दी लेडी बॉस : अर्चना सोंडे
फक्त चार टेलरपासून सुरुवात करून, तिने १९९३ मध्ये तिचा व्यवसाय सुरुवातीपासून तयार केला जो मध्ये वाढला आहे, ज्यामध्ये सध्या ३,००० लोकांना रोजगार आहे आणि १३० कोटी रुपयांची उलाढाल आहे. ही गोष्ट आहे आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिलेल्या नीलम मोहन यांची.
बनारस हिंदू विश्वविद्यालयातून नीलमने बीए पूर्ण केले. तिचे वडील रेल्वे कर्मचारी होते. त्यांची बदली वेगवेगळ्या शहरांत होत असे. त्यामुळे नीलमचे बालपण दिल्ली, पंजाब, बनारस या शहरात गेले. तिसऱ्या वर्षात शिकत असताना तिची ओळख आयआयटी-एमबीए असलेल्या अमित मोहनशी झाली. पुढे वयाच्या २१व्या वर्षी तिचे लग्न झाले. नीलम तिच्या पतीसोबत दिल्लीला गेली आणि तिला डिझायनर म्हणून पहिली संधी मिळाली. त्यावेळेस तिला दरमहा सुमारे ३,००० रुपये पगार मिळत होता. तिला चांगले चित्र काढता येत असल्याने, तिला सर्जनशील डिझाईन्स तयार करण्यात खरोखर मदत झाली. लवकरच, तिने दक्षिण दिल्लीतील नरैना येथे कानी फॅशन्समध्ये नोकरी केली. ते वर्ष होतं १९७७. नीलम फक्त २२ वर्षांची होती आणि ती कानी फॅशन्समध्ये सॅम्पलिंग विभागाची प्रमुख होती.
१९७८ मध्ये, ती पहिल्या मुलाच्या वेळी गरोदर होती. त्यामुळे तिला बसने प्रवास करता येत नसल्याने सातव्या महिन्यात तिने काम सोडले. मात्र तोपर्यंत एक्सपोर्ट हाऊस तिच्यावर इतकं अवलंबून होतं की, कंपनीच्या मालकाने तिला नवव्या महिन्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी गाडी पाठवली. दरम्यान तिच्या मुलाचा सिद्धार्थचा जन्म झाला. आपल्या मुलाचं संगोपन करण्यास तिला वेळ द्यायचा होता. पण एका एक्सपोर्ट हाऊसच्या मालकीच्या एका जुन्या मैत्रिणीने तिला अर्धवेळ काम करण्यास सुचवले. या ठिकाणी ती तिच्या मुलालासुद्धा सोबत घेऊन जाऊ शकते हे तिच्यासाठी अधिक महत्त्वाचं होतं.
स्टाइलमन या जर्मन क्लायंटने तिच्या डिझाईन्सचे कौतुक केले आणि सांगितले की, त्यांनी पहिल्यांदाच भारतीय डिझायनरकडून अशा स्टाईलची ऑर्डर केली. हे नीलमसाठी स्फूर्तिदायी होतं. नीलमने फ्रीलान्सिंग कामं चालू ठेवली. प्रति तास ती ५०० रुपये कमवू लागली. अॅलिस नावाची एक ऑस्ट्रेलियन खरेदीदार होती. जी नीलमच्या आधीच्या कंपनीची क्लायंट होती, नीलमने कंपनी सोडल्यानंतर अॅलिसला जी कामे करून मिळाली होती त्याबद्दल ती आनंदी नव्हती. अॅलिसने नीलमला शोधून काढलं. नीलमने अॅलिससाठी काम करावं म्हणून तिला ५० टक्के पैसे आगाऊ दिले. अॅलिसच्या ५०,००० रुपयांच्या आगाऊ रकमेसह तिने गारमेंट उत्पादन युनिट असलेल्या मित्रासोबत काम केले. १९८३ मध्ये, तिने आणखी एका मित्रासह ऑपेरा हाऊस प्रायव्हेट लिमिटेड सुरू केली आणि ऑस्ट्रेलियन क्लायंटसाठी उत्पादन सुरू केले.
