Gajanan Maharaj : संतांची नि:शब्द दृष्टिभेट

Share
  • गजानन महाराज : प्रवीण पांडे, अकोला

शेगाव येथे श्री गजानन महाराजांचा महिमा ऐकून महाराजांना भेटावयास मोठमोठे साधुसंत येत असतं. असेच एकदा धार कल्याणचे रंगनाथ स्वामी, जे मोगलाईमधील थोर साधू होते ते महाराजांच्या भेटीस्तव आले. महाराज आणि रंगनाथ स्वामींची बैठक झाली. दोघांची सांकेतिक पद्धतीने अाध्यात्मिक बोलणी झाली. पण ते एकमेकांसोबत काय बोलले हे समजण्यास समर्थ असे कोणीही तेथे नव्हते. सिद्ध संतांचे संकेत समजून घेणे याकरता वेगळेच सामर्थ्य (साधना) असावे लागते. असाच एक संत भेटीचा प्रत्यक्ष अनुभव प्रस्तुत लेखकाला देखील सद्भाग्याने अनुभवता आला. थोडक्यात सांगतो.

आकोट येथील केशवराज मंदिरात चातुर्मासात वेगवेगळे ग्रंथ पठण व प्रवचन होते. आकोट येथील अधिकारी सत्पुरुष श्री जगन्नाथ शास्त्री अग्निहोत्री यांची प्रवचने ऐकण्याचा आनंद बरेचदा मी देखील घेतला आहे. असेच प्रवचन तेथे सुरू असताना कोणीतरी येऊन सांगितले की, “एक संत, ज्यांना गजानन महाराज असेच नामाभिधान होते, ते जगन्नाथ शास्त्रींची भेट घ्यावयास आले आहेत व आताच भेटू इच्छितात.” शास्त्रीबुवांनी त्याकरिता अनुमती दिली. ते संत मंदिरात आले. श्री जगन्नाथ शास्त्री उठून उभे राहिले. दोघेही सत्पुरुष एकमेकांपुढे उभे होते. कोणीही एक शब्द देखील बोलले नाहीत. असे एकमेकांना न्याहाळत साधारणपणे १५-२० मिनिटे उभे होते. सर्व भाविक दिड्.मूढ होऊन नुसते बघत होते. काय सुरू आहे कोणासही काहीच कळत नव्हते. अचानक दोन्ही संतांच्या नेत्रांतून अश्रुधारा वाहू लागल्या. अशा अवस्थेत पाच-सात मिनिटे झाली असावीत. दोन्ही संतांनी एकमेकांना भावविभोर होऊन दृढ आलिंगन दिले. इतका वेळ जी भेट झाली, ती मात्र नि:शब्द होती. (कारण त्या निःशब्द भेटीचा अन्वयार्थ जाणून घेण्याचे सामर्थ्य माझ्यात तरी नव्हते. इतरांबद्दल म्या पामराने काय वदावे?)

उपस्थित भाविक भक्तांच्या नेत्रांतूनदेखील ही भेट पाहून अश्रू ओघळले. अशी ही विशेष प्रकारची संत भेट पाहावयास मिळणे हे आम्हा सर्वांचे अहोभाग्यच म्हणावे लागेल.

एकदा महाराजांना भेटण्याकरिता श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज (टेंबे स्वामी महाराज) उद्या येणार आहेत असे श्री गजानन महाराजांनी आपल्या शिष्यांना (बाळा भाऊ यांना) सांगितले. महाराज हे अंतर्ज्ञानी होते हे आपणा सर्वांना विदितच आहे. त्यावेळी महाराजांनी बाळाभाऊंना सांगितले:
अरे बाळा उदयिक। माझा बंधू येतो एक।
मजलागी भेटण्या देख। त्याचा आदर करावा॥७०॥
तो आहे कर्मठ भारी। म्हणून उद्या पथांतरी।
चिंध्या न पडू द्या निर्धारी। अंगण स्वच्छ ठेवा रे॥७१॥
चिंधी कोठे पडेल जरी। तो कोपेल निर्धारी।
जमदग्नीची आहे दुसरी। प्रतिमा त्या स्वामीची॥७२॥
तो कऱ्हाडा ब्राह्मण। शुचिर्भूत ज्ञान संपन्न।
हे त्यांचे कर्मठपण। कवचापरी समजावे॥७४॥
ऐसे बाळास आदले दिवशी। सांगते झाले पुण्यराशी।
तो एक प्रहर दिवसासी। स्वामी पातले ते ठाया॥७४॥

यापुढे श्री गजानन महाराज आणि श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची भेट कशी झाली त्याचे वर्णन आले आहे. ही भेटसुद्धा वर उल्लेखिलेल्या भेटीप्रमाणे जरी नि:शब्द वाटत असली तरी दोघेही महान संत सत्पुरुष नेत्र संकेतांद्वारे एकमेकांशी बरेच काही बोलले. जे समजणे आपणास शक्य नाही.
या प्रसंगाचे श्री दासगणू महाराज यांनी जे ओवीबद्ध अलंकारिक वर्णन केले आहे त्याची सुंदरता पाहूया:
एक कर्माचा सागर। एक योगयोगेश्वर।
एक मोगरा सुंदर। एक तरू गुलाबाचा॥
एक गंगा भागीरथी। एक गोदा निश्चिती।
एक साक्षात पशुपति। एक शेषशायी नारायण॥७७॥

मागे एका लेखात उल्लेख आला होता त्याचा पुनरुच्चार करण्याचा मोह आवरत नाही. श्री गजानन विजय ग्रंथात संत कवी दासगणू महाराज यांनी रूपक, उपमा, उपमेय, उपमान अशा अनेक अलंकारांची खूप सुंदर अशी उधळण केलेली आहे. त्यामुळे भक्ती आणि अध्यात्म यासह ग्रंथाची गोडी आणि सुंदरता याचा प्रासादिक रसास्वाद असा दुहेरी लाभ घेता येतो.

वासुदेवानंद सरस्वती स्वामी जेव्हा मठात आले, त्यावेळी महाराज आपल्या पलंगावर चीटक्या वाजवीत बसले होते. दोघा सिद्ध पुरुषांची, महान तेजस्वी संतांची क्षणैक दृष्टिभेट झाली आणि लगेच वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी महाराजांना परत जाण्याची आज्ञा मागितली. महाराजांनी देखील मान तुकवून त्यास अनुमती दिली आणि स्वामी महाराज तेथून निघून गेले. हे सर्व पाहून बाळाभाऊंना कौतुक वाटले. पण सोबतच त्यांच्या मनात संशय उद्भवला आणि त्यांनी महाराजांना प्रश्न केला, “महाराज तुमचा आणि या स्वामींचा मार्ग तर अगदी भिन्न आहे (कर्म मार्ग, भक्ती मार्ग, योग मार्ग) तरी देखील हे स्वामी तुमचे बंधू कसे?” आणि इथे महाराजांनी बाळाभाऊंना ईश्वराकडे ( ईश्वरासंनिध) जाण्याकरिता असलेल्या तिन्ही मार्गांचे मर्म सविस्तरपणे विषद केले आहे. ते पुढील लेखांकात पाहू.

क्रमशः

Recent Posts

अनधिकृत इमारतींची संख्या ही ११० ने वाढली

पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…

5 minutes ago

जलवाहिनी फुटल्याने २४ तास ‘पाणीबाणीचे’ मुंबईकरांसमोर संकट

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…

42 minutes ago

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

2 hours ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

4 hours ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

4 hours ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

4 hours ago