ऊर्मिला राजोपाध्ये
दिवाळी आणि जल्लोष या जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. वर्षभर होणाऱ्या खरेदीपेक्षा दिवाळीच्या खरेदीला विशेष महत्त्व असते. याखेरीज नंतरची लग्नसराई खरेदीचा ‘फिवर’ ताजा ठेवण्याचे काम करत असल्याने हा हंगाम बराच लांबतो. यंदाच्या हंगामात खरेदी मोहीम विशेष लक्ष का वेधत आहे, कोणत्या वस्तूंना विशेष प्रतिसाद लाभतोय आणि हे खरेदीपर्व वेगळे कसे ठरत आहे, या मुद्द्यांचा हा मागोवा.
वर्षभर खरेदी सुरू असली तरी दिवाळीतील खरेदीभोवती वेगळ्याच भावभावनांचे तोरण असते. त्यामुळेच दिवाळी आणि त्यानंतरच्या लग्नसराई तसेच अन्य कारणांमुळे होणारी खरेदी विशेष चर्चेत असते. वेगळ्या भाषेत सांगायचे, तर हे सगळेच दिवस सेलिब्रेशन मोडमधले असतात. स्वत:साठी होणारी वेगवेगळ्या गोष्टींची खरेदी, भेटवस्तू, चांगले फूड आयटम्स अशा एक ना दोन प्रकारांनी खरेदीच्या रंगांमध्ये उधळण होत राहते. प्रत्येक खरेदी उत्साह द्विगुणीत करणारी ठरते. आत्ताही आपण या सगळ्याचा आस्वाद घेत आहोत. सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या खरेदी पद्धतींचे संशोधन केले, तर वस्त्रप्रावरणे, घरातील सजावटीचे सामान, वाहने वा अन्य मौल्यवान वस्तूंबरोबर सुका मेवा, मिठाई, सजावटीचे दिवे, मातीच्या मूर्ती, स्किनकेअर आणि मेकअपसाठी आवश्यक सामान, वेलनेस प्रॉडक्ट्स आदींच्या बाजारात मोठी रेलचेल असल्याचे दिसून येते. दिवाळीनंतरही हा ट्रेंड कायम राहात असल्यामुळे पुढील काळ बाजारात चैतन्य असेल, यात शंका नाही.
यंदाचा विचार केला, तर विविध प्रकारचे खाद्यघटक, पेये आणि वैयक्तिक काळजी घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांच्या खरेदीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. खेरीज टीव्ही, फ्रीज आणि वॉशिंग मशीनसारख्या प्रीमियम इलेक्ट्रॉनिक वस्तूंनाही मोठी मागणी बघायला मिळत आहे. मागील वर्षाशी तुलना करता यंदा बाजारातील मागणीमध्ये जवळपास दहा टक्क्यांची वाढ अनुभवायला मिळत आहे. विशेषत: ईशान्येकडील राज्यांमध्ये ऑनलाइन ऑर्डरमध्ये सर्वात वेगवान वाढ झाल्याचे एक अहवाल सांगतो. ‘टियर २’ आणि ‘टियर ३’ शहरेदेखील ग्राहकसंख्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या यादीत उच्च स्थानावर आहेत. तीनपैकी एका कुटुंबाने सणासुदीसाठी दहा हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्याची योजना आखली किंवा केली असल्याचेही एक आकडेवारी सांगते. सणासुदीच्या हंगामात ऑनलाइन ऑर्डर शिपमेंटचे प्रमाण ५५ टक्क्याने वाढले असून येत्या काळात हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धांचा वाढता ज्वरही वाढत्या उत्साहाचे कारण ठरत आहे. चांद्रयानचे यशस्वी लँडिंग, जी-२० शिखर संमेलनाचे यशस्वी आयोजन आणि २०२२-२३ आर्थिक वर्षात ७.२ टक्क्यांची मजबूत आर्थिक विकास गती यासारख्या घटनांमुळेही देशवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण राहिले आहे. परिणामस्वरूप भारतीयांची सणासुदीची खरेदी जोरदार आणि मागील विक्रम मोडीत काढणारी ठरण्याची अपेक्षा आहे.
