इतिहासातील सर्वात मौल्यवान खजिना कोणाला मिळणार?
कोलंबिया : कोलंबिया (Colombia) सरकारने कॅरेबियन समुद्रात (Caribbean Sea) ३१५ वर्षांपूर्वी बुडालेले जहाज परत मिळवण्याचा निर्णय घेतला आहे. सॅन जोस (San Jose) नावाच्या या जहाजावर सोने आणि चांदीसह १ लाख ६६ हजार कोटी डॉलर्सचा २०० टन खजिना होता. हे जहाज १७०८ मध्ये राजा फिलिप पाच याच्या ताफ्याचा भाग होता. स्पेन जिंकण्याच्या युद्धात ब्रिटिश नौदलाने केलेल्या हल्ल्यात ८ जून १७०८ रोजी सॅन जोस जहाज बुडाले होते. त्यावेळी जहाजावर ६०० लोक होते, त्यापैकी फक्त ११ लोकच जिवंत राहू शकले.
२०१५ मध्ये कोलंबियन नौदलाच्या काही लोकांना जहाजाचे अवशेष तब्बल ३१ हजार फूट पाण्याखाली सापडले होते. त्यावेळी कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष जुआन मॅन्युएल सँटोस यांनी या शोधाचे वर्णन मानवी इतिहासातील सर्वात मौल्यवान खजिना असे केले होते. या जहाजाच्या अवशेषांवरून स्पेन, कोलंबिया आणि बोलिव्हियाच्या काही लोकांमध्ये वाद सुरू आहे.
बोलिव्हियन समुदायाचा दावा आहे की, त्यांच्या लोकांना खजिना खनन करण्यास भाग पाडले गेले. म्हणून हा खजिना त्यांचाच आहे.
याशिवाय ग्लोका मोरा (Glocca Morra) नावाच्या अमेरिकन रेस्क्यू असोसिएशनने देखील १९८१ मध्ये हे जहाज सापडल्याचा दावा केला होता. ग्लोका मोरा यांनी सांगितले की, त्यांनी अर्धा खजिना फेडरेशनकडे राहील याच अटीवर कोलंबियन सरकारला जहाजाच्या दुर्घटनेचे ठिकाण सांगितले होते.
मात्र कोलंबियाने २०१५ मध्ये सांगितले की, त्यांच्या नौदलाने स्वतःच्या प्रयत्नातून दुसर्याच ठिकाणी जहाजाचे अवशेष शोधून काढले. आता अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांना २०२६ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी हा खजिना आणि जहाजाचे अवशेष बाहेर काढायचे आहेत.
पेट्रो सरकारने सांगितले की, ते या अवशेषांसाठी एक प्रयोगशाळा तयार करणार आहेत. जिथे जहाजाबाबत अभ्यास केला जाऊ शकतो. त्यानंतर या गोष्टी राष्ट्रीय संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत.
गेल्या वर्षी नौदलाने या दुर्घटनेशी संबंधित अनेक छायाचित्रे गोळा केली होती. त्यावेळी समुद्री प्राण्यांमध्ये जहाजाच्या दुर्घटनेसोबत सोन्याची नाणी, विटा आणि काही मौल्यवान भांडी आढळली होती. या सगळ्यामध्ये डॉल्फिनचे ठसे असलेल्या बंदुका होत्या. ज्याद्वारे अवशेष ओळखता आले. सॅन जोस हे ६२ तोफा, तीन मास्ट असलेले गॅलियन होते. १६व्या-१८व्या शतकात युरोप आणि अमेरिका दरम्यान प्रवास करणाऱ्या जहाजांपैकी हे जहाज होते. बुडाण्यापूर्वी हे जहाज अमेरिकेतून स्पेनला खजिना घेऊन जात होते. स्पेन हा खजिना ब्रिटनविरुद्धच्या युद्धात वापरणार होता.
सॅन जोस गॅलियन पोर्टोबेलो, पनामा येथून १४ जहाजे आणि तीन स्पॅनिश युद्धनौकांच्या ताफ्याचे नेतृत्व करत रवाना झाले होते. पुढे त्याचा सामना एका ब्रिटिश स्क्वाड्रनशी झाला. ८ जून १७०८ रोजी रॉयल नेव्हीचे इंग्लिश कमोडोर चार्ल्स वेजर यांनी कार्टाजेनापासून १६ मैलांवर बारूजवळ या जहाजाचा माग काढला. यानंतर जहाज आणि त्यातील सर्व सामान ताब्यात घेण्याचे ठरले. पण सॅन जोसच्या जहाजावर स्फोट झाला. ज्यामुळे जहाज ताब्यात घेण्यापूर्वीच बुडाले. ब्रिटिश सरकारने स्पॅनिश ताफ्याला हा खजिना युरोपात नेण्याची परवानगी दिली नाही. यामुळे कोलंबियातील समुद्रात ३१५ वर्षांपूर्वी बुडालेले जहाज आता बाहेर काढले जाणार आहे. परंतु या खजिन्यावर आता अनेकांनी दावा केला आहे. त्यामुळे ते कोण काढणार आणि कोणाला किती वाटा मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.