कराची: पाकिस्तानच्या कराची शहरात एक मच्छिमार औषधी गुण असलेला दुर्लभ मासा विकून लिलावानंतर एका रात्रीत करोडपती बनला आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानच्या कराची शहराती हाजी बलूच आणि त्यांच्या साथीदारांचे नशीब तेव्हा फळफळले जेव्हा त्यांच्या हाती गोल्डन फिश हा मासा लागला. अरबी समुद्रात पकडलेल्या या माशांनी या मच्छिमाराचे आयुष्य एका रात्रीत बदलले.
या माशांच्या लिलावानंतर तो एका रात्रीत करोडपती बनला आहे. बलूचने सांगितले की लिलावादरम्यान एका माशाची किंमत तब्बल ७० लाख रूपये मिळाली.
कसे अडकले मासे जाळ्यात
मच्छिमाराने सांगितले की, आम्ही कराचीमध्ये खुल्या समुद्रात मासे पकडत होतो. जेव्हा आम्हाला गोल्डन माशांचा गट जाळ्यात सापडला तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटले. हाजी यांनी सांगितले की हा मिळालेला पैसा आपल्या सात लोकांच्या टीममध्ये वाटून घेतला जाणार आहे.
पाकिस्तानचे मच्छिमार फोक फोरमचे मुबारक खान यांनी दिलेल्या माहितीनुसार कराची बंदरावर मच्छिमाराने जेव्हा आपण पकडलेल्या माशांचा लिलावा केला तेव्हा सर्व मासे साधारण ७० मिलियन रूपयांना विकली गेली. हे मासे केवळ प्रजनन काळादरम्यान समुद्रकिनारी येतात.
गोल्डन फिशचे वैशिष्ट्य
गोल्डन फिश हा मासा अतिशय अनमोल तसेच दुर्लभ जातीचा मासा आहे. या पोटातून निघाणाऱ्या पदार्थांमध्ये औषधी गुण असतात. या पदार्थांचा वापर उपचारांसाठी केला जातो. तसेच माशापासून मिळणाऱ्या धाग्यांचा वापर सर्जरीमध्येही केला जातो.
या माशाचे वजन साधारणपणे २० ते ४० किलो दरम्यान असते. तसेच हा मासा १.५ मीटरपर्यंत वाढू शकतो. पूर्व आशियाई देशांमध्ये याची मागणी मोठ्या प्रमाणात असते.