दिवाळीच्या निमित्ताने कुटुंबे एकमेकांना मिठाई देतात तेव्हा त्यात बेक्ड वस्तू, घरगुती मिठाई, चॉकलेट्स, पेस्ट्री आणि पारंपरिक स्नॅक्सना प्राधान्य देत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळेच यांची विक्री करणारा ई-कॉमर्स व्यवसाय सध्या लगबग अनुभवत आहे. दिवाळीची खासियत असणारे फराळाचे तयार पदार्थ विकत घेण्याकडील कलही वाढतो आहे. त्यामुळे हा व्यवसाय करणारेदेखील समाधान व्यक्त करत आहेत. या काळात सजावटीच्या सामानाच्या खरेदीला प्राधान्य दिले जाते. या हेतूने सध्या दिवे आणि मेणबत्त्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. असे दिवे ऑनलाइन खरेदी करणारा मोठा वर्ग असून रांगोळ्या, त्यातील विविध प्रकार, छोट्या-मोठ्या तयार रांगोळ्यांचे प्रकार खरेदीदारांना आकर्षित करत आहेत. दिवाळीमध्ये बरेच पूजाविधी संपन्न होतात. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सामानाची बाजारपेठही गजबजली आहे. आपल्या देशात कानाकोपऱ्यांत कारागीर मातीच्या सुंदर मूर्ती बनवतात. सध्या या सर्वांच्या हाताला भरपूर काम आहे.
यंदाच्या दिवाळीच्या निमित्ताने घराच्या साफसफाईच्या सेवांना मोठी मागणी बघायला मिळाली असून अजूनही त्यात घट झालेली नाही. पाहुण्यांची वर्दळ सुरू असताना लोकांना स्वच्छ आणि नीटनेटके घर हवे असते. अशांच्या मदतीसाठी अनेक व्यावसायिक क्लिनर कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने लोक स्वत: घराच्या साफसफाईचा ताण न घेता उत्सवाचा आनंद घेताना दिसत आहेत. या काळात सलून आणि सौंदर्यप्रसाधनांचा बाजारही बहरतो. या प्रावरणांची मोठी खरेदी केली जाते. अलिकडच्या काळात ग्राहकांनी घरबसल्या सौंदर्यसेवा घेण्यास प्राधान्य दिल्याचे दिसत असून उत्पादनांच्या ऑनलाइन खरेदीचे प्रमाणही बरेच मोठे आहे. हे सगळे बघता ई-कॉमर्स कंपन्यांच्या सर्वेक्षणानुसार या सणपर्वामध्ये त्यांच्या विक्रीचा आकडा ११.८ बिलियन डॉलरच्या स्तरावर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते, सध्या ३९ टक्के लोक ऑनलाइन खरेदी प्राधान्य देत आहेत. आश्चर्य म्हणजे यंदा महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये खरेदीची अधिक प्रतीक्षा आणि अधिक ओढ बघायला मिळत आहे. हे यंदाच्या दिवाळीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
बदलत्या काळात ‘शॉप नाऊ पे लेटर’च्या योजनाही ग्राहकांना भुरळ घालत आहेत. शून्य टक्के व्याजाने दिल्या जाणाऱ्या इएमआयच्या योजनांमुळे ग्राहकांचे मोठ्या खरेदीचे बेत प्रत्यक्षात उतरण्यास मदत होत आहे. मोठ्या ब्रँड्सच्या वस्तू खरेदी करणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. विशेषत: व्हाऊचर, कॅश बॅक, एकावर एक फ्री यासारख्या सवलतींच्या शोधात असणाऱ्या ग्राहकांच्या अपेक्षा वाढतात आणि ते अधिक चांगले डील मिळवण्याचा प्रयत्न करतात. अलीकडे प्रदर्शन आणि दृश्यमानता हे वाढत्या खरेदीला कारणीभूत ठरणारे मुद्दे ठरत आहेत. सर्वेक्षणांनुसार मागच्या तुलनेत आता प्रदर्शनांमध्ये सरासरी ७२ टक्के वाढ दिसत आहे. या सणासुदीच्या हंगामात अप्लायन्स उद्योगात ३५ टक्के वाढ झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांनाही मागणी वाढली आहे. स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशीन आणि ऑडिओ गॅझेट्स यांसारख्या उत्पादनांच्या विक्रीमध्ये जोरदार वाढ झाली आहे. ई-कॉमर्स कंपन्यांनी आधीच वेअरहाऊसिंग जागा ताब्यात घेतली असून बऱ्याच कंपन्यांनी चांगल्या विक्रीच्या अपेक्षेने जास्त गोदामांची जागा घेतली आहे. ती दिवाळीपर्यंत त्यांच्या ताब्यात राहतील.
