Thursday, June 19, 2025

Air Pollution : प्रदुषण रोखण्यासाठी ठाणे आणि नवी मुंबईत कडक निर्णय, मुंबईचे काय?

Air Pollution : प्रदुषण रोखण्यासाठी ठाणे आणि नवी मुंबईत कडक निर्णय, मुंबईचे काय?

नवी मुंबई : वाढते वायू प्रदूषण (Air Pollution) शहराचा श्वास कोंडते आहे. नागरिकांना श्वसनाशी संबंधित आरोग्याच्या समस्या उद्भवल्या आहेत. सर्वत्र धूळ आणि आणि धुरक्याचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. निरभ्र आकाश लुप्त झाले असून एक प्रकारची काळोखी दाटल्याचा अनुभव प्रत्येकजण घेत आहेत. अशा वेळी आजपासून ठाणे आणि नवी मुंबई महापालिका अलर्ट मोडवर असून वाहतुकीबाबत काही बदल करण्यात आले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात वाढणाऱ्या प्रदूषणावर मुंबई उच्च न्यायालायने ३ दिवसात प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करा असे निर्देश दिले होते. दोन्ही महापालिकांनी मुंबईच्या प्रवेशद्वारावरच भरारी पथक नेमून मुंबईतली एकही डॅब्रिजची वाहने ठाणे आणि नवी मुंबई शहरात येण्यापासून रोखली आहेत. तसेच इमारतींच्या बांधकाम ठिकाणी धूळ उडू नये यासाठी विकासकांनी उपाययोजना केल्यात की नाही याची या भरारी पथकाकडून पाहणी करून दोषींवर कारवाई केली जाणार आहे.


ठाणे आणि नवी मुंबई महापालिका आयुक्तांकडून त्यांच्या विभागाकडून केल्या जाणाऱ्या कारवाई बाबतची माहिती देखिल दिली आहे. तसेच वाढत्या प्रदूषणात आरोग्य सांभाळण्यासाठी मॉर्निंग वॉक, संध्याकाळचे फिरणे, व्यायाम, धावणे टाळावे. तसेच सकाळ-संध्याकाळ घराची दारे-खिडक्या बंद ठेवण्याच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. प्रशासनाच्या या सूचनांना ठाणे-मुंबईत काही ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर काही ठिकाणी मुंबईकर मॉर्निंग वॉकसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे देखील चित्र आहे.



हवा प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज


हवा प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिका आणि मुंबई पोलीस सुद्धा सक्रीय झाले आहेत. रस्त्यांवरुन धावताना धूर ओकणाऱ्या, पीयूसी (PUC) नसलेल्या आणि देखभाल न केल्यामुळे वायू प्रदुषणाचे कारण ठरणाऱ्या वाहनांवर पोलीस करडी नजर ठेवणार आहेत. ते केवळ नजरच ठेवणार नाहीत तर गरज पडल्यास अशा वाहनांवर कारवाईचा बडगाही उभारणार आहेत.


काही दिवसांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली आहे. शहरातील वाढती बांधकामे, सार्वजनिक प्रकल्प आणि रस्त्यांवरुन बेलगाम धावणारी वाहने या प्रदूषणाचे प्रमुख कारण आहे. ज्यामुळे हवेची गुणवत्ता घसरण्यात दिल्लीनंतर मुंबई शहराचा क्रमांक लागतो आहे. त्यामुळे पीयूसी नसलेली आणि धूर ओकणारी वाहनेच हवेच्या घसरत्या गुणवत्तेला अधिक कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.


मुंबईच्या रस्त्यांवर तुम्ही तुमचे वाहन हाकत असाल तर तुम्हाला पीयूसी काढून घेणे आवश्यक आहे. तसेच, वायूप्रदुषणास कारण ठरणाऱ्या सर्व गोष्टींबाबत तुम्हाला दक्ष असावे लागणार आहे. अन्यथा वाहतूक पोलीस कारवाईचा बडगा उगारणार आहेत. केवळ पीयूसी नसलेली वाहनेच नव्हे तर रेडीमिक्स, काँक्रीटचे ट्रक, मिक्सर तसेच, सायलेन्सरसोबत छेडछाड करुन भरधाव धावणाऱ्या वाहनांवरही कारवाई केली जाणार आहे.


परिणामी वाहतूक पोलिसांनी सूचना जारी केल्या आहेत. वाहतूक शाखेचे सहआयुक्त प्रवीण पडवळ यांनी सांगितले की, पीयूसी नसलेली आणि सायलेन्सर सोबत छेडछाड केलेली वाहने यांवर सक्त कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. हवाई प्रदूशन रोखण्यासाठी रस्त्यांवरील वाहनांवर उपनिरीक्षक आणि त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.


दरम्यान, प्रशासनाच्या असेही लक्षात आले आहे की, शहरातील बांधकामांमुळेही वायूप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. अनेकदा बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी रेडीमिक्स, काँक्रीट भरून नेताना ट्रक, मिक्सर आच्छादित केले जात नाहीत. तसेच, बांधकाम सुरु असलेल्या इमारती पत्रे, ताडपत्री अथवा इतर काही कापडांनी अच्छादित केली जात नाहीत. त्यामुळे हवेमध्ये माती आणि धुळीचे कण समाविष्ठ होतात. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होते.

Comments
Add Comment