
पुणे : महाराष्ट्र केसरी २०२३-२४च्या अंतिम सामन्याचा निकाल लागला असून वाशिमच्या सिकंदर शेख याला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळाला आहे. सिकंदर शेख याने गतविजेत्या शिवराज राक्षेला चीत करत बाजी मारली आहे.
२०२२-२३ च्या महाराष्ट्र केसरी विजेत्या शिवराज राक्षेला अवघ्या दहा सेकंदामध्ये आस्मान दाखवत सिकंदर शेख याने ६६वा महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला आहे. पुण्यातील फुलगाव येथे यंदाची ६६वा महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न झाली. यावेळी सिकंदर शेखच्या विजयानंतर कुस्ती चाहत्यांनी एकच जल्लोष केल्याचे दिसून आले.
सेमी फायनलनमध्ये शिवराज राक्षे याने हर्षद कोकाटे याचा पराभव करत फायनल गाठली होती. तर माती विभागात सिकंदर शेखने संदीप मोटेचा सेमी फायनलमध्ये १०-० पराभव करत फायनलमध्ये धडक मारली होती. शिवराज राक्षे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा उचलणार की सिकंदर यंदाचं महाराष्ट्र केसरीचं मैदान मारणार याकडे कुस्ती शौकिनांचं लक्ष लागलेले होते. पण, अखेर सिकंदरने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत बलाढ्य शरीरयष्टीच्या शिवराजला अवघ्या दहा सेकंदात चित करत आस्मान दाखवले.