Thursday, October 10, 2024
Homeताज्या घडामोडीMaratha Suicides : हिंगोलीत मराठा तरुणाची आत्महत्या

Maratha Suicides : हिंगोलीत मराठा तरुणाची आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी आत्महत्येचे सत्र सुरुच

हिंगोली : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आता दुसर्‍यांदा उपोषण मागे घेतलं आहे. जरांगे यांनी (Maratha Samaj) राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणावर काम करण्यासाठी मुदत दिली आहे. तोपर्यंत जरांगे महाराष्ट्रभर मराठ्यांच्या भेटीगाठीसाठी १५ नोव्हेंबरपासून दौरे करणार आहेत. मराठा आरक्षणासाठी ही काहीशी सकारात्मक चिन्हे असली तरी या मागणीसाठी आत्महत्येच्या घटना (Suicide Cases) काही थांबायचे नाव घेत नाहीत. मनोज जरांगेंनी अनेकदा आत्महत्या न करण्याचे आवाहन करुनसुद्धा हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात एका तरुणाने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील आजरसोंडा येथील आदिनाथ राखोंडे या २७ वर्षीय तरुणाने आपलं आयुष्य संपवलं आहे. मराठा आरक्षण मिळत नसल्याने या तरुणाने घरातील विजेच्या तारांना पकडून आत्महत्या केली. तो उच्चशिक्षित असतानाही नोकरी मिळत नसल्याने तो चिंतेत होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे, ज्यात त्याने त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे.

चिठ्ठीमध्ये आदिनाथने लिहिलं की, ‘एक मराठा लाख मराठा…मी सतत बातम्या पाहत आहे व मला असे वाटत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. माझे उच्च शिक्षण होऊनसुद्धा मला नोकरी मिळत नाही. माझ्या समाजाला न्याय मिळत नाही. त्यामुळे माझा मराठा समाजात जन्म झाला हा गुन्हा झाला आहे का? मी हतबल होऊन आज रात्रीपर्यंत माझे जीवन संपवत आहे’. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात गुरुवारी पहाटे अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -