Tuesday, March 18, 2025
Homeताज्या घडामोडीसंगमनेरमधील कारागृह फोडून फरार झालेले चार कैदी जामनेरमध्ये सापडले

संगमनेरमधील कारागृह फोडून फरार झालेले चार कैदी जामनेरमध्ये सापडले

पलायन नाट्याचे वास्तव आता समोर येणार

संगमनेर : संगमनेर शहर पोलीस ठाण्यालगतचा उप कारागृह फोडून गंभीर गुन्ह्यातील चार आरोपींनी बुधवारी सकाळी पलायन केले होते. या घटनेने संगमनेरच्या उप कारागृहाची सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर आलेली असतानाच आता या प्रकरणात अवघ्या तीस तासांतच समाधानकारक वार्ता समोर आली आहे. अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये मुसंडी मारीत चारही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे या प्रकरणी निलंबन झालेल्या पोलीस कर्मचार्‍यांची दिवाळी गोडच होणार आहे.

अवघ्या तीस तासांत आरोपी हाती लागल्याने पोलिसांचे कौतुक असले तरीही ते पळूनच कसे गेले या प्रश्‍नाचे उत्तर मात्र अनुत्तरीतच आहे. त्यामुळे हाती लागलेल्या आरोपींच्या पोलीस कोठडीतून या संपूर्ण पलायन नाट्यामागील सत्य समोर आणण्याची आवश्यकता आहे.

बुधवारी (ता. ८) भल्या सकाळी संगमनेरचे उपकारागृह फोडून खून, अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यातील चार आरोपी पळून गेल्याचे वृत्त धडकले. या वृत्ताने पोलिसांसह गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

पळून गेलेल्या आरोपींमध्ये तीन वर्षांपूर्वी वडगावपानमध्ये झालेल्या हत्येप्रकरणी गजाआड असलेला, तालुका पोलिसांचा आरोपी राहुल देवीदास काळे, घारगावच्या हद्दित खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी २०२२ पासून गजाआड असलेला आरोपी मच्छिंद्र मनाजी जाधव, २०२१ मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा अनिल छबू ढोले आणि अन्य दुसर्‍या अत्याचाराच्या कलमान्वये अटकेत असलेला रोशन रमेश दधेल उर्फ थापा यांचा समावेश होता. या आरोपींमधील दोघांवरील खटले अंतिम टप्प्यात असून आत्तापर्यंत झालेली सुनावणी आणि सरकारी पक्षाने समोर आणलेल्या पुराव्यांचा अंदाज बांधून आपल्याला मोठी शिक्षा होईल अशी धास्ती त्यांच्या मनात निर्माण झाली.

प्रदीर्घकाळ गजाआड सडण्यापेक्षा तुरुंग फोडून पळून जाण्यात त्यांनी धन्यता मानली आणि बुधवारी धूम ठोकली, अशी प्राथमिक माहिती आहे.

या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या पथकासह, संगमनेर शहर, तालुका, घारगाव आणि श्रीरामपूर अप्पर अधीक्षकांच्या पथकांकडून छापेमारी सुरु असतांना अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडूनही आरोपींचा माग काढला जात होता.

पळून गेलेल्या आरोपींमध्ये रोशन दधेल उर्फ थापा नावाचा आरोपी नेपाळशी संबंधित असल्याने सर्व आरोपी त्याच दिशेने जाण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांची संपूर्ण नजर त्याच दिशेने फिरत असतांना आरोपींनी पळून जाण्यासाठी वापरलेल्या वाहनात जळगाव जिल्ह्यात बिघाड झाल्याची माहिती मिळाली. त्याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक त्याच जिल्ह्यात असल्याने याबाबत त्यांना सूचना देण्यात आली. तेथून आरोपी थांबलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यापूर्वीच आरोपी तेथून निघाल्याचे समजले.

त्यामुळे ते हाती येतायेता सटकलेत की काय असे वाटत असतांनाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निकराने पुढील तपास करीत त्यांचा माग काढला आणि जळगाव जिल्ह्यातील जामनेर जवळ अगदी दाक्षिणात्य सिनेमाला शोभाव्या अशा फूल्ल अ‍ॅक्शनसह पाठलाग करीत चौघांच्याही मुसक्या आवळल्या.

त्या चौघांसह वाहनचालकालाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांना संगमनेरात आणले जात आहे. तुरुंग फोडून पळून जाण्यासह हातात जीवघेणे शस्त्र घेवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्या चौघांवर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे संगमनेरात आणताच त्यांना त्या गुन्ह्यात अटक करुन न्यायालयाकडून त्यांची कोठडी मिळवली जाणार आहे. त्यातून या पलायन नाट्याचे वास्तव समोर येण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -