
हिंदू सणांमध्ये (Hindu Festivals) सांस्कृतिक महत्त्व असलेला दिवाळीचा सण (Diwali Festival) अवघ्या चार ते पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीची शॉपिंग (Diwali Shopping) करण्यासाठी ठिकठिकाणचे बाजार गर्दीने ओसंडून वाहत आहेत. कंदील, पणत्या, रांगोळी, फराळ, दिवे, नवे कपडे यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. सगळीकडे दिवाळीची लगबग सुरु आहे. यंदाच्या वर्षी प्रदूषणाने कळस गाठल्याने बाजारातही फटाक्यांची आवक काही प्रमाणात कमी आहे, ही चांगली बाब आहे.
याच दिवाळीतील भाऊ बहिणीच्या नात्याचं महत्त्व सांगणारा अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीज (Bhaubeej). यादिवशी बहीण भावाला ओवाळते आणि दोघंही एकमेकांना छान भेटवस्तू देतात. भावाबहिणीने एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस. मात्र, यंदाच्या वर्षी भावाला ओवाळण्याचा शुभ मुहूर्त कोणता?
भाऊबीजचा सण कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यंदा हा सण १५ नोव्हेंबरला बुधवारी साजरा केला जाईल. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची दुसरी तिथी ही मंगळवारी १४ नोव्हेंबरला दुपारी २ वाजून ३६ मिनिटांनी सुरू होईल, ती दुसऱ्या दिवशी १५ नोव्हेंबरला बुधवारी दुपारी १ वाजून ४७ मिनिटांनी समाप्त होईल. त्यामुळे, या परिस्थितीमध्ये तिथीनुसार १५ नोव्हेंबरला भाऊबीजचा सण साजरा केला जाईल.
भाऊबीजेचा शुभ मुहूर्त हा १५ नोव्हेंबरला दुपारी १ वाजून १० मिनिटे ते ३ वाजून २२ मिनिटांपर्यंत असणार आहे. या शुभ मुहूर्तावर तुम्ही भाऊबीज साजरी करू शकता.