त्यांची पहिल्या वर्षीची उलाढाल १५ लाख रुपये होती, जी तिथून दरवर्षी दुप्पट होत गेली. १९९१ पर्यंत तिच्यासाठी गोष्टी खूप छान चालल्या होत्या. मात्र १९९१ मध्येच ती आणि तिचा नवरा वेगळे झाले. त्याच्या पुढच्या वर्षी भागीदारांमध्ये झालेल्या मतभेदांमुळे तिने कंपनी सोडली आणि तिचा हिस्सा सुमारे ३ कोटी रुपयांना विकला. २ जानेवारी १९९३ रोजी, तिने चार टेलर आणि इतर काही कर्मचाऱ्यांसह मॅग्नोलिया ब्लॉसम सुरू केले. तिने पंचशील पार्कमध्ये १९९२ मध्ये १ कोटी ४० लाख रुपयांचे घर घेतले होते, ज्याचे एका कारखान्यात रूपांतर केले. या ठिकाणी कर्मचारी दिवसभर काम करतात, जेवतात आणि तिथेच झोपतात.
कंपनीने पहिल्या वर्षी १.२५ कोटी रुपयांची उलाढाल केली. एक्स्पोर्ट हाऊससाठी अधिक ग्राहक मिळवण्यासाठी तिने जगभर प्रवास केला आणि किआबी या फ्रेंच कंपनीसोबत करार केला. मॅग्नोलिया ब्लॉसम मुख्यत्वे मुलांच्या कपड्यांच्या बाजारपेठेसाठी आवश्यक त्या डिझाइन पुरवते. तथापि, मॅग्नोलियाचे किड्सवेअरमधून महिलांच्या पोशाखाकडे वळणे आणि बाजारपेठेचा युरोप ते यूएसमध्ये विस्तार करणे ही एक योग्य चाल ठरली. गेल्या काही वर्षांत नीलमने अनेकांच्या जीवनावर सकारात्मक बदल घडवला आहे. तिच्याकडे मुन्ना मास्टर नावाचा माणूस होता ज्याला नीलमने मॅग्नोलियामध्ये पॅटर्न बनवायला शिकवले होते. तो एक सामान्य टेलर होता, जो दरमहा एक लाख रुपये कमावत होता आणि आता त्याच्याकडे कार आहे.
कंपनीमध्ये खूप जास्त खर्चामुळे कंपनी अचानक तोट्यात जाऊ लागली आणि २००२ पर्यंत ती दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आली. शेवटी एक निर्यातदार मित्र तिच्या बचावासाठी आला. नीलमने कंपनीचे काम आउटसोर्स करावे असे त्याने सुचवले. नीलमला तिच्या उत्पादनाचे आऊटसोर्सिंग सुरू करावे लागले. कर्मचाऱ्यांची कपात करावी लागली. ६५० कर्मचाऱ्यांवरून फक्त १०० कर्मचाऱ्यांपर्यंत ही संख्या खाली आली. हा वाईट काळ जाण्यासाठी वर्ष लागले. २००२ मध्ये, जेव्हा सिद्धार्थ अमेरिकेतून परत आला. तो २००७ मध्ये कंपनीत रुजू झाला. आपल्या कौशल्याने आणि आधुनिक दृष्टिकोनाने त्याने कंपनीला गेल्या दहा वर्षांत ३० कोटींवरून १३० कोटी रुपयांपर्यंत नेले.
त्याने दोन बाबी केल्या. लहान मुलांच्या कपड्याकडून तो महिलांच्या पोशाखाकडे व्यवसाय नेला आणि दुसरं युरोप बाजारपेठे ऐवजी अमेरिकन बाजारपेठेकडे त्याने लक्ष केंद्रित केलं. पर्यावरणपूरक अशा शाश्वत सुविधा त्याला निर्माण करायच्या आहेत. नीलम, सिद्धार्थ आणि त्यांची पत्नी पल्लवी हे मॅग्नोलिया मार्टनिक क्लोदिंग प्रायव्हेट लिमिटेडमध्ये संचालक आहेत. त्यांचे कार्यालय नोएडामध्ये असून आणखी एक कारखाना तयार होण्याच्या मार्गावर आहे.
२००९ पासून, नीलमने आपली ऊर्जा ज्येष्ठ नागरिकांसाठी घर विकसित करण्यासाठी वाहून घेतली आहे. पंचवटी असे नाव असणाऱ्या या ठिकाणी वृद्धांसाठी अत्याधुनिक सुविधा असलेले केंद्र आहे. या केंद्रावर त्या पूर्ण लक्ष देतात.
स्वत:साठी सगळेच जगतात. पण ज्यावेळेस आपण इतरांच्या कामी येऊ ते खऱ्या अर्थाने आयुष्य असतं. आपल्या आयुष्यातील अंधारावर मात करत नीलम मोहन यांनी इतरांच्या आयुष्यात मात्र दिवाळी आणलेली आहे. कापड उद्योगव्यवसायातील या ‘लेडी बॉस’चं आयुष्य कोणत्याही तरुणीसाठी प्रेरणादायी असंच आहे.