- पाचवा वेद : भालचंद्र कुबल
फार जुनी म्हणजे साधारण १९७०-७२ ची गोष्ट असावी. वर्गातल्या काही मित्रांमुळे त्या पोरसवदा वयात लिसनर्स चाॅईस या मुंबई अ या रेडियो स्टेशनवरील कार्यक्रमाविषयी आवड निर्माण झाली होती. मुंबई ब केंद्रावर आपली आवड आणि अ केंद्रावरील लिसनर्स चाॅईसला त्या काळी पर्याय नव्हता. यात सातत्याने सुपर हिट ठरलेला आणि अमेरिकेत प्रथमच स्टुडियोत रेकाॅर्ड झालेल्या गीत संचयाचे नाव होते “अमेरिकन अल्बम”. यात एक सुंदर गीत होते, “अ हाॅर्स विथ नो नेम”. बालपणींच्या आठवणींशी सांगड घालणारं व कोकेन नामक ड्रग अमेरिकेत प्रसारित होऊ लागल्यानंतरचं एक रूपक गीत होतं ते. नव्या पिढीच्या स्वातंत्र्याच्या बदलत चाललेल्या व्याख्येबद्दल सर्वसामान्यांच्या मनातील भीती व्यक्त करणारं ते एक चिंतन होतं. पुरुषोत्तम बेर्डे, भाग्यश्री देसाई आणि दीपक करंजीकर या मराठी नाट्यसृष्टीतील प्रचंड क्रिएटिव्ह त्रयीने “अमेरिकन अल्बम”ला हात घातलाय म्हटल्यावर बरं वाटलं. नव्या पिढीचा कान पिळणारं असं काहीसं येण्याची हीच नेमकी वेळ आहे आणि ही मंडळी तो डोस अधिकारवाणीने देऊ शकतात अशी खात्री असताना मराठीतल्या या “अमेरिकन अल्बम”ने काहीशी निराशा केली… आणि त्याला पूर्णतः लेखक जबाबदार आहे, असं माझं नाट्यनिरीक्षण सांगतं.
नवविचारांचा पगडा घेऊन अनेक वर्षांचे स्थायिकपण जगत, नव्या पिढीच्या विचारांशी संघर्ष करणारं किंबहूना जनरेशन गॅपवर सोल्यूशन देणारं हे एक दिवाणखानी नाटक आहे. एका अपरिपक्व संहितेचा तोल सांभाळण्याचा प्रयत्न बेर्डे-करंजीकर-देसाई या त्रयीकडून सातत्याने नाटकभर होताना दिसतो. नाटक सुरू होताच अमेरिकन संस्कृतीत वाढलेली मुलगी प्रेक्षकांचे लक्ष प्रथम केंद्रित झाल्यामुळेच आपण १९७१ सालच्या “अमेरिका” या अल्बमशी साधर्म्य जोडू लागतो… आणि मग कळते की, अरेच्चा, हा तर जनरेशन गॅपचा संघर्ष आहे…! बरं संघर्ष म्हणावा तर तो इतका तकलादू की, नाटकातील प्रत्येक क्लायमॅक्स अँटीसिपेटेड (अपेक्षित) आहे. नाटक बघण्यापेक्षा पुढे काय होणार? याचा एक अंदाज बरोबर आल्यावर कथाबीजातील पुढल्या अंदाज बांधाणीच्या कामाला प्रेक्षकवर्ग लागतो आणि नाटकाची पकड इथेच ढिली पडत जाते. दीपक करंजीकर (हरिहर), भाग्यश्री देसाई (नीलिमा) व अमृता पटवर्धन (हनी) आपल्या अभिनयाची उंची दाखवत असताना, संवादाचे सामर्थ्य त्यांना साथ देत नाही. मध्यांतरा अगोदरची दोन-तीन मिनिटे, तर करंजीकर कमाल करतात आणि बेर्डेंनी त्यांना रंगशीर्षासमोरील रंगपीठावर बसून भगवद्गीतेमधला अध्याय वाचण्याची दिलेली मुव्हमेंट, तर टाळी घेऊन जाणारी आहे; परंतु तो इंटरव्हल पाँइंट ठरू शकतो का? याचा विचार लेखकाने जरूर करावा.
