मराठवाडा हळूहळू पूर्वपदावर…

Share

मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे

मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरू झालेले मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषण काळातील आंदोलनाने एक वेगळेच वळण घेतले होते. गेल्या महिन्याभरात या आंदोलनाची धग वाढल्याने संपूर्ण मराठवाडाच पेटून उठला होता. मराठवाड्यातील वातावरण खूपच खराब झाले होते. प्रत्येक ठिकाणी जाळपोळ, हाणामारी, घोषणाबाजी, शिवीगाळ, नेत्यांवर हल्ले, गाडींच्या, त्यांच्या गाडीच्या काचा फोडणे, पुढाऱ्यांना गावबंदी अशा प्रकारामुळे मराठवाड्यातील वातावरण व कायदा-सुव्यवस्था वेशीवर टांगण्यासारखे झाले होते. मनोज जरांगे-पाटील यांनी अखेर निवृत्त न्यायाधीश मारोतराव गायकवाड तसेच निवृत्त न्यायाधीश सुनील शुक्रे यांनी प्रत्यक्ष परिस्थिती समजावून सांगितल्यानंतर उपोषण मागे घेतले. उपोषण मागे घेतल्यानंतर मराठवाड्यातील वातावरण थोडेसे शांत झाले. आता ऐन दिवाळीच्या तोंडावर मराठवाड्यातील वातावरण हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मराठवाड्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत कुणबी समाजाचे जात प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी सुनील गायकवाड या तरुणाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिल्यानंतर त्यांनी त्या प्रमाणपत्राची होळी केली. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. २५ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर यादरम्यान मराठवाड्यात जवळपास पावणेदोनशे एफआयआर नोंदविले गेले.

मराठा समाजाच्या आंदोलकांनी व त्या आंदोलनाच्या आड काही विजातीय तरुणांनी संपूर्ण कायदा आपल्या हातात घेतला होता. नांदेड जिल्ह्यात, तर नायगाव तालुक्यात जिल्हा पोलीस अधीक्षकांवरच आंदोलकांनी दगडफेक केली होती. त्यामध्ये नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक जखमी झाले होते. त्यामुळे पोलिसांनी त्या दगडफेकीच्या घटनेतील ४१ आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयासमोर उभे केले. मराठवाड्यात मराठा आंदोलकांनी केलेल्या हिंसक घटनेत पोलिसांच्या वतीने अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले आहेत. सदरील गुन्हे मागे घेण्याची मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत असली तरी भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी न्यायालयीन कामकाजात कोणीही ढवळाढवळ करू नये, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे. बीड जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलनाने वेगळेच वळण घेतले होते. त्या ठिकाणी १३४ आंदोलकांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत.

मराठवाड्यात तसेच महाराष्ट्रात सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, उपसभापती, आमदार, खासदार, मंत्री तसेच मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ मराठा समाजाच्या नेत्यांनी राज्य केलेले आहे. या समाजाच्या हातातच विकासाची तसेच कलम चालविण्याची ताकद होती. मग आजवर मराठा समाजाला आरक्षण का मिळाले नाही? याची खातरजमा कधीही आंदोलनकर्त्यांनी केली नाही, असा सूर मराठवाड्यातून निघत आहे. या उलट मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जी तारेवरची कसरत केली त्याचा विसर मराठा समाजाला पडला की काय असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. त्यांच्या कामाचे मूल्यमापन करताना मराठा समाजाकडून खरोखरच दुर्लक्ष होत आहे की, काय यावर सुद्धा मतप्रवाह मांडणारा वर्ग आता पुढे सरसावला आहे. सध्या सर्वत्र दिवाळीची घाई-गडबड सुरू आहे. अशा परिस्थितीत मराठवाड्यातील शेतकरी वर्ग तसेच गोरगरीब व सर्वसामान्य आता खरेदीसाठी बाजारात हळूहळू बाहेर पडत आहे. मराठवाड्यातील शेतकरी खरोखरच कम नशिबी आहे. दिवाळीच्या तोंडावर पीक कापणीला आले असताना मराठवाड्यात मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातही काम करता आले नाही व ज्यांनी शेतातील पीक कापून विक्रीसाठी बाजारात नेण्याची तयारी केली होती त्यांना या आंदोलनाचा चांगलाच फटका बसला.

मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे १४ ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे-पाटील यांची विराट सभा झाली होती. त्या सभेच्या जागेवर नियोजन करण्यासाठी परिसरातील १७० एकर शेतातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात आलेले सोयाबीन, कापूस व अन्य पिके काढून टाकली होती. उभ्या शेतातील पिके काढून सभेसाठी मैदान तयार करून दिले होते. हातातोंडाशी आलेला घास उपटून फेकताना शेतकऱ्यांनी कुठलाही विचार केला नव्हता; परंतु आंदोलन स्थगित करत असताना मनोज जरांगे-पाटील यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई राज्य शासनाच्या तिजोरीतून घेतली. याबद्दलही मराठवाड्यात अन्य  समाजात उद्रेक निर्माण झाला आहे. तेथील साडेचारशे शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून ३२ लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्यात येणार आहे. आंदोलन काळात सर्वत्र एसटी बसेसची तोडफोड, जाळपोळ तसेच रस्ते बंद करणे या प्रकारामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला.

आता मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत एसटी डेपो सुरू झाले आहेत. सर्वत्र एसटीची वाहतूक सुरू झाली आहे. गोरगरिबांना व सर्वसामान्यांना एसटी ही परवडणारी असल्यामुळे सध्या दिवाळीत एसटीचा वापर मराठवाड्यात सर्वाधिक होतो. मराठवाड्यातील वातावरण आता पूर्वपदावर येत असल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. केवळ मराठा समाजाचेच नव्हे तर कुठल्याही समाजाचे आंदोलन असले तर सर्वात अगोदर दगड फेकला जातो तो एसटी बसवर. एसटी बस ही सर्वसामान्यांची दळणवळणाची वाहिनी आहे. याकडे दगड फेकणारे कसे काय लक्ष देत नाहीत? हा अनुत्तरीत प्रश्न आहे.

Recent Posts

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

5 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

5 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

6 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

7 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

7 hours ago