
अहोरात्र झटणारे मुंबईकर चाकरमानी गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक प्रदूषित हवेचा अनुभव घेत आहेत. मुंबईत काही भागांत हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ३०० च्या वर गेला आहे. हा आकडा दिल्लीपेक्षा सर्वाधिक आहे. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारीत खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एकूणच अवघी मुंबई प्रदूषणामुळे गुदमरली आहे व त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. येथील हवा गुणवत्ता निर्देशांकाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुंबईत सध्या सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील गृह प्रकल्पांची बांधकामे, जागोजागी सुरू असलेले मेट्रोचे बांधकाम, लाखोंच्या संख्येने असलेल्या वाहनांचे प्रदूषण, हवामानातील बदल आणि फोटोकेमिकल प्रक्रिया यामुळे प्रदूषण हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. मुंबईतील प्रदूषणाची नेमकी कारणे काय आहेत, यासाठी तज्ज्ञांनी व्यापक अभ्यासाची गरज व्यक्त केली आहे. दिल्लीत हवेतील कार्सिनोजेनिक प्रदूषकांची पातळी दररोज ३०० चा टप्पा ओलंडत असताना मुंबईकर तर या संकटापासून जणू अनभिज्ञ होते. मात्र, लांब वाटणारे हे संकट कधी मुंबईकरांच्या मानगुटीवर येऊन बसले हे कळलेच नाही. गेल्या काही दिवसांपासून मुंबई तर दिल्ली पेक्षाही प्रदूषित झाली आहे. धूळ आणि धूलिकणांच्यामुळे (पीएम २.५ आणि पीएम१०) हवेचे हे प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
मुंबईच्या प्रदूषण वाढीला या ठिकाणी सुरू असलेल्या मोठ-मोठ्या, टोलेजंग इमारतींच्या बांधकामांचा देखील मोठा हात आहे. मुंबईत नरिमन पॉइंटसह सर्वत्र सुरू असणारी बांधकामे, तसेच मेट्रोची कामे आणि वाहनांनी सदोदीत व्यस्त असणारे रस्ते, रोज धावणारी सुमारे १२ लाख वाहने यामुळे प्रदूषणाचा स्तर हा वाढला आहे. मुंबईत देशातील सर्वाधिक चारचाकी गाड्या आहेत. सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे इच्छित स्थळी पोहोचण्यास दुप्पट वेळ लागतो. त्यामुळे देखील धूलिकण वाढून प्रदूषणात वाढ होत आहे. हवामान बदल हा आणखी एक घटक मुंबईच्या प्रदूषणास जबाबदार आहे. २०२२ मध्ये, तज्ज्ञांनी चक्रीवादळ ला नीना मुळे शहरातील धूलिकणांच्या उच्च पातळीचा शोध लावला. प्रशांत महासागरावरील पृष्ठभागाच्या तापमानात मोठी घट झाल्यामुळे मुंबईच्या आसपासच्या किनारी वाऱ्यांच्या गतीवर परिणाम झाला.
अरबी समुद्रातून वारे वाहत असताना ला निनाच्या प्रभावामुळे वायू प्रदूषणात भर पडत आहे. ऑक्टोबर हीट आणि मान्सूनचा विलंबित माघार ही करणे देखील प्रदूषण वाढीस जबाबदर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इंधन जाळण्यासाठी आवश्यक असलेल्या कारच्या इंजिनमधील स्पार्क देखील यासाठी कारणीभूत आहे. जेव्हा नायट्रोजन ऑक्साईड असतात, तेव्हा फोटोकेमिकल प्रतिक्रिया ऑक्सिजनच्या मुक्त रॅडिकल्सच्या निर्मितीस कारणीभूत ठरू शकते. हे मुक्त ऑक्सिजन रॅडिकल्स ताबडतोब सामान्य ऑक्सिजन रेणूंशी एकत्र होतात आणि विषारी वायू तयार करतात. त्यांना आळा घालणे ही काळाची गरज आहे. मुंबईत यंदा दिवाळीपूर्वीच हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झाली आहे.
आजूबाजूला विषारी हवा आणि धुक्यामुळे लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. या सततच्या वाढत्या प्रदूषणामुळे लोकांना आरोग्यासंबंधी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेनेही कडक पावले उचलली आहेत. काळबादेवी, झवेरीबाजार, भुलेश्वर परिसरातील सोने-चांदी गलाईच्या कारखाने हे प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत हे लक्षात घेऊन पालिकेने नुकत्याच चार भट्ट्या व धुरांड्यांवर कारवाई करून ते हटविले आहेत. त्यामुळे या परिसरातील इतर सोने-चांदी गलाई व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत व त्यांनी प्रदूषण होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जाणार आहे.
आता मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर महापालिका प्रशासन आणि राज्य सरकार प्रदूषण रोखण्यासाठी युद्धपातळीवर कामाला लागले असून, प्रदूषण रोखण्यासाठी सर्व विभागांचा आढावा घेतला गेला. मुंबईसह ठाणे आणि पुणे शहरात हवेची गुणवत्ता खालावल्याने वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकारसह महापालिका प्रशासनाला चार दिवसांची अंतिम मुदत देत प्रदूषण रोखण्याचे निर्देश दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर महापालिका प्रशासन आणि राज्य सरकार कामाला लागले असून, प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व विभागांचा आढावा घेतला. त्यामध्ये विविध सूचना करण्यात आल्या. हजारो टँकरच्या पाण्याने मुंबईतील रस्ते धुण्याचे, आवश्यकता भासल्यास अन्य फॉगर्ससुद्धा वापरण्याचे व जे जे आवश्यक आहे ती सगळी मशिनरी वापरण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. तसेच राज्यातील सर्व महापालिका, आयुक्तांना, जिल्हाधिकाऱ्यांनाही त्यांनी याबाबत सूचित केले आहे.
डेली मॉनिटरिंग करणे, प्रदूषणाच्या कारणांचा शोध घेऊन, तत्काळ हे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यास पर्यावरण विभागाला सांगितले आहे. त्यासाठी शहरी भागांसाठीही सूचनाही दिल्या आहेत. वातावरण शुद्धीसाठी झाडे लावणे व ती जगविणे हा महत्त्वाचा मुद्दा ध्यानी घेऊन गाव-खेड्यांसह, शहरातसुद्धा झाडे लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी युद्ध पातळीवर कामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणीसुद्धा केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. सोबतच मुंबई उच्च न्यायालयाने ज्या सूचना दिल्या आहेत त्यांचे शंभर टक्के तंतोतंत पालनही केले जाणार आहे. पर्यावरण विभागाच्या ज्या गाईड लाईन्स आहेत त्या लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यातून लवकरच सर्वांना दिलासा मिळेल अशी दाट शक्यता वाटत आहे.