व्यावसायिक नाटक म्हटले की, त्यात थोड्याफार प्रमाणात प्रेक्षकधार्जिण्या क्लृत्प्या कराव्याच लागतात. पुरुषोत्तम बेर्डे आणि भाग्यश्री देसाई या दोघांचाही अनुभव व्यावसायिक नाटकाबाबतचा तगडा आहे. दोघांनीही या आधी अनेक हिट प्राॅडक्शन्स दिली आहेत. विषयाचे नावीन्य हे तर त्यांच्या नाट्यनिर्मितीचे प्रमुख आकर्षण ठरले आहे. पुरुषोत्तम बेर्डे तर लोककले सारखा फ्री फाॅर्म असो वा बाॅक्ससेटचं एकस्थळी नाटक, त्या त्या संहितेला योग्य न्याय मिळवून देण्याची बांधणी हाताळणारा दिग्दर्शक मराठीतच नव्हे, तर भारतीय रंगभूमीवर सध्या तरी कुणीही नाही (हे विधान मी अत्यंत जबाबदारीने करत आहे.) संहितेची नस सापडली की बेर्डे त्याचे सादरीकरण कसं अफलातून करतात हे अलवरा डाकू, सखी प्रिय सखी, खंडोबाचं लगीन, मुंबई मुंबई आदी नाटकांतून अनुभवलेलं आहे. हा दिग्दर्शक प्रथम कलाकारांची फ्रेम बांधतो व नंतर त्यांच्या मुव्हमेंट्स आखतो. त्यामुळे एखाद्या प्रसंगाची पहिली फ्रेम आणि शेवटची फ्रेम यामधील जाणीवपूर्वक कंपोझिशन्स रेखाटणारा हा दिग्दर्शक आहे, हे माझे मत आहे. अमेरिकन अल्बमबाबत उदाहरणच घ्यायचे झाल्यास व्हीडिओ काॅलसाठीचा लॅपटाॅप व मागे स्क्रिनवर दिसणारे व्हिज्युअल इतके करेक्ट जागी बसवलेय कि त्याची दुसरी जागाच सापडंत नाही. शिवाय इतर वेळी व्हीडिओ स्क्रिनचा वापर खिडकी म्हणून करण्यामागची कल्पकता दाद देण्यासारखीच आहे. या आधीच्या काही नाटकांप्रमाणेच लेखन वगळता सबकुछ पुरुषोत्तम बेर्डे असलेलं हे नाटक आहे. तरीही दुसऱ्या अंकात नाटक देशभक्तीच्या “अजेंडानाट्या”प्रमाणे रेंगाळते आणि याला जबाबदार पुन्हा लेखकच आहे. भारताचे गुणगौरव गीत, उत्तरेत आलेला जून २०१३ चा महाप्रलय यांचे व्हीडिओ नाटकाच्या कथासूत्राची गती संथावतात.
मुळात लेखकाने मंचकथा बेतताना ती एखाद्या प्रसिद्ध वा लोकप्रिय कथेच्या जवळपास जाणार नाही, याची काळजी घेतलेली बरी असते. अल्बम बघताना मध्येच “पुरब और पश्चिम” किंवा मध्येच “परदेस” बघितल्याचा भास होत रहातो. शेवट, तर गोड करण्याच्या नादात यक्षगान लोककलेत जसे मंगलम् मंगलम् म्हटले जाते तसा काहीसा अनुभव येतो. नशीब एवढंच की, नाटकाला भरतवाक्य नाही.
या नाट्यनिरीक्षणात मी सातत्याने संहिता तथा लेखन यामधल्या त्रुटींचा उल्लेख करतोय तो यासाठीच की दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश योजना, संगीत आणि वेशभूषा जरी बेर्डेंची असली तरी लेखनात फसलेली ही संहिता आहे. कलाकारांच्या कलागुणांना ती नक्कीच अधोरेखित करते; परंतु टोटल इम्पॅक्टचं काय करायचं? दीपक करंजीकर (हरिहर कानेटकराच्या भूमिकेतून) काही प्रसंगात अफलातून “बाप” उभा करतात. तीच गोष्ट आईची. भाग्यश्री देसाईंची (नीलिमा भूमिकेतील) यंग मदर परफेक्ट अमेरिकन अॅटिट्युड पेश करते. एण्ट्रीचे त्यांचे देखणेपण, तर वाॅव सदरात मोडणारे आहे. अमृता पटवर्धन यांचा अमेरिकन अग्रेसिव्हनेस जितका भावतो, तितकाच तो भारतात आल्यानंतरचा स्वभाव बदल, प्रेक्षकांना बघायला भावला असता, नव्हे तर ती भूमिका बॅलन्स झाली असती. पण आडातच नाही तर पोहऱ्यात तरी कुठून येणार? (अरे देवा..! पुन्हा लेखकच जबाबदार)
आशुतोष नेर्लेकर आणि मोनिका जोशी यांच्या भूमिका देखील उत्तम साकारल्या गेल्यात. पुन्हा एक प्रश्न भांबावून सोडतो, तो असा की मोनिका जोशी यांच्या भूमिकेने कथानक पुढे न्यायला वा टर्न घ्यायला अशी कोणती मदत झाली.
त्या येतात आणि स्टोरी रिलेटेड इन्फर्मेशन देऊन जातात, या पलीकडे त्या काय करतात? नाही म्हणायला भाग्यश्री देसाईंना इरिटेट करण्याच्या प्रसंगात त्या हशा मिळवतात, पण त्या पलीकडे त्या पात्राची योजना तथा लिहिण्याचे लेखन उद्दिष्ट काय? (अरे देवा..! पुन्हा लेखकच जबाबदार) तर अशा प्रकारे अमेरिकन तत्त्वांच्या आहारी गेलेली मराठमोळ्या संस्कृतीतील भावविश्वांचा क्लोज, मिड आणि लाँगशाॅट्सच्या फ्रेम दाखवणारा अल्बम संपतो आणि मग प्रेक्षक म्हणून मला काय मिळाले? याची बेरीज करत बसतो. हे नाटक चालण्यासारखं तर आहे, मग या निरीक्षणात टिकेचा सूर लावण्याची गरज होती का? असा प्रश्न विचारला जाईल आणि मग उत्तर देणे गरजेचे असल्याने एक निष्कर्ष जरूर मांडावा लागेल तो हा की, अमेरिकन अल्बमचे प्राॅडक्ट पोझिशनिंग व्यवस्थित व्हायला हवे. पुरुषोत्तम बेर्डेंसारख्या जाहिरात व्यावसायिकाला ते कठीण नाही. या नाटकाला प्रेक्षकवर्ग आहे पण तो मुंबै-पुण्यासारख्या काॅस्मोपाॅलिटन शहरातला नाही, निमशहरी भागातला प्रेक्षकवर्गाला हे नाटक पसंतीस उतरेल, हे आवर्जून लक्षात घ्यायला हवे.