रवींद्र तांबे
कोकणात भातकापणीच्या मशीन जरी बाजार पेठेत उपलब्ध असल्या तरी आजही ग्रामीण भागातील शेतकरी राजा कोयतीने पिकलेल्या भाताची कापणी करतात. ती सुद्धा योग्यवेळी करावी लागते म्हणजे निर्मळ चार गोटे शेतकऱ्यांना मिळतात. असे जरी असले तरी रानटी जनावरे बऱ्याच वेळा पीकलेल्या भाताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. त्यासाठी योग्य काळजी पीकलेल्या भाताची शेतकऱ्यांना घ्यावी लागते. सध्या कोकणात रात्री थंडी जरी असली तरी रणरणते दुपारचे ऊन, संध्याकाळची मळभ आणि दोन दिवसांपूर्वी पडलेला अवकाळी पावसाचा सामना करीत भातकापणी शेतकरी करीत आहेत. या वर्षी उशिरा पाऊस सुरू झाल्याने भात लावणी उशिराने लावण्यात आली. पाऊस वेळेवर आला असता, तर ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भातकापणी झाली असती. त्यामुळे यावर्षी नोव्हेंबर उजाडला. बऱ्याच वेळा शहरात रहाणाऱ्या मुलांना भाताची कापणी कशी केली जाते याची माहिती नसते. तेव्हा अशा मुलांना भातकापणीची माहिती होण्यासाठी थोडक्यात घेतलेला आढावा.
कोकणातील भात शेतीचा विचार करता प्रथम भात पेरावे लागते. नंतर ते रुजून आल्यावर जवळ-जवळ १५ दिवसांनी मुळासकट कुपळून त्याची लावणी लावली जाते. नंतर पीक तयार झाल्यावर त्याची कापणी करण्यात येते. कोकणात भात हे प्रमुख पीक घेतले जाते. ते सुद्धा आजही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. यावेळी तर पाऊस उशिराने सुरू झाला होता. पावसाच्या अनियमितपणामुळे पीक पोसवायला आल्यावर करपून जाते तसेच पिवळी पिके झालेली दिसतात. याचा परिणाम कोकणात यावेळी भाताचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.
कोकणात भातकापणीसाठी मशीन जरी आली तरी पारंपरिक कोयतीनेच भातकापणी केली जाते. त्यासाठी भात कापण्या लायक होण्यापूर्वी गावातील सुतार दादाच्या शाळेत जाऊन कोयतीला दात्रे (धार) काढून आणली जाते. त्यानंतर कधी एकदा पाऊस थांबतो आणि पीकलेल्या पिकांची कापणी करतो असे शेतकरी दादाला वाटत असते. सध्या कोकणात भातकापणीचे काम जोरात चालू आहे. मात्र पूर्वीसारखी शेती केली जात नाही. शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्यामुळे लोक शहराकडे मुलांना पाठवू लागले आहेत. बऱ्याच ठिकाणी सुपीक जमिनीवर गगनचुंबी इमारती उभ्या असलेल्या दिसून येतात. काही लोक पेजेच्या तांदळासाठी दुसऱ्याच्या दारावर जायची वेळ येऊ नये म्हणून भात शेती करतात. पूर्वजांनी जे केले ते टाकता कामा नये ते चालू ठेवले पाहिजे म्हणून चार पाच वाफ्यांना लावणी किंवा रोव पेरला जातो. कोकणातील शेतकऱ्यांचा मूळ उद्देश इतकाच असतो तो म्हणजे भात शेतीचे अस्तित्व टिकून राहिले पाहिजे.
भात तयार झाल्यावर बऱ्याच वेळा पावसाची नजर चुकवीत भाताची कापणी केली जात असते. यावेळी मात्र चित्र वेगळे आहे. पावासाने विश्रांती घेतली असून थंडीची लाटही हळूहळू सुरू झाली आहे. त्यात भातकापणीला अधिक जोर आला आहे. तेव्हा अभ्यासकांनी भातकापणीच्या हंगामात विद्यार्थ्यांना भातकापणी कशी केली जाते, यासाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करावे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल की, भातकापणी कशी केली जाते. तसेच विद्यार्थ्यांना कापणीचा प्रत्यक्ष अनुभवही घेता येतो. यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अधिक भर पडून भातकापणी विषयी त्यांच्या ज्ञानात भर पडते. याचा परिणाम ते विद्यार्थी इतरांना सुद्धा सांगू शकतात की, भात शेतीची कशी कापणी केली जाते याची विस्तृत माहिती सांगू शकतात. अशा दौऱ्यामुळे प्रत्यक्षपणे त्याना अनुभव मिळतो.
भाताची कापणी करीत असताना शेतकऱ्यांनी आपली काळजी घेणे आवश्यक आहे. आतापर्यंत उन्हात काम केलेले नसते. तेव्हा डोक्यावर टोपी किंवा टॉवेल घ्यावे. अंगभर कॉटनचे कपडे घालावेत. अधूनमधून पाणी प्यावे. तापमानात वाढ होत आहे, असे आपल्याला वाटत असेल, तर विश्रांती घेणे पसंत करावे. तसेच पायात चप्पल घालावे. काही वेळा विषारी कीटक तसेच विंचू असू शकतात, तेव्हा भात कापत असताना त्याची काळजी घ्यावी. थकवा आल्यास थोडावेळ झाडाखाली वसावे. घाईघाईने भाताची कापणी करू नये.
आता पाऊस जरी गेला तरी दलदल किंवा ओलसर असलेल्या जमिनीत भातकापणी करणे कठीण जाते. कोकणात दलदल भागाला गाळाव असे म्हणतात. भात कापल्यावर एका लाईनीत फसरून किमान एक दिवस ठेवावे लागते. नंतर त्याच्या पेंढ्या बांधून झोडणीसाठी खळ्यात किंवा घराच्या पडवीत ठेवले जाते. नंतर छोटे टेबल ठेवून त्यावर भाताची दोरीने बांधलेली पेंढी (कवळी) झोडली जाते. असे जरी असले तरी पीकलेल्या भाताची कापणी अतिशय महत्त्वाची असते. तेव्हा भातकापणी कशी केली जाते, गवत व भात वेगळे असे केले जाते, हे समजून घ्यायचे असेल, तर कोकणात यावे लागेल. कारण कोकणात सध्या भातकापणीचे काम जोरात चालू आहे. जरूर या. आलात, तर नक्कीच कोकणातील भातकापणी कशी केली जाते, हे समजेल.