- गोलमाल : महेश पांचाळ
नॉन बँकिंग वित्तीय कंपनीकडून दुचाकी खरेदीसाठी २०२० मध्ये मोहित वाळेकर या नावाने कर्जासाठी अर्ज केला होता. त्यासाठी सर्व कागदपत्रेही कर्ज देणाऱ्या कंपनीकडे सादर केली होती. त्यानंतर फायनान्स कंपनीकडून मोहित वाळेकर या नावावर वाहन कर्ज मंजूर करण्यात आले. मात्र काही दिवसांनी मोहितने कर्जाचे हफ्ते भरणे बंद केले. त्याच्याकडून कर्जाचे मासिक हफ्ते भरणे बंद झाल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वाळेकरने दिलेल्या पत्त्यावर भेट दिली, मात्र तो फ्लॅट रिकामा दिसला. त्यावेळी वाळेकरने कर्ज घेताना दुसराही पत्ता दिला होता. मात्र त्या ठिकाणीही दुसरेच कोणीतरी राहत असल्याचे कंपनीच्या लक्षात आले. त्यामुळे या प्रकरणाविरोधात कंपनीच्या वतीने मरिन लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस उपअधीक्षक प्रवीण मुंढे यांच्या निदर्शनास आले की, मोहित वाळेकर नावाने जरी अर्ज केला असला तरी, दुसऱ्या व्यक्तीने मोहितच्या नावाचा वापर केला आहे. त्यामुळे कर्ज नेमके कोणी घेतले याचा शोध पोलिसांनी घेतला तेव्हा सचिन बिल्लूरचे नाव पुढे आले.
बनावट पत्ते आणि मोबाइल नंबर सतत बदलत असल्याने त्याच्यापर्यंत पोहोचण्यास पोलिसांना मोठ्या कौशल्याने तपास करावा लागला. कर्ज आणि वाहन विक्रीच्या बहाण्याने वित्तीय संस्था आणि व्यक्तींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली नवी मुंबईतील एका ४९ वर्षीय मेकॅनिकल इंजिनीअर असलेल्या सचिनला अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन आठवड्यांत १७ दुचाकीसह ६ कार ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. त्यांची किंमत ८९ लाखांच्या जवळपास आहे. सचिन बिल्लूर हा या गुन्ह्यात २०१९ पासून सक्रिय असल्याचेही स्पष्ट झाले. कागदपत्रांमध्ये बदल करून त्याने अनेकांना गंडा घातला होता. दुचाकी खरेदी करण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींना तो भेटत असे. त्यांची विचारपूस करून त्यांना वाहन खरेदीसाठी मार्गदर्शन करत असे. मात्र एकदा कर्ज मंजूर झाले की, नंतर मात्र बँक आणि इतर कोणीही त्यांच्यापर्यंत पोहोचता येणार नाही, याची तो काळजी घेत होता. अनेकांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून त्याने वेगवेगळ्या व्यक्तींची बनावट आधार आणि पॅनकार्ड तयार करून ती कर्जासाठी सादर केली होती. तसेच आधार आणि पॅनकार्डवरील फोटो बदलून त्यांच्या नावाने कागदपत्रे तयार करत होता. त्यामुळे त्यावरील पत्ता तोच राहत होता. असे कारनामे करून त्याने खासगी बँकांमध्ये कर्जासाठी कागदपत्रे जमा केली होती.
“बिल्लूर बनावट कागदपत्रे बनवायचा आणि वेगवेगळ्या व्यक्तींच्या बनावट आधार आणि पॅनकार्डच्या प्रती सादर करायचा. पण त्यातून त्यांचा चेहरा कापायचा आणि संबंधित कागदपत्रांवर त्याचा फोटो चिकटवायचा.
सर्व पत्ते खरे होते; परंतु ते त्या लोकांचे असायचे की बँकांना ज्यांची कागदपत्रे एकतर सबमिट केली गेली होती. अशाप्रकारे सचिन बनावट कागदपत्रे आणि बनावट नावे वापरून वित्तीय संस्थांकडून वाहन कर्ज मिळवायचा. पुढे, तो संभाव्य ग्राहकांना वाहन विकण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून पैसे घेत असे.
“तो संदर्भ वापरून पीडितांना दुचाकी खरेदी करण्यात स्वारस्य आहे का, याबाबतची विचारणा करून टोकन/अॅडव्हान्स रक्कम स्वीकारत असे. अनेक फसवणुकीचे गुन्हे करूनही सचिनपर्यंत बँका किंवा संभाव्य ग्राहक त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत, कारण त्याचा ठावठिकाणा कोणालाच माहीत नव्हता. कारण त्याने बनावट फोन नंबर दिला होता. कर्ज मंजूर झाल्यानंतर त्याचा फोन स्वीच लागायचा. अखेर सचिनचे पितळ उघडे पडले. तो मेकॅनिकल इंजिनीयरिग असून तो पदव्युत्तर पदवीधर आहे. उच्चशिक्षित असणाऱ्या सचिन बिल्लूरने कागदपत्रांची फेरफार करून त्याने पगारस्लिपही सादर करून बँक आणि वित्तीय कंपन्यांची फसवणूक केली. त्याला पत्नीसह दोन मुली आहेत. पण, यंदाची दिवाळी त्याची अंधार कोठडीत जाणार आहे.
maheshom108@ gmail.com