेहरा नाही. काँग्रेसने दिल्लीत चमत्कार घडवून दाखवला. काँग्रेसने शीला दीक्षित यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर सलग तीन टर्म बसवले. त्यांच्या काळात दिल्लीत मेट्रोपासून असंख्य विकासकामांना कमालीचा वेग आला. पण नंतर काँग्रेसला सत्ता टिकवता आली नाही. अरविंद केजरीवाल हे काँग्रेस व भाजपा या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना दिल्लीत भारी पडले.
मेहबुबा मुफ्ती, मायावती आणि जयललिता या तीन महिला मुख्यमंत्री अनुक्रमे जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश व तामिळनाडूमध्ये झाल्या. राज्यात काम करीत असताना तिघींनी आपल्या कामाचा ठसा देशपातळीवर उमटवला. पण या तिघींच्या पाठीशी अनुक्रमे मुफ्ती मोहंमद सईद, काशीराम आणि एम. जी. रामचंद्रन हे त्यांचे मेंटॉर होते. पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी या एकमेव मुख्यमंत्री आहेत की, त्या स्वत:च्या कर्तबगारीवर व स्वत:च्या हिमतीवर राज्याच्या सर्वोच्च पदावर बसल्या आहेत. त्यांनी काँग्रेस व डावे पक्ष या राज्यात संकुचित करण्याचा पराक्रम करून दाखवला.
२०१८ मध्ये राजस्थानात विधानसभा निवडणुकीत झालेल्या भाजपाच्या पराभवानंतर वसुंधरा राजे यांच्याकडे बोट दाखवले गेले. ‘मोदी तुझ सें बैर नही, वसुंधरा तेरी खैर नहीं…’ अशा घोषणा तेव्हा दिल्या गेल्या… आता वसुंधरा राजे यांना भाजपा सत्तेच्या राजकारणात किती महत्त्व देणार हे ५ डिसेंबरनंतर कळेल.