आरोप खोटा असल्यास याचिकाकर्त्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोका
आमदार नितेश राणे यांचं ओपन चॅलेंज
मुंबई : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी भर विधानसभेत महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर देशभरातून त्यांच्यावर टीका होत आहे. मात्र, त्यांच्या इंडिया अलायन्समधील (INDIA Alliance) ठाकरे गटाने (Thackeray Group) याविषयी निषेध व्यक्त करायचा सोडून त्याचे समर्थनच केले आहे. त्यामुळे त्यांचा महिलांबाबतचा दृष्टीकोन किती वाईट आहे, हेच दिसून आले. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही आज भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय येथे पत्रकार परिषद घेत या प्रकरणी उबाठा नेत्यांना चांगलेच सुनावले आहे.
नितेश राणे म्हणाले, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांबद्दल विधानसभेत जे गलिच्छ विचार मांडले आहेत, त्यानंतर देशभरातून प्रत्येकाच्या तोंडून एक मुख्यमंत्री असे विचार कसा करु शकतो यावर टीका होत आहे. पण असं असताना आज सकाळच्या पत्रकार परिषदेत आम्हाला अपेक्षा होती की, ज्या इंडिया अलायन्समध्ये उद्धव ठाकरेंचा पक्ष आहे, त्या उरलेल्या पक्षाच्या वतीने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा कामगार नितीश कुमारवर टीका करेल, निदान त्यांचा निषेध करेल. पण या पत्रकार परिषदेत नितीश कुमारांवर टीका ही लांबची गोष्ट पण त्यांनी माफी मागितली ना मग आता विसरुन जा, अशा गलिच्छ मानसिकतेचं प्रदर्शन झालं, अशी टीका नितेश राणे यांनी केली.
जेव्हा सनातन धर्माला शिव्या घातल्या गेल्या तेव्हाही अलायन्समधील लोकं काहीही बोलली नाहीत. आता तर माताभगिनींबद्दल एवढे गलिच्छ विचार मांडल्यानंतरही त्यावर काही न बोलणं म्हणजे यांची खरी मानसिकता आणि महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, याचं हे उत्तम उदाहरण आहे, असं नितेश राणे म्हणाले.
स्वप्ना पाटकर यांच्या घरावर एक वाजता बाटल्या मारल्या गेल्या
आज सकाळी एका वृत्तपत्रात आलेल्या एका बातमीबद्दल मला आश्चर्य वाटतं की ही बातमी सर्व चॅनल्सवर का चालली नाही? पत्राचाळमधील ज्या महत्त्वाच्या वीटनेस आहेत, स्वप्ना पाटकर त्यांच्या घरावर एक वाजता बाटल्या मारल्या गेल्या. त्या घरामध्ये त्या आणि त्यांच्या वयस्कर आई राहतात. त्यानंतर त्यांना ‘तू जास्त टिवटीव करते तुला कोण वाचवणार, तू जास्त कोर्टात आवाज केलास, जास्त मोठ्या लोकांची नावं घेतलीस तर तुला आम्ही बघून घेऊ’ असं धमकीचं पत्र दिलं गेलं.
कोण स्वप्ना पाटकर?
स्वप्ना पाटकर नेमक्या कोण आहेत यावर खुलासा करताना नितेश राणे म्हणाले, ज्या बाईला शिव्या देताना संजय राऊत यांची एक क्लिप व्हायरल झाली होती, त्या डॉ. स्वप्ना पाटकर. त्यांच्या घरात जे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे, त्याला जबाबदार कोण? हे घरातला लहान मुलगा देखील सांगू शकेल. खिचडी आणि कोविड घोटाळ्यात संजय राऊत यांचा भागीदार असलेला सुजित पाटकर जेलमध्ये आहे. मग स्वप्ना यांना धमकी नेमकं कोण देत असेल?
राज्यातल्या एका महिलेच्या घरी रात्री एक वाजता बाटली मारली जाते याला जबाबदार कोण? संजय राजाराम राऊत बोलणार का की माझा या प्रकरणात काही संबंध नाही? माझा या डॉक्टर महिलेशी काही संबंध नाही, असं त्याने प्रेसमध्ये येऊन सांगावं. मी स्वतः यासंबंधी पाठपुरावा करणार आहे. मी स्वतः त्या महिलेच्या कुटुंबाला भेट देणार आहे. आमचं सरकार असताना असं जर कुणी महिलेला धमकावत असेल तर त्या व्यक्तीला आम्ही सोडणार नाही, हे लक्षात ठेवावं, असं नितेश राणे यांनी ठणकावलं.
जसा कामगार, तसा मालक
‘जसा कामगार, तसा मालक’, असाच प्रकार दिशा सालियन आणि सुशांत सिंहच्या केसमध्ये झाला आहे. ओझा नावाचे जे संबंधित तक्रारदार आहेत त्यांनी अशी अधिकृत माहिती दिली आहे की, दोन्ही प्रकरणांची जी कोर्टात केस सुरु होईल त्यात आदित्य ठाकरेला चौकशीला बोलवा, त्याचे मोबाईल टॉवर लोकेशन हे दिशा सालियन आणि सुशांतबरोबर मॅच होतायत. आदित्य आणि रिया यांचे आपसांतले चॅट हे ड्रग्जसंदर्भात आहेत, ही माहिती याचिकाकर्त्यांनी दिली आहे. हा नितेश राणेंचा कुठलाही राजकीय आरोप नाही, असं नितेश राणे म्हणाले.
उद्धव ठाकरेंकडून याचिका कर्त्याला ५० खोक्यांची ऑफर
ही याचिका मागे घ्यावी याकरता उद्धव ठाकरेंकडून या याचिका कर्त्याला ५० खोक्यांची ऑफर देण्यात आली आहे. एकीकडे ५० खोके असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करुन टाळ्या मिळवायच्या आणि दुसरीकडे शक्ती कपूरसारखी प्रवृत्ती असणार्या मुलाला वाचवण्यासाठी ५० कोटींची ऑफर द्यायची! जर ही माहिती खोटी असेल तर तुम्ही आमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोका, असं याचिकाकर्ता स्वतः म्हणाला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना नितेश राणे यांनी हा दावा ठोकण्याचं आवाहन केलं आहे.
महिलांकडे तिरक्या नजरेने बघणं बंद करा
महिला सुरक्षिततेचा प्रश्न हा मुळात मातोश्रीपासून सुरु करावा. अगर शक्ती कायदा लागू झाला तर सर्वात पहिली संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना अटक होईल. मविआच्या नेत्यांना मी सांगेन की तुमच्या जेव्हा बैठका होतात तेव्हा उद्धव ठाकरे आणि संजय राऊतला सांगा की महिलांकडे तिरक्या नजरेने बघणं बंद करा, असं नितेश राणे म्हणाले.
मातोश्रीमध्ये काय वस्त्रहरण सुरू आहे?
संजय राऊत यांनी केलेल्या कॅबिनेटमध्ये गँगवॉर सुरु आहे, या टीकेला चोख प्रत्युत्तर देत नितेश राणे म्हणाले, मातोश्रीमध्ये काय वस्त्रहरण सुरू आहे? मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर काय चाललं आहे? तुझ्या मालकाचे आणि त्याच्या मुलाचे काय चाळे सुरु आहेत? कॅबिनेटमध्ये काय सुरु आहे हे बघण्यासाठी तू काय चहा द्यायला तिथे गेला होतास का? माझ्या माहितीनुसार सगळं काही आलबेल होतं आणि आहे. त्यामुळे उगाच आग लावण्याचं काम करु नये, तुला जर का सामनामधील नोकरी पुरत नसेल तर तुला मंत्रालयात चहा देण्याची नोकरी देऊ, असं नितेश राणे म्हणाले.