कोकणातला अंतुबर्वा

  102

माझे कोकण: संतोष वायंगणकर

सुप्रसिद्ध साहित्यिक, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकात त्यांना रत्नागिरीत भेटलेल्या अंतुबर्वा याच्या चिकित्सक आणि तितक्याच बेरक्या स्वभावगुण वैशिष्ट्याचं व्यक्तिचित्रण आहे. पु. ल. देशपांडे या अंतुबर्व्याविषयी मराठी साहित्यविश्वात प्रचंड अप्रुप आहे. कोकणातील माणसांचे स्वभावगुण वैशिष्ट्यच पु.लं.नी या अंतुमध्ये शोधले आहेत. कोकणी माणसाचा तिरकसपणा, कुणाला चांगले म्हणण्यासाठी फारच आढे-वेढे घेण्याचा स्वभाव. असा एकूणच कोकणातील माणसांचा असलेला स्वभाव हा अंतुबर्व्याच्या रूपाने जरी पु.लं.ना रत्नागिरीत भेटला असला तरीही कोकणातील प्रत्येक गावात एकतरी अंतुबर्वा असावा असं वाटते. अंतुबर्वा या मानसिकतेतला गावो-गावी एकतरी माणूस कोकणातल्या गावातून भेटल्याशिवाय राहणार नाही. कोकणात कौतुकाने काही नव्याने करायला जावं किंवा काही नवीन सांगायला जावं तर निश्चितपणे त्याला छेद किंवा विरोध झाल्याशिवाय राहणार नाही.


कोकण ही बुद्धिवंताची खाण म्हणून ओळखली जाते. साहित्य, नाटक, पत्रकारिता, राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक अशा कोणत्याही क्षेत्रात कोकणातील कोणी अग्रभागी नाही असं होऊच शकत नाही. प्रचंड बुद्धिमत्ता आहे; परंतु संयमीपणा नाही. या तिरकसपणामुळे आपलं नुकसान होऊ शकते याची जाणीव कधी-कधी आपणालाच नसते. कोकणातील प्रकल्प, कोकणचा विकास आणि लोकभावना यातली नकारात्मकता यामुळे आजवर नुकसानच झाले आहे. प्रगतीच्या विकासाच्या आड येणारे हे स्वभावगुण आपण बदलले पाहिजेत. एखाद्या मोठ्या विकास प्रकल्पाचा कसा विचका होऊ शकतो, त्यासाठी शिरोडा-वेळागर येथील ताजच्या पंचतारांकित प्रकल्पाचे उदाहरण नजरेसमोर घेता येईल.


गेल्या पंचवीस वर्षांत शिरोडा-वेळागरचा विषय राजकीय इश्यू बनवला गेला. सोईनुसार ज्यांने-त्यांने या विषयाचे राजकारण केले. फक्त विद्यमान केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शिरोडा-वेळागर येथे पंचतारांकित हॉटेल प्रकल्प व्हावा अशी भूमिका मांडली. सर्व्हेनंबर ३९ वगळावा किंवा कसे हा चर्चेचा संवादाचा विषय होता; परंतु जेव्हा कधी या प्रकल्पाला विरोध होत राहिला त्यामागेही कोणताही चर्चेचा विषय नव्हता. फक्त विरोध करणे एवढीच भूमिका घेण्यात आली होती. कधी विरोध तर कधी प्रकल्पाच्या बाजूने अशा सोयीच्या भूमिका अनेकांनी घेतल्या. विरोध करण्यासाठी माजी आ. कै. पुष्पसेन सावंत, माजी खासदार कर्नल सुधीर सावंत, समाजवादी कार्यकर्ते माजी सभापती जयप्रकाश चमणकर, सर्वच प्रकल्पांना विरोध करणारे खा. विनायक राऊत, आताचे विरोध करणारे माजी आमदार राजन तेली या सर्वांनी आताही विरोधी भूमिका घेतली आहे. जेव्हा-जेव्हा ज्यांना वाटतं शिरोडा-वेळागर प्रकल्पातील सर्व्हे नंबर ३९ वगळला गेला पाहिजे असे वाटणाऱ्यांनी सत्तेच्या काळात कधीच प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही. गेली पंचवीस-तीस वर्षे एखाद्या विषयाचे राजकारण फक्त केले जाऊ शकते. हे नको तर काय हवं हे सांगायचं धाडस आणि तसे प्रयत्न कधीच कोणी केले नाहीत.


