अयोध्येत २१ लाख दिवे लावून विश्वविक्रम करण्याची तयारी
दिवा आणि शरयूचे पाणी प्रसाद म्हणून पाठवणार
अयोध्या : अयोध्येचा दीपोत्सव (Deep Festival) दिव्य आणि भव्य करण्यासाठी जय्यत तयारी करणाऱ्या पर्यटन विभाग आणि अयोध्या जिल्हा प्रशासनाने यावेळी २१ लाख दिवे लावून विश्वविक्रम करण्याची तयारी केली आहे. यासोबतच लोकांना घरी बसून दिवाळी सणाचा भाग बनण्याची संधीही देण्यात आली आहे.
पर्यटन विभागाने ‘होली अयोध्या’ ॲपद्वारे दिव्यांची बुकिंग सुरू केली आहे. ॲपच्या माध्यमातून कोणीही एक ते ५१ दिवे दान करू शकतो आणि ते अयोध्येत घरी बसून प्रज्वलित करू शकतो. एका दिव्यासाठी १०१ रुपये, ११ दिव्यासाठी २५१ रुपये, २१ दिव्यांसाठी ५०१ रुपये आणि ५१ दिव्यांसाठी ११०० रुपये खर्च करावे लागतील.
पर्यटन विभागाचे प्रधान सचिव मुकेश मेश्राम यांनी सांगितले की, विभागाने ‘होली अयोध्या’ नावाचे मोबाइल ॲप तयार केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना घरबसल्या अयोध्येच्या दीपदानात सहज सहभागी होता येणार आहे.
हे मोबाइल ॲप अँड्रॉइड आणि ॲपल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. कोणतीही व्यक्ती हे ॲप डाउनलोड करून त्याच्या नावावर एक किंवा अधिक दिवे बुक करू शकते. विशेष म्हणजे दीपोत्सवानंतर पर्यटन विभाग संबंधित व्यक्तीच्या पत्त्यावर हा दिवा आणि शरयूचे पाणी प्रसाद म्हणून पाठवणार आहे. या ॲपद्वारे ठराविक रक्कम देऊन कोणीही दिवे लावू शकतो. जिल्हा प्रशासन या ॲपवर आलेल्या अर्जांची पाहणी करून त्यानुसार दिवे लावण्याची व्यवस्था करणार आहे. केवळ देशच नाही तर परदेशात राहणार्या लोकांनीही या दीपोत्सवात सामील व्हावे, असे ते म्हणाले. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी ही चांगली सुविधा ठरणार आहे.