दृष्टिक्षेप : अनघा निकम-मगदूम
दिवसानंतर रात्र आणि रात्रीनंतर दिवस हे कालचक्र आहे. ऊर्जा आणि अंधकार याचे हे गणित आहे. हे ब्रह्मांड अगणित सूर्य, तारे, ग्रह यांचे अवकाश आहे. इथे स्वऊर्जित आणि परप्रकाशी सुद्धा आहेत. या निर्वात पोकळीत असणारे हजारो सूर्य दररोज ऊर्जा निर्माण करत असतात. हा प्रकाशाचा खेळ पृथ्वी नावाच्या एका ग्रहावरील संवेदना असलेल्या मनुष्य या प्राण्यावर खूप परीणाम करतो. सूर्य उजाडला की, इथे नवा दिवस उजाडतो, तर सूर्य मावळला कि दिवस संपून जातो. इथल्या मनुष्यांच्या भाव-भावनांचे सुद्धा असेच आहे. कधी उत्साहाचा आनंदाचा ऊर्जेचा दिवस त्याच्या आयुष्यात येतो, तर कधी पराभवाचे निराशेची काळोखी रात्र त्याला अनुभवावी लागते.
निर्सग सर्वानुरूप या मानवाशी जोडलेला आहे. जसा तो मानवाशी जोडला गेला आहे, तसा तो मनुष्याच्या विशेषतः हिंदू धर्मातील सण उत्सवांशी सुद्धा जोडला गेलेला आहेच.
दिवाळीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. वसुबारस या दिवशी पशु-प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. मनुष्याचे आरोग्य उत्तम राखणाऱ्या धन्वंतरीला नमन करून आयुष्यात धनाची कमतरता होऊ नये यासाठी धनत्रयोदशी साजरी करण्यात आली, तर आज नकारात्मकतेवर मात करत दिवाळी पहाट उजाडली आहे. संध्याकाळी लक्ष्मी पूजन होणार आहे. केवळ धनासाठी नाही तर आयुष्याच्या स्थैर्यासाठी; लक्ष्मीदेवी प्रसन्न व्हावी अशी अपेक्षा यातून व्यक्त केली जाते. पशुविषयी प्रेम, उत्तम आरोग्य, धनधान्य संपत्ती सोबतच नातेसंबंधाची श्रीमंती जपणारा पाडवा आणि भाऊबीज असे सगळे सण या दिवाळीमध्ये साजरे होतात. असा हा सण आपण साजरा करत आहोत.
खरच दीपावली हा ऐश्वर्य, समृद्धी, धन, धान्य आणि धेनू या संपत्तीची पूजा करायचा दिवस. दिव्यांचा, प्रकाशाचा, ज्ञानाचा, पराक्रमाचा, आरोग्याचा, धन-धान्य-धेनूंचा, ऐश्वर्य आणि समृद्धीचा, कारुण्य बाणण्याचा आणि दानाची लालसा धरण्याचा सण म्हणजे दीपावली! दीपावली म्हणजे दिव्यांचा उत्सव! प्रकाशाचा सण! दीपावलीचा सण म्हणजे चैतन्य.
दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृतमधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली. ‘दीप’ म्हणजे ‘दिवा’ आणि ‘आवली’ म्हणजेच ‘ओळ’. याचा संपूर्ण अर्थ पाहिला, तर दिव्यांची एका ओळीत केलेली रचना अर्थात दिवाळी. अनेक परंपरा, कथा या सणाशी जोडल्या गेल्या आहेत. त्याची माहिती आपल्याला माहिती आहेच. पण या सर्वांमध्ये दिवाळी हा सण प्रकाशाचा आहे. प्रकाश, ऊर्जा जी आपल्याला जगण्याचे बळ देते तीच ऊर्जा या दिवसांमध्ये आपल्यासमोर असते.
दिवाळी येते त्यावेळी दिवस कमी होऊन रात्रीचा प्रहर वाढलेला असतो. थंडी अंग शहारून टाकते. परिसर गोठून गेलेला असतो. अशा अंधारलेल्या वातावरणात मिळणारी ऊर्जा उत्साह वाढवते.
हे सगळ सणांबद्दल झाल. पण आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यामध्ये आपल्यासमोर अनेक वाईट, परीक्षा घेणारे, नात्यांना अडचणीत आणणारे क्षण येत असतात. कटुता वाढत असते. सामाजिक क्षेत्रात समोर काय घडतंय हेच समजत नाही. कसं वागायचं समजत नाही, अशी परिस्थिती उभी राहते. कोणत्याही क्षेत्रातील स्पर्धा ही शेवटी वैयक्तिक अकसाकडे घेऊन जाते. त्यातून दोन्ही बाजूंची आयुष्य गढूळ होतात. कुठलातरी सामाजिक मुद्दा हातात घेऊन अनेकदा आंदोलने मोर्चा काढला जातो. अनेकदा हा व्यवस्थेविरुद्धचा लढा असतो, मागण्या योग्य असतात, न्याय मिळाला पाहिजे तो हक्क आहे, हेही तितकेच खरे आहे. पण अनकेदा यातून सामान्य जनता होरपळून निघून जाते. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते. नकारार्थी वातावरण निर्माण होते.
वैयक्तिक असो किंवा सार्वजनिक असो कोणत्याही गोष्टीत सकारात्मकता असणे आवश्यक आहे. कारण ही भूमिका ठेवली, तर प्रत्येकातून योग्य मार्ग काढता येतो. प्रश्न सुटतात. हाच संदेश दीपावली हा सण देत असतो. आपल्या आयुष्यात या दीपावलीला सकारात्मक जाण्याची ऊर्जा आपण घेऊया आणि हा सण उत्साहाने साजरा करूया!