अखंड कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अलीकडचा पालघर जिल्हा या सर्वांकडे पाहिले आणि कोण-कोणते प्रकल्प कोणा-कोणाच्या विरोधी भूमिकेने बासणात गुंडाळले गेले त्यावर जरी एक नजर टाकली तरीही प्रकल्पांना विरोध करणारे कोण आहेत. विरोध करण्यामागची कारणं काय आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या मुळाशी एकच उत्तर मिळेल ते म्हणजे फक्त विरोधासाठी विरोध आणि राजकारण... माणसं तीच, चेहरे तेच, मुखवटेही तेच अशा या सर्वांमुळे कोकण विकासापासून दूर नसला तरीही मागे का? या प्रश्नाचे उत्तर आपसूकच मिळून जाते. सकारात्मकतेने विचार करण्याची कुणाचीही मानसिकता नाही. राजकीय फायद्या-तोट्याची गणितं मांडत होणाऱ्या विरोधाने काय नुकसान होतं याचं दुसरं उत्तम उदाहरण म्हणजे चिपी विमानतळ. गोवा राज्यातील आंतरराष्ट्रीय मनोहर विमानतळाची जेव्हा चर्चा नव्हती तेव्हा कोकणातील सिंधुदुर्गात चिपी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ उभा करण्याचा प्रयत्न केला गेला. जेव्हा या चिपी विमानतळ भूमिपूजन समारंभालाच काळे झेंडे घेऊन विरोध झाला.


पुढे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा सद्हेतू ठेवून त्यासाठी आवश्यक असणारी जमीन संपादनाच्या विषयात पेन्सिल नोंदीच नसलेलं भूत उभं केलं गेलं. या विरोधाच्या काळात गोव्यातील मोपा येथे विमानतळाचे भूसंपादन होऊन मोपाला आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरूही झाले. कधीतरी राजकारणापलीकडे सर्व लोकप्रतिनिधी याचा विचार करणार की नाही? प्रकल्पांना विरोध करून एखादी आमदारकी वातावरण बिघडवून पदरात पाडून घेऊ शकते. त्या पलीकडे जाऊन विकासाच काय झालं? काय होणार? यावर जे विरोध करतात, त्यात कुणाची तरी जबाबदारी घेऊन सांगतील काय? कोणताही प्रकल्प किंवा विकासाचा चांगला विचार घेऊन काही चांगलं उभं राहात असेल तर ते मोडून टाकण्यासाठी फार डोकं लावावं लागत नाही. आपल्याकडे कोणतंही मोडून टाकण्यासाठी अनेक डोकी कामाला लागतात; परंतु चांगलं काही उभं राहण्यासाठी आपणाला बदलावं लागेल. पु.लं.च्या व्यक्ती आणि वल्लीमधील तिरकस अंतुबर्वाचा आत्मा आजही गावा-गावांत वावरतोय एवढं मात्र खरं...!

Comments
Add Comment

बेस्टची वैभवशाली सेवा आणि भवितव्य

येत्या गुरुवारी ७ ऑगस्ट रोजी बेस्ट उपक्रमाचा ७८वा वर्धापन दिन आहे. बेस्ट (बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन

खड्ड्यांच्या शापातून रस्त्यांना मुक्ती कधी?

कोणत्याही कामाचे योग्य प्रकारे नियोजन केले तर त्याची दुरवस्था होत नाही. विशेषत: राज्यातील रस्त्यांच्या

धार्मिक, ऐतिहासिक वारसा लाभलेले पालघर

कोकणच्या उत्तर भागात पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगा, पश्चिमेकडे अरबी समुद्रा दरम्यान पसरलेला आहे. पालघर

ओझोनमुळे कोंडला महानगरांचा श्वास

उन्हाळ्यात प्रमुख महानगरांमध्ये जमिनीजवळील ओझोन प्रदूषण लक्षणीयरीत्या वाढले. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या

दुसरं लग्न करताय? सावध राहा!!

मीनाक्षी जगदाळे आपल्या समाजरचनेत दिवसेंदिवस जे चुकीचे बदल घडत आहेत, विवाहबाह्य संबंध, त्यातून गुन्हेगारीचा उदय

मग बॉम्बस्फोट केले कोणी?

शंतनु चिंचाळकर दहशतवाद्यांनी मुंबईची लाईफलाईन असलेल्या सात लोकल ट्रेनमध्ये प्रेशर कुकरच्या साह्याने