Dnyaneshwari : असा हवा एक चष्मा…


  • ज्ञानेश्वरी : प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे


चष्मा घातला की सारी सृष्टी लख्ख दिसू लागते. अगदी तसेच माऊलींची ‘ज्ञानेश्वरी’ हा देखील एक चष्मा आहे. तो आपल्या डोळ्यांवर चढला की, आपल्यासह सारं जग नीट दिसायला लागतं, कळायला लागतं, जाणवायला लागतं. काही गोष्टी आपल्याला माहीत असतात, पण त्या कळत नाहीत. कळल्या तरी ‘वळत नाहीत’ हे वळण देण्याचं काम माऊलींची ‘ज्ञानेश्वरी’ करते.


क साधासा प्रसंग, रोजच्या जगण्यातला! काही दिवसांपूर्वी लक्षात आलं की, मला धुसर दिसतं आहे. चष्मेवाल्याकडे गेले तेव्हा कळलं, काचेवर ओरखडे उमटले आहेत. मग डॉक्टरांनी डोळे तपासले, तर क्रमांक वाढलेला. त्याप्रमाणे चष्मा बनवून घेतला. मग सारी सृष्टी लख्ख दिसू लागली. छोट्या, मोठ्या गोष्टी स्पष्ट पाहताना किती आनंद!



हे सांगायचं कारण म्हणजे माऊलींची ‘ज्ञानेश्वरी’ हा देखील एक चष्मा आहे. तो आपल्या डोळ्यांवर चढला की, आपल्यासह सारं जग नीट दिसायला लागतं, कळायला लागतं, जाणवायला लागतं. काही गोष्टी आपल्याला माहीत असतात, पण त्या कळत नाहीत. कळल्या तरी ‘वळत नाहीत’ हे वळण देण्याचं काम माऊलींची ‘ज्ञानेश्वरी’ करते. आपण अनेकांकडून ऐकलं आहे, या जगात टिकाऊ काय आहे! शरीर, तारुण्य, पैसा, प्रसिद्धी, नातीगोती? हे काहीच नाही. पण तरीही आपल्याला या गोष्टींचा नको इतका मोह असतो. हा मोह दूर करण्याचं कार्य ‘माऊली’ करत आहेत… तब्बल सातशे पंचवीस वर्षं!



तेराव्या अध्यायात ज्ञानदेवांनी काय करावं, याचबरोबर काय करू नये हे सांगितलं आहे. आजच्या भाषेत बोलायचं, तर ‘Do’s & Don’t’ याविषयी आपण मागच्या लेखात बोललो. आज त्याचाच पुढील भाग पाहू या.



श्रीकृष्णांच्या तोंडून ज्ञानदेव बोलतात - “हे धनंजया, जो आपले घरदार, संपत्ती, देह व आपला सध्याचा जन्म याविषयी काहीसुद्धा विचार करीत नाही” (ओवी क्र. ७२८)



तर अशा माणसाविषयी बोलताना ज्ञानदेवांनी कोणते दाखले दिले आहेत!
‘द्वाड कुत्र्याचे कान आणि शेपूट कापून त्याला घरातून हाकून लावले, तरी ते रक्त गळत असताना जसे पुन्हा त्याच घरात शिरते’ (ओवी क्र. ७३०)



‘त्याप्रमाणे अंगात लूत भरून नऊ दार वाहत असतानाही ज्याच्या मनात आपली अशी स्थिती होण्याचे कारण काय याचा विचारसुद्धा येत नाही.’ (ओवी क्र. ७३२)



किती किळसवाणं चित्र आहे हे! मुद्दामून काढलेलं! माणूस म्हणून जन्माला आल्यावर आपलं ध्येय काय हे अज्ञानी समजत नाही. तो नको त्या गोष्टींच्या मागे लागतो, अगदी मरेपर्यंत! त्यात गुरफटतो. हे विषय, वासना यांच्यात अडकणं किती भयंकर आहे! याचं चित्र कुत्र्याच्या उदाहरणातून देतात, जणू आरसा धरतात. सर्वांना त्यापासून दूर होण्यासाठी ज्ञानदेव असं जागं करतात. त्यासाठी दाखल्यांची मालिकाच मांडतात.



त्यासाठी पुढे ओवी येते, “हे महाबाहो अर्जुना, तो (असा मनुष्य) अज्ञानरूप देशाचा राजा या म्हणण्यात काही शंका नाही.” (ओवी क्र. ७५३)



‘अज्ञानाचा राजा!’ एरवी राजा ही पदवी चांगली! पण इथे ती अज्ञानाच्या संदर्भात ते वापरतात. अशा उपरोधामुळे, तिरकस पद्धतीमुळे उपदेशाचा परिणाम खूप वाढतो. तो उपदेश श्रोत्यांच्या मनात अधिक नीटपणे पोहोचतो. ही ज्ञानदेवांची अलौकिक प्रज्ञा आणि प्रतिभा!



पर्वताच्या शिखरावरून धोंडा सुटल्यावर त्याला ज्याप्रमाणे आपलं पुढे काय होईल, हे माहीत नसते, त्याप्रमाणे जो आपल्याला वृद्धावस्था येऊन आपली काय स्थिती होईल याकडे लक्ष देत नाही. ती ओवी -
कडाडीं लोटला गाडा। कां शिखरौनि सुटला धोंडा॥
तैसा न देखे जो पुढां। वार्धक्य आहे॥ (ओवी क्र. ७५५)



किती प्रभावी पद्धतीने वर्णन, उपदेश केला आहे! हे वाचून आपण त्यासंबंधी विचारप्रवृत्त होणार नाही काय!



ही आहे ‘ज्ञानेश्वरी’तून मिळणारी अचूक दृष्टी - “सांगा कोण राहील मग दुःखी-कष्टी!”



(manisharaorane196@gmail.com)

Comments
Add Comment

कधी आहे कार्तिक महिन्यातील विनायक चतुर्थी? जाणून घ्या मुहूर्त, योग आणि पूजा विधी

मुंबई : प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी गणपती बाप्पाला समर्पित असते. शुक्ल पक्षातील

आज आहे लक्ष्मीपूजन: धन, समृद्धी आणि ऐश्वर्याचे स्वागत!

मुंबई : लक्ष्मीपूजन हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे, जो दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवातील मुख्य

दिवाळीचा आठवडा: 'या' ५ राशींवर माता लक्ष्मीची विशेष कृपा! धनलाभाचे योग

मुंबई : दिवाळीच्या प्रकाशाने केवळ घरेच नव्हे, तर अनेकांचे नशीबही उजळून निघणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सोमवार,

नरकचतुर्दशी : अभ्यंगस्नान आणि नरकासुराचा वध!

मुंबई : आज सर्वत्र दिवाळीच्या उत्साहात नरकचतुर्दशी साजरी होत आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी

आज धनत्रयोदशी, लक्ष्मी-कुबेर पूजनासाठी सर्वोत्तम मुहूर्त 'हे' दोन तास अत्यंत महत्वाचे

अश्विन कृष्ण त्रयोदशी किंवा धनत्रयोदशी आज साजरी होत आहे. पंचांगानुसार, त्रयोदशी दुपारी १२:१८ वाजता सुरू होईल आणि

वसुबारस २०२५; तिथी, पूजा विधी, कालावधी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

हिंदू धर्मातील वसुबारस या सणाला अत्यंत धार्मिक महत्त्व आहे. महाराष्ट्र आणि गुजरातसह देशाच्या विविध भागांत हा सण