मुंबई : गेल्या काही दिवसांत डीपफेक (Deepfake video) प्रकरण खूप चर्चेत आलं आहे. रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna), कैतरिना कैफ (Katrina Kaif) यांचे डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) झाले. यानंतर सारा तेंडुलकरचाही (Sara Tendulkar) शुभमन गिलसोबत (Shubhman Gill) फोटोशॉप (Photoshop) केलेला फेक फोटो (Fake Photo) व्हायरल झाला. यावर मोठमोठ्या सेलिब्रिटींनीही (Celebrities) तीव्र निषेध व्यक्त केला. त्यानंतर आता मेटा (Meta) या प्रकरणी ठोस पावले उचलणार असून जानेवारीपासून डीपफेकला आळा घालण्यासाठी नवे नियम लागू करण्यात येणार आहेत.
मेटा कंपनी डीपफेक एडिटेड फोटो आणि व्हिडिओ अपलोड करण्याबाबत नवीन नियम लागू करणार आहे. यानुसार यूजरला (User) मूळ फोटोमध्ये काय बदल केले आहेत याबाबत कंपनीला माहिती द्यावी लागणार आहे. पुढील नियम कंपनीकडून १ जानेवारीपासून लागू होणार आहेत :-
- डिजिटली एडिट केलेल्या फोटो किंवा व्हिडिओबाबत क्रिएटर्सना कंपनीकडे खुलासा द्यावा लागेल.
- एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीने केलेलं वक्तव्य खरं आहे का, व्हिडिओ किंवा फोटोमध्ये दिसणारी घटना खरी आहे का यासंबंधी माहिती द्यावी लागेल.
- फोटो किंवा व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती खरी आहे की एआयने तयार केलेली आहे याची माहिती द्यावी लागेल.
- एखाद्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये एखादी खरी घटना सांगितली असेल, तर सोबत जोडलेला फोटो खरा आहे की प्रतिकात्मक, किंवा सोबतचा व्हिडिओ खरा आहे की नाट्यरुपांतर याबाबत देखील कंपनीला सांगावं लागणार आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे नियम फेसबुक आणि इन्स्टाग्राम या दोन्ही प्लॅटफॉर्मवर लागू होतील. जर एखादा यूजर ही माहिती देत नसेल आणि वारंवार माहिती देण्यास टाळाटाळ करत असेल, तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.