- जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै
आत्मज्ञानी संतांना “परमेश्वर आहे का?’’ असा प्रश्न कधीच पडत नाही. कारण ते परमेश्वराला पाहू शकतात, ओळखू शकतात, अनुभवू शकतात. त्याच्या अगदी विरोधी विचार समाजातील काही लोकांचे असतात. त्यांच्या ठिकाणी असलेले परमेश्वराबद्दलचे अज्ञान हेच त्याचे कारण आहे. परमेश्वराबद्दल वाट्टेल ते बोलून, स्वतःला नास्तिक म्हणवून घेण्यात अशा लोकांना अभिमान वाटतो. यातील काही लोक म्हणतात परमेश्वराला रिटायर्ड करा, परमेश्वराला वजा करा असे तोंडाला येईल ते बोलतात. प्रत्यक्षात तुम्ही देवाला शिव्या द्या नाहीतर ओव्या म्हणा, ओव्या म्हटल्याबद्दल तो तुम्हाला शाबासकी देत नाही किंवा शिव्या दिल्याबद्दल पाठीत बडगा घालत नाही. त्याची निंदा केली म्हणून तो त्याचा अपमान करत नाही किंवा स्तुती केली म्हणून हुरळून जात नाही. तुम्ही त्याला कितीही गौरविले, तरी तो हुरळून जात नाही पण तुमची जर चार माणसांत स्तुती केली, तर तुम्ही लगेच कॉलर टाईट करता. आमच्यासारखे आम्हीच असे लोकांना वाटते. परमेश्वराला शिव्या दिल्या, तरी तो चिडत नाही. तुम्हाला कुणी शिव्या दिल्या, तर मारामारी करायला तयार. हात वर करायला तयार. परमेश्वर सर्व काही करतो पण “मी करतो’’ असे म्हणत पुढे येत नाही. परमेश्वर ए टू झेड सर्व काही करत असतो, तरीही हे सगळे मी करतो असे म्हणत नाही. वास्तविक त्याच्यामुळे हे सर्व चाललेले आहे, तरीही कधीही त्याने येऊन कुणाला तसे सांगितलेले नाही. मी आहे म्हणून हे सगळे चाललेले आहे असे कुणाला येऊन सांगत नाही.
खरे सांगायचे, तर परमेश्वर किती आचरणीय आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे परमेश्वर सर्व काही करतो व पुन्हा नामनिराळा राहतो कारण तो करताना दिसत नाही. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे करताना तो अशा युक्तीने करतो की तो कुणाला, तरी पुढे करतो. पाठीमागून तोच सर्व काही करत असतो. माणसाला जरा कुठे गायला यायला लागले की त्यांना वाटते आम्ही म्हणजे कोण? जरा पडद्यावर अभिनय करायला लागला की त्याला वाटते आपण सुपरस्टार झालो. जरा प्रवचन करायला लागले, जरा बोलायला लागले की, त्यांना आपण फार मोठे आहोत असे वाटते. आम्हाला असेच एक गृहस्थ भेटले. तो माणूस बेळगावचा. चांगला प्रवचन करायचा. त्यांची व माझी चांगली मैत्री झालेली. ते मला एक दिवस म्हणाले वामनराव तुम्ही जेव्हा प्रवचन करता तेव्हा तुमच्या समोरच्या श्रोतुवर्गाबद्दल काय मत आहे? मी त्यांना म्हटले तुमचा प्रश्न मला कळला नाही पण तुमचे मत काय आहे. ते म्हणाले माझ्यासमोर बसलेला श्रोतुवर्ग मूर्ख आहे असे मला वाटते. मी अगदी चकित झालो. मी काहीच बोललो नाही. एवढा मोठा माणूस व त्याचे विचार हे असे? मी काय बोलणार? त्याने मला विचारले आता तुमचे मत सांगा. मी त्याला सांगितले माझ्यासमोर बसलेला श्रोता हा माझा देव आहे असे मी समजून मी प्रवचन करतो. माझे प्रवचन म्हणजे त्या देवाला दिलेला नैवेद्य आहे. त्यांना ते आवडले की, तो मला मिळालेला प्रसाद आहे. मला ते म्हणाले की, तुमची दृष्टी वेगळीच आहे. सांगायचा मुद्दा जरा प्रवचन करायला लागले की आपण मोठे असे त्याला वाटू लागले. सांगायचा मुद्दा परमेश्वराकडून हे शिकण्यासारखे आहे. परमेश्वराच्या बाबतीचे सगळेच विराट, अफाट,अचाट असूनसुद्धा तो किती नम्र आहे! परमेश्वर हा खरेतर सर्व दृष्टीने स्थितप्रज्ञ आहे,सर्व दृष्टीने आदर्श आहे, सर्व दृष्टीने अनुकरण करावे असा आहे. आपण त्याचे अनुकरण केले पाहिजे.