शिवरायांचे मुख व तलवार पाकिस्तानच्या दिशेने… पाकिस्तानला भरणार धडकी!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती; कसा पार पडला कार्यक्रम?
कुपवाडा : गेल्या अनेक दिवसांपासून भारत-पाकिस्तान सीमेवर (India – Pakistan Border) छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अश्वारुढ पुतळा उभारण्याचा प्रस्ताव चर्चेत होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पुढाकार घेतल्याने हा प्रस्ताव अखेर सत्यात उतरला आणि आज जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) मधील कुपवाड्यात भारत-पाक सीमेवर शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या हस्ते हे अनावरण पार पडले.
पुण्याच्या आम्ही पुणेकर (Aamhi Punekar) या संस्थेच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काश्मीरमधील कुपवाडा येथे पुतळ्याची स्थापना करण्यात आली. शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा पार पडली. या पूजेच्या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित शिवरायांची आरती गाण्यात आली. त्यानंतर अत्यंत उत्साहात व जोशात झांज व ताशांच्या गजरात नृत्य सादर करण्यात आले.
‘आम्ही पुणेकर’ या संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्याची संकल्पना ठेवण्यात आली होती. महाराष्ट्रातून सुरू झालेल्या या प्रवासाला सुमारे २२०० किमी अंतर पार करण्यासाठी एक आठवडा लागला.
कसा आहे शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा?
कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत उभारण्यात येणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा साडेदहा फुट उंचीचा आहे. तो जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि ७ X ३ या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात येणार आहे. याठिकाणी पुतळ्याच्या मागे उंच भगवा ध्वज लावण्यात आला आहे. नवीन तंत्रज्ञानाने बनवलेला छत्रपतींचा हा पुतळा जम्मू-काश्मीरमधील प्रतिकूल हवामानात दीर्घकाळ तग धरेल असा बनवला आहे.
कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचं भूमीपूजन भारतीय सेनेच्या ‘राष्ट्रीय रायफल्स’च्या ४१व्या बटालीयनचे (मराठा लाईट इन्फ्रंटरी) कमांडिंग ऑफीसर कर्नल नवलगट्टी आणि छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष अभयराज शिरोळे यांच्या हस्ते २० मार्च २०२३ रोजी पाडव्याच्या दिवशी पार पडले होते. त्यासाठी शिवनेरी, तोरणा, राजगड, प्रतापगड आणि रायगड या पाच किल्ल्यांवरील माती आणि पाणी आणण्यात आली होती.
शिवरायांचे मुख व तलवार पाकिस्तानच्या दिशेने
पुतळ्याच्या समोरच्या दिशेने असलेल्या पर्वंतरांगांच्या पलीकडे पाकिस्तान आहे. अश्वारूढ पुतळ्यावरील शिवाजी महाराजांचे मुख आणि तलवार पाकिस्तानच्या दिशेने असावं अशा पद्धतीने पुतळा बसवण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे १८०० ट्रक माती टाकून भराव करण्यात आला. शिवाय या भागातील हवामान, भूस्खलन या बाबी पाहता पक्कं बांधकाम करून पाया तयार करण्यात आला आहे.