Thursday, October 30, 2025
Happy Diwali

चहा-बिस्किट दिले नाही म्हणून डॉक्टर भडकला, शस्त्रक्रिया न करताच निघून गेला

चहा-बिस्किट दिले नाही म्हणून डॉक्टर भडकला, शस्त्रक्रिया न करताच निघून गेला

कारवाईच्या भीतीने आता शुगर असल्याची सारवासारव

नागपूर : नागपुरातील (Nagpur) जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रातील डॉक्टरने वेळेत चहा-बिस्कीट न मिळाल्यामुळे तो चक्क शस्त्रक्रिया सोडून आरोग्य केंद्रातून निघून गेल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे, ऑपरेशनची सर्व तयारी झाली होती, तसेच, रुग्णांना अॅनेस्थिशिया सुद्धा देण्यात आला होता. डॉक्टरच्या या कृत्याने रुग्णाच्या नातेवाईकांसह नागपुरकरांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे.

नागपूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात चार महिलांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली जाणार होती. त्यानुसार सर्व तयारी करण्यात आली होती. रुग्णांना अॅनेस्थिशिया सुद्धा दिला होता. डॉक्टर आरोग्य केंद्रात वेळेवर आले होते. पण त्यांना वेळेत चहा बिस्कीट मिळाले नाही म्हणून डॉक्टरांना राग अनावर झाला आणि ते आरोग्य केंद्रातून तडकाफडकी निघून गेले.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दुसऱ्या डॉक्टरची व्यवस्था करून नियोजित शस्त्रक्रिया केल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

मात्र पहिल्या डॉक्टरच्या कृत्याचा नाहक त्रास चारही महिला रुग्णांना सहन करावा लागला. शुक्रवारी (३ ऑक्टोबर) ही धक्कादायक घटना घडली. यासंदर्भात रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी कुंदा राऊत यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, दोषी डॉक्टर भलावी यांना शुगरचा त्रास असल्याने त्यांना चहा बिस्कीटची गरज होती. त्यामुळे वेळेत चहा बिस्कीट न मिळाल्याने ते तिथून निघून गेल्याचे चौकशी दरम्यान डॉ. भलावी यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment