Monday, May 19, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Cyber Fraud : व्हायरल मेसेजच्या आमिषाला बळी पडू नका! कोणीही फुकट देत नाही, लालच करु नका, अन्यथा दिवाळीत बसेल झटका!

Cyber Fraud : व्हायरल मेसेजच्या आमिषाला बळी पडू नका! कोणीही फुकट देत नाही, लालच करु नका, अन्यथा दिवाळीत बसेल झटका!

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सायबर फ्रॉडपासून सावध रहाण्याचे पोलिसांचे आवाहन


मुंबई : दीपावलीनिमित्त सणासुदीच्या खरेदीला सुरुवात झाली आहे. अनेकांनी दिवाळीची खरेदी केली आहे. तर, काही लोकांना खरेदीसाठी वेळ काढणे शक्य नाही. अशा परिस्थितीत ते ऑनलाइन खरेदी करणे पसंत करतात. ऑनलाइनच्या माध्यमातून अनेक कामे सोपी झाली असली तरी सायबर गुन्ह्याच्या दृष्टीने (Cyber Fraud) ते सुरक्षित नाही. फसवणूक करणारे लोक सणासुदीच्या काळात लोकांवर अधिक लक्ष ठेवतात आणि लोकांना अडकवण्यासाठी ते विविध पद्धतींचा (cyber crime) अवलंब करतात.


दिवाळीत अनेकजण ऑनलाइन खरेदी करतात. अनेकजण अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉल किंवा मेसेजला प्रतिसाद देतात, अशावेळी फसवणुकीची शक्यता असते.


'दिवाळी' आणि 'पूजा' च्या लोकप्रिय नावांचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार विशेषत: ई-कॉमर्स वेबसाइट्सच्या माध्यमातून वापरकर्त्यांना फसवण्यासाठी फसव्या 'डोमेन'चा वापर केला जात आहे. सायबरसुरक्षा संशोधकांनी सणासुदीच्या हंगामाचे भांडवल करून सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असल्याचे म्हटले आहे.


सणासुदीच्या निमित्ताने अनेक प्रकारचे मेसेज व्हायरल होतात. त्यातील काही शुभेच्छा आणि रिवॉर्ड्स किंवा कॅशबॅक सारख्या ऑफर्स देणारे असतात. असे व्हायरल मेसेज फसवणूक करणाऱ्यांनी पसरवलेला सापळा असू शकतो. त्यामध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधणे किंवा लिंकवर क्लिक करणे तुमच्या बँक खात्यासह तुमच्या वैयक्तिक डेटासाठी धोकादायक ठरू शकते.


तुम्हाला कोणत्याही कॉल, ईमेल किंवा मेसेजद्वारे मोफत भेटवस्तूंसारख्या ऑफर मिळाल्यास त्याकडे दुर्लक्ष करा. लिंकवर क्लिक केल्याने किंवा इतर कोणत्याही प्रकारे त्यांच्याशी संपर्क साधल्यास तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता.


यासाठी खरेदी-विक्री करताना सावधानता बाळगावी. गुगलवरून कस्टमर केअर, हेल्पलाइन नंबर शोधू नये. तसेच कोणीही ऑनलाइन लोन घेऊ नये, अनोळखी व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल स्वीकारू नयेत, लाइट बिल न भरल्यास कनेक्शन रात्री कट होईल, असे खोटे मेसेज ब्लॉक करावेत, ऑनलाइन नोकरी सर्च करू नये, अशा सूचना सायबर पोलिसांनी केल्या आहेत.


क्विक सपोर्ट, टीम व्ह्यूवर, एनी डेस्क असे मोबाईल ॲप डाऊनलोड करू नयेत, असेही पोलिसांचे आवाहन आहे. डेबिट, क्रेडिट कार्डचे नंबर व पासवर्ड घरात एका रजिस्टरमध्ये लिहून ठेवावेत, मोबाईलमध्ये ते साठवू नयेत, असाही मोलाचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.



ऑनलाइन घोटाळ्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी काही टिप्स...



  • संशयास्पद ईमेल आणि मेसेजबद्दल सतर्क रहा.

  • पासवर्ड ठेवताना काळजी घ्या.

  • सॉफ्टवेअर आणि अँटीव्हायरस प्रोग्राम्स अपडेट ठेवा.

  • विश्वासार्ह संकेतस्थळांवरुन खरेदी करा.

  • अज्ञात स्त्रोताकडून आलेल्या संदेशांना उत्तर देऊ नका.

  • अनोळखी क्रमांकावरील कॉलवर डेबिट तथा क्रेडिट कार्डची ‘केवायसी’बद्दल माहिती देऊ नका.

  • मोबाईलवरील अश्लील तथा अनोळखी लिंक उघडू नका.

  • ऑनलाइन डिलिव्हरी ॲप बघू नयेत, ऑर्डर देताना कॅश-ऑन डिलिव्हरी करा.

  • सोपा पासवर्ड ठेवू नका आणि दर तीन महिन्याला तो बदला. डेबिट व क्रेडिट कार्डवरील ‘सीसीव्ही’ लपवा.

  • क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवू नका.

  • मित्रांच्या लिंकला उघडून आपला ईमेल आयडी टाकू नका. तसेच काही महिने न वापरलेले मोबाईलमधील ॲप हटवावेत.

Comments
Add Comment