दिवाळीच्या पर्वामध्ये घरखरेदीचा उत्साहही पाहायला मिळतो. या मंगलसमयी नवी वास्तू खरेदी करण्याचे अनेकांचे नियोजन असते. यंदाही हा ट्रेंड बघायला मिळत असून विशेष म्हणजे मोठ्या शहरांमध्ये आलिशान घरांच्या खरेदीत मोठी वाढ झाल्याचे एका आकडेवारीतून समोर येत आहे. दुसरीकडे परवडणाऱ्या घरांना पहिल्यापासूनच सातत्याने वाढती मागणी बघायला मिळत आहे. सध्या अनेक बँका गृहखरेदीला चालना देणाऱ्या अनेक आकर्षक योजना राबवताना दिसत आहेत. त्याचा लाभ घेत अनेकजण ठरावीक रक्कम बँकेत ठेवून त्यावरील व्याजातून गृहकर्जाचे हप्ते भरण्याचे नियोजन करतात. ‘रेरा’ कायद्यामुळे मिळणारे अनेक लाभही वाढत्या गृहखरेदीला कारक ठरत आहेत. रेरामुळे घर खरेदीदारांना प्रकल्पाच्या तपशीलाची नेमकी माहिती मिळवण्याचे हक्क मिळाल्यामुळे गुंतवणुकीसाठी योग्य पऱ्याय निवडता येत आहेत. ही सजगता वाढल्यामुळेच प्रकल्पाची मान्यता, विकसकाविषयीची वित्तीय माहिती, विक्रीतली प्रगती, बांधकाम, प्रकल्पाची अधिकृतता आदी गोष्टी तपासून घेतल्या जात आहेत. मात्र पूर्णत्वाच्या जवळ पोहोचलेल्या प्रकल्पांमधून घरखरेदी करणे कमी जोखमीचे असल्याची भावना आजही दिसत असल्यामुळे अनेक गुंतवणूकदार रेडी पझेशन घरांना आणि प्रकल्पांना प्राधान्य देताना दिसत आहेत.
एकूणच हे आणि यापुढचे काही दिवस खरेदीप्रेमींसाठी आहेत. येणारी लग्नसराई, नववर्ष, नाताळसारखा महत्त्वाचा सण अशा एक ना अनेक कारणांमुळे खरेदीचा हा ज्वर आणखी काही दिवस कायम राहणार आहे. भेटवस्तूंच्या बाजारपेठा सजत राहणार आहेत. सर्वदूर समृध्दीचे वातावरण अनुभवायला मिळणार आहे. जुन्या काळात अनेक खानदानी कुटुंबांमध्ये शेल्यांनी झाकलेल्या चांदीच्या ताटातून मिठाईचे किंवा दिवाळीचे पदार्थ भेट म्हणून पाठवण्याची प्रथा होती. अशा वेळी ज्या चांदीच्या ताटातून ते पदार्थ पाठवले जात ते ताटही भेट म्हणून दिल्याचे सुचित केले जात असे. काळ बदलला, पण मानवी स्वभाव बदलला नाही. दिवाळीच्या निमित्ताने भेटी देण्याची प्रथा संपली नाही. बदलत्या काळाला अनुसरुन ना ना प्रकारच्या वस्तू दिवाळीच्या निमित्ताने भेट म्हणून दिल्या जाऊ लागल्या. आता तर याला दिवाळीचाच नव्हे, तर अन्य संदर्भही जोडला जातो. त्यामुळे सोन्या-चांदीच्या वस्तूही भेट देत आप्तस्वकियांचा आनंद द्विगुणीत केला जात असल्याचे पाहायला मिळते.
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…
मुंबई: इमरान हाश्मीचा नवा चित्रपट 'ग्राउंड झिरो' सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर झाला.…
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…