मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर एका प्रचारसभेत काल चौफेर हल्ला चढवला. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर त्यांनी नाव न घेता जोरदार आरोप केला. सोनिया केवळ आपले पुत्र राहुल यांना राजकारणात स्थिरस्थावर करण्यात गुंतल्या आहेत, असे मोदी म्हणाले. त्यात काहीच खोटे नाही. अर्थात राहुल यांना राजकारणात सेट करण्याचा सातत्याने प्रयत्न सोनिया ह्या करत असल्या तरीही राहुल अजूनही राजकारणात सेट होत नाहीत. काँग्रेसवरील ताबा अजूनही गांधी कुटुंब सोडण्यास तयार नाही, हीच एक बाब मोदी यांचे म्हणणे किती सत्य आहे ते स्पष्ट करणारी आहे. मोदी यांच्या म्हणण्याला सभेने टाळ्यांच्या कडकडाटात पाठिंबा दिला. त्यांनी काँग्रेसच्या गैरकारभारावर सडकून टीका केली आणि त्याचवेळी प्रथमच मतदान करणाऱ्या महिला मतदारांनाही सावध केले.
सत्तर वर्षे काँग्रेस सत्तेत असताना काँग्रेसने गैरकारभार कसा केला आणि काँग्रेसची राजवट केवळ भ्रष्टाचार आणि गरिबांच्या नावावर राजकारण करण्यात कशी गेली, याचा लेखाजोखा मोदी यांनी मांडला. मध्य प्रदेशातील सीवनी येथील मोदी यांच्या प्रचारसभेत झालेली अलोट गर्दी हीच त्यांच्या विजयाची ग्वाही देणारी होती, हे दिसतच होते. मोदी यांनी यावेळी केवळ काँग्रेसला लक्ष्य केले. त्यावरून राज्यात काँग्रेस आणि भाजपा यांच्यातच टक्कर होणार, हे स्पष्ट झाले आहे. मोदी यांनी काँग्रेसच्या गैरकारभारावर चौफेर टीका करताना केवळ काँग्रेसवरच हल्लाबोल केला.
मध्य प्रदेश आणि राजस्थान तसेच छत्तीसगढ या राज्यांत काँग्रेस आणि भाजपा यांच्यातच प्रमुख लढत होणार आहे. त्यामुळे मोदी यांनी इंडिया आघाडीच्या इतर पक्षांवर टीका करण्यात फारशी ऊर्जा खर्च केली नाही. त्यांनी केवळ आणि केवळ काँग्रेसला लक्ष्य केले. काँग्रेसने केवळ गरिबांच्या नावावर राजकारण कसे केले, याचे उदाहरण त्यांनी दिले. काँग्रेसने गरिबांना काहीच दिले नाही, असे ते म्हणाले. पण मोदी यांच्या या सभेला झालेल्या गर्दीवरून मध्य प्रदेश पुन्हा भाजपा आपल्याकडेच राखेल, याची मात्र ग्वाही मिळाली आहे. कारण बाराच्या उन्हातही लोक बसून होते आणि त्यांचा उत्साह प्रचंड होता. मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ ही राज्ये आदिवासी आहेत आणि तरीही तेथे आदिवासींच्या नावाचा वापर केवळ राजकारणासाठी काँग्रेस करत असल्याचा आरोप मोदी यांनी केला. मोदी यांच्या कालच्या भाषणातून काँग्रेसवर घणाघाती हल्ला तर चढवण्यात आलाच आहे, पण भाजपा यापुढे काँग्रेसलाच लक्ष्य करत राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
काँग्रेस हाच भाजपाचा प्रमुख शत्रू आहे आणि त्यामुळे काँग्रेसलाच भाजपा निवडणुकीत हल्ले चढवून जर्जर करणार असल्याचे स्पष्ट झाले. मोदी यांच्या प्रचारसभांना काल मध्य प्रदेशात झालेली गर्दी पाहून इंडिया आघाडीचे पक्ष खासकरून काँग्रेस नेत्यांची झोप उडाली असेल. कारण राहुल गांधी यांच्या सभांना गर्दी झालेली दिसत नाही. त्यामुळे मोदी आणि राहुल गांधी यांच्यात मुख्य सामना होण्याची शक्यता ज्या काँग्रेसवाल्यांना वाटत असते, त्यांना मोदी हे राहुल यांच्यापेक्षा कितीतरी पुढे निघून गेले आहेत, हे लक्षात येईपर्यंत निवडणूक संपेल. लोकप्रियतेच्या बाबतीत मोदी हे राहुल यांच्यापेक्षा कितीतरी वर आहेत. मोदी यांच्या कालच्या सभेने यावरच शिक्कामोर्तब केले आहे. मोदी यांच्या सभेला मध्य प्रदेशात काल जी गर्दी झाली, त्यावरून मोदी यांची भुरळ जनमानसात आजही कायम आहे, हेच स्पष्ट झाले. त्यामुळे मोदी यांच्या जीवावर भाजपाचा विजयरथ पुढे धावू लागेल, अशी शक्यताच जास्त आहे. त्याला कारण आहे, मोदी हे तळागाळातून वर आले आहेत. राहुल यांच्यासारखे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन ते जन्माला आलेले नाहीत. त्यामुळे मोदी जेव्हा मला गरिबी नवी नाही, असे म्हणतात तेव्हा ते लोकांना भावते.
गरिबांची संख्या जास्त असलेल्या देशात मोदी यांचे साधे, सरळ आणि प्रामाणिक प्रयत्न लोकांना म्हणूनच भावतात. मोदी यांनी काँग्रेसवर हल्ला चढवताना त्या पक्षाच्या सत्तर वर्षांच्या राजवटीचा पंचनामाच केला. त्यात एकही अक्षर असत्य नव्हते. काँग्रेसने खरोखर केवळ गरिबांच्या नावावर राजकारण केले. गरिबी हटाव घोषणा दिल्या, पण काँग्रेस कार्यकर्ते मात्र गब्बर झाले. जनता होती तेथेच राहिली. आजही काँग्रेस कार्यकर्त्यांची राहाणी पाहिली की, हाच तोंडाने गरिबीचा जप करणाऱ्या पक्षाचा हा कार्यकर्ता असावा, यावर विश्वास ठेवणे अवघड जाते. मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता आहे. पण तेथे भाजपाला प्रस्थापित विरोधी लाटेचा सामना करावा लागतो की काय, अशी शंका राजकीय विश्लेषकांना होती. पण मोदींच्या सभेला झालेली विराट गर्दी पाहून त्या शंकेला पूर्णविराम द्यावा लागेल. मप्रमध्ये भाजपाचे सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आहे. पण मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे सरकारला प्रस्थापित विरोधी लाटेचा सामना करावा लागला नाही. उलट जनमत चाचण्या तर अशा आहेत की मध्य प्रदेश आणि राजस्थान ही दोन्ही राज्ये भाजपा आपल्याकडेच राखणार आहे. मोदी लाट अजूनही ओसरलेली नाही, हाच निष्कर्ष यावरून काढता येईल. अर्थात यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपाला लाभ होणारच आहे. कारण मोदी लाट राहिली तर लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पुन्हा विजय निश्चित आहे. त्यामुळेच या चार राज्यांतील निवडणुकांना मिनी लोकसभा असे म्हटले जाते आहे. त्यात भाजपाच पुन्हा बाजी मारेल, असे संकेत आहेत. गर्दीचे रूपांतर मतांमध्ये करता येत नाही, असे म्हटले जाते. पण मोदी यांनी यापूर्वी अनेकदा गर्दीचे रूपांतर मतांमध्ये करून दाखवले आहे.