Wednesday, October 9, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वJet airways : जेट एअरवेजचे सम्राट नरेश गोयल यांचा उदय अन् अस्ताची...

Jet airways : जेट एअरवेजचे सम्राट नरेश गोयल यांचा उदय अन् अस्ताची कहाणी

  • अर्थभूमी : उमेश कुलकर्णी

नशीब माणसाला आकाशात नेते आणि जमिनीत आदळते. जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांनी या दोन्हीचा अनुभव घेतला आहे. आपल्या काकांच्या ट्रॅव्हल एजन्सीत तिकिटे विकणारे नरेश गोयल एक दिवस आपण एका विमान कंपनीचे मालक होऊ, असे त्यांना कधीही वाटले नसेल. काकांच्या ट्रॅव्हल एजन्सीत सीट विकणाऱ्या गोयल यांनी आपल्या महत्वाकांक्षेला पंख लावले आणि मग ते जेट एअरवेज या कंपनीचे मालक झाले. या कंपनीची शान काय होती. सुपरस्टार शाहरूख खान हे एकेकाळी या कंपनीच्या संचालक मंडळावर होता. पण याच गोयल यांच्यावर आता केंद्र सरकारने कारवाई केली आहे कारण या महाशयांनी बँकांचे ५३८ कोटी रुपयांचे कर्ज बुडवले आहे. त्यांची त्या किमतीची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. गोयल यांनी आपल्या कंपनीला बुडवले आणि त्यासोबतही विमान वाहतूक क्षेत्रालाही बुडवले. त्यांच्या या उदय आणि अस्ताची कहाणी मोठी मनोरंजक आहे.

मे २०१९ पासून या प्रसगांची सुरूवात झाली. एमिराट्स विमान जे दुबईला निघाले होते, त्याला थांबवण्यात आले आणि कोणतेही कारण न देता त्याला पार्किंग करण्यास सांगण्यात आले. प्रथम वर्गातील दोन प्रवासी नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता यांना तेथेच उतरवण्यात आले आणि सांगण्यात आले की ते देश सोडून जाऊ शकत नाहीत. तेथेच गोयल यांच्या अस्ताला सुरूवात झाली. जेट एअरवेजचे संस्थापक असलेले गोयल यामुळे स्तब्ध झाले. पण त्यांना दुसरा काही इलाजच नव्हता. त्यांनी अडीच दशके विमान वाहतूक क्षेत्रावर राज्य केले. पण त्यांना आता बेवारशासारखे खाली उतरवण्यात आले आणि त्यांना आपली सद्दी संपली आहे, हे कळून चुकले होते. त्यानंतर गोयल यांचे नशीब खालच्या दिशेनेच चालू लागले. गोयल यांचे एअरलाईन्सचे दुकान एप्रिल २०१९ मध्य़ेच बंद करण्यात आले होते. त्यांच्यावर भारतीय बँकांचे ८,५०० कोटी रुपये बुडवल्याचा आरोप होता. बँकांना बुडवणाऱ्या कर्जदारांना देशाबाहेर जाऊ न देण्याचा निर्णय आता सरकारने घेतला होता. बहुधा नीरव मोदी आणि विजय मल्लय्या यांच्यामुळे सरकार जास्तच सावध झाले असावे.

गोयल यांची वैयक्तिक उदयाची कहाणी पाहिली तर ते सामान्य परिस्थितीतून वर येऊन एका विमानवाहतूक कंपनीचे मालक होण्यापर्यंतचा त्यांचा अद्भुत प्रवासाची आहे. आपल्या काकांच्या कंपनीत रोखपाल म्हणून काम करणाऱ्या गोयल यांना पगार होता दरमहा तीनशे रुपये. त्यानंतर त्यांनी मोठी झेप घेतली आणि इतर विमान कंपन्यांशी संबंध प्रस्थापित केले. आंतरराष्ट्रीय हवाई परिवहन महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत ते नियमितपणे दिसायचे. जेट एअरवेज ही कंपनी १९९० मध्ये त्यांनी स्थापन केली आणि या कंपनीने विमान वाहतूक क्षेत्रात ठसा उमटवला. गोयल यांच्या कंपनीने आपली सर्वोत्तम सेवा आणि उराजकीय क्षेत्रात उच्च पदस्थमित्र यांच्या जोरावर तेव्हा असलेली स्पर्धा नामोहरम केली. कंपनी इतकी जोरात होती की एकदा तर बॉलिवुड स्टार शाहरूख खान आणि बॉलिवुडचे सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर हे तिच्या संचालक मंडळावर होते.

आपल्या मजबूत संबंधांच्या जोरावर बराच काळ गोयल यांनी टाटा सारख्या विमान वाहतूक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीला बाहेर ठेवले होते. काँग्रेस सरकारच्या धरसोडीच्या धोरणामुळे अखेर टाटा कंपनीही मेटाकुटीला आली होती आणि टाटा कंपनीला विमान वाहतूक क्षेत्राच्या बाहेर रहावे लागेल. सिंगापूर एअरलाईन्सने टाटांबरोबर संयुक्त काम करण्यास तयार असल्याचे मान्य करूनही टाटा बाहेर राहिले होते. राजवटी बदलल्यानंतर आणि वेगवेगळी धोरणे राबवल्यानंतरही गोयल यांची कंपनी २५ वर्षे विमाव परिवहन क्षेत्रात राहिली आणि त्यांचे हे धोरण हे अनेक विमान कंपन्यांचा बळी घेऊन गेले. पण ते गोयल यांच्यासाठी सुयोग्य ठरले. पण गोयल यांनी २००६ मध्ये एअर सहाराचे अधिग्रहण केले आणि ते गोयल यांच्यासाठी मारक ठरले. जेट एअरवेजने एअर सहाराचे जेट लाईट म्हणून रिब्रँडिंग केले.पण या अधिग्रहणानंतर गोयल यांच्या कंपनीच्या आर्थिक स्त्रोतांसाठी भयंकर निर्णय ठरला. २०१५ मध्ये जेट एअरवेजने आपली संपूर्ण १५०० कोटी रूपयांची गुंतवणूक राईट ऑफ केली. गोयल हे अालिशान पार्ट्या देण्यासाठी प्रसिद्ध होते आणि त्यांनी जागतिक एअरलाईन्सशी व्यावसायिक भागीदारी केली. इंडियन एअरलाईन्समध्ये जागतिक विमान कंपन्यांना गुंतवणूक करण्यास परवानगी देण्यात आल्यावर त्याचा लाभ उठवणारे पहिले विमान व्यावसायिक गोयल हेच होते. २०१३ मध्ये इतिहाद एअरलाईन्सने जेट एअरवेजