Monday, April 21, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमुंबईकरांना फटाके फोडण्यास फक्त २ तासाचा अवधी

मुंबईकरांना फटाके फोडण्यास फक्त २ तासाचा अवधी

मुंबईच्या प्रदूषणावर हायकोर्टाचे धडाकेबाज निर्देश

मुंबई : मुंबईसह आसपासच्या परिसरात फटाके फोडण्याच्या वेळेवरील निर्बंध मुंबई हायकोर्टाने वाढवले आहेत. आता केवळ रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याची मुभा असेल. यापूर्वीची सायंकाळी ७ ते रात्री १० अशी परवानगी होती. मुंबई महानगर क्षेत्रातील प्रदूषणाच्या प्रश्नावर हायकोर्टात सुनावणी झाली. हवेची गुणवत्ता न सुधारल्यास दिवाळीत मुंबईतील बांधकामांवर निर्बंध लावण्याचे हायकोर्टाने संकेत दिले होते. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष होते.

फटाक्यांच्याबाबतीत प्रशासनानं अधिक गंभीर व्हायला हवे. बेरीयम धातूच्या वापराबाबत सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन व्हायला हवे. काही राज्यांनी याबाबत क्यूआर कोड सारखे चांगले उपाय केलेत, मुंबईत याबाबत काय तपासणी सुरू आहे? असा सवाल हायकोर्टाने प्रशासनाला विचारला.

मुंबई हायकोर्टाने दाखल केलेल्या सुमोटो याचिकेवर सुनावणी करताना आज महत्वाचे निर्देश दिले आहेत. हायकोर्टाने मुंबईतील बांधकाम क्षेत्रावर तूर्तास बंदी नाही, मात्र काही निर्बंध लागू राहतील, असे स्पष्ट केले.

१९ नोव्हेंबरपर्यंत बांधकामातील डेब्रिज वाहून नेणाऱ्या ट्रकवर पूर्णपणे बंदी लागू करण्यात आली आहे. सामानाची ने आण करण्यास मुभा असणार आहे. मात्र डेब्रिज वाहतुकीवर बंदी लागू असणार असल्याचे हायकोर्टाने म्हटले.

हवा गुणवत्ता निर्देशांकाबाबत (एक्यूआय) संदर्भात काम करण्याकरता एक विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. या समितीमध्ये ज्यात नीरी आणि आयआयटी मुंबईतील विषयाशी संबंधित तज्ञ आणि एक निवृत्त प्रधान सचिव नेमण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही समिती पालिकेच्या दैनंदिन अहवालावर काम करून आपला अहवाल दर आठवड्याला तयार करेल. हा अहवाल कोर्टात सादर होणार आहे.

प्रशासनाकडून एक्यूआय नियंत्रित करण्यासाठी अधिक सक्षम प्रयत्न होण्याची गरज असल्याचे आजच्या सुनावणीत अधोरेखित करण्यात आले. पालिकेनं याबाबत स्वतंत्र हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे. त्यासोबत पालिकेची वेब साईट, मोबाईल अॅप यावरही सारी माहिती अपडेट होणं गरजेचं असल्याचे हायकोर्टाने सांगितले. याबाबतीत एमएमआर क्षेत्रातील अन्य पालिकांनीही आपला डेटा अपडेट करायला हवा, असे सांगण्यात आले.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -