‘जे गाव करी ते राव न करी’, अशी एक म्हण आहे. त्याचा साधा सोपा अर्थ काढायचा म्हणजे जे गावात घडते, त्याचे पडसाद सगळीकडे उमटतात. या म्हणीचा संदर्भ आपण ग्रामपंचायतींच्या निवडणुकीशी लावला, तर चुकीचे ठरणार नाही. छोटी छोटी गावे मिळून तयार होऊन एक तालुका तयार होतो. तालुके एकत्र करून जिल्हा तयार होतो. अनेक जिल्हे एकत्र होऊन एक राज्य तयार होते. सोमवारी राज्यातील तब्बल २ हजार ३५९ ग्रामपंचायतींचा निकाल समोर आला. त्यात भाजपा एक नंबरचा पक्ष ठरला आहे. तर दोन नंबरला राष्ट्रवादी अजित पवार गट आहे. तीन नंबरला शिंदे गट आहे. चौथ्या क्रमांकावर काँग्रेस आहे, तर पाचव्या क्रमांकावर राष्ट्रवादी शरद पवार गट, शेवटच्या क्रमांकावर ठाकरे गट आहे. एकूण राज्यात ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांमध्ये भाजपाला चांगला प्रतिसाद मतदारांनी दिला आहे.
भाजपा महायुतीला ८४२ जागा मिळाल्या, तर महाविकास आघाडीला ३२० जागांवर समाधान मानावे लागले असून इतर पक्षांना १९० जागा मिळवता आल्या. सिंधुदुर्गातही मिळालेले यश पाहता भारतीय जनता पक्षाची ताकद आणखी बळकट झाली आहे. सिंधुदुर्गातील २४ ग्रामपंचायतींपैकी फक्त पाच ग्रामपंचायती ठाकरे शिवसेना गटाला मिळविता आल्या आहेत. हा निकाल पाहता जवळपास ७०% यश सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाला मिळाले आहे. या यशात केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांचा सिंहाचा वाटा आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जिल्ह्यात सरकारी योजनांबरोबर विकासकामांना वेग देण्याचे काम राणे कुटुंबीयांनी गेले अनेक वर्षे केले आहे. त्याची जाणीव आजही कोकणातील ग्रामीण भागातील जनतेला आहे, हे या निकालावरून दिसून येते.
बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला राहिला आहे. बारामती तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायती या पवारांकडेच जातात. मात्र पहिल्यांदाच पवारांची बारामतीतील यशस्वी घोडदौड भाजपाने रोखली आहे. बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतींवर अजित पवार गटाचे वर्चस्व राहिले असले तरी दरवेळेप्रमाणे एकहाती सत्ता त्यांना काही मिळवता आलेली नाही. बारामतीतील ३१ पैकी २९ ग्रामपंचायतींवर अजित पवार गटाने विजय मिळवला आहे, तर दोन ग्रामपंचायतींवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. बारामती तालुक्यातील चांदगुडेवाडी आणि पारवडी याठिकाणी भाजपाचे सरपंच विजयी झाले आहेत. एवढेच नव्हे तर शरद पवारांचे गाव असलेल्या काटेवाडीतही भाजपाचा एक सदस्य निवडून आला आहे. यापूर्वी बारामतीवर पवारांचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. मात्र अजित पवार सत्तेत सामील असतानाच बारामतीत भाजपाने शिरकाव केला आहे. पहिल्यांदाच बारामतीतल्या दोन ग्रामपंचायती भाजपाकडे गेल्या असल्याने लोकसभेच्या दृष्टीने भाजपासाठी हे निश्चितपणे दिलासादायक चित्र आहे. दक्षिण सोलापूर तालुक्याचे लक्ष लागलेल्या कासेगाव ग्रामपंचायतीवर भाजपाची सत्ता आली आहे. भाजपाचे यशपाल वाडकर सरपंचपदी विराजमान झाले आहेत. काँग्रेसची २५ वर्षांपासूनची सत्ता उलथून टाकत भाजपाने सरशी मारली आहे. कासेगावातील ११ पैकी ९ जागांवर भाजपाचा दणदणीत विजय, तर सरपंचपदावरही भाजपा आहे. काँग्रेसला केवळ दोन जागांवर विजय मिळाला आहे.
लोकसभेच्या ४८ जागा महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात भाजपाच्या विरोधात वातावरण आहे. त्यामुळे लोकसभेला १० जागासुद्धा भाजप आणि मित्र पक्षांना मिळणार नाहीत, असा अपप्रचार विरोधी महाविकास आघाडीकडून केला जातो. त्यात मराठा आरक्षणाचा पेटलेला प्रश्न अजून तसा कायम आहे. धनगर, ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे भाजपाच्या विरोधात देशभर राळ उठवून, ऐकमेकांची तोंडे न पाहणारी विरोधी पक्षातील मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्यासाठी एकत्र आली आहेत. इंडिया आघाडी असे नाव देऊन जणू काही आपणच देशभक्त आहोत. तसेच देशाची काळजी आपल्याला आहे या आविर्भावात असताना महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींचा निकाल हा भाजपाला सुखावणारा आहे.
उत्तर प्रदेशपाठोपाठ लोकसभेच्या जागा अधिक संख्येने असलेले महाराष्ट्र हे दुसरे राज्य आहे. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून आलेला कल पाहता आजही तळागाळातील जनता भाजपासोबत असल्याचे दिसून आले आहे. तसेच, शेतकरी सन्मान योजना, आरोग्यासाठी आयुष्यमान भारत, रोजगारासाठी विश्वकर्मा योजना, मोफत धान्य पुरवठा योजना, महिलांसाठी बस प्रवासात सवलत असा केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या आधारे भाजपा सरकारने तळागाळापर्यंत काम केले आहे व त्यामुळे हे सरकार सर्वसामान्य जनतेसाठी चांगले काम करू शकते, असा विश्वास मतदारांमध्ये निर्माण करण्यात भाजपाला यश मिळाले आहे. त्याला जनतेने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे निकालातून स्पष्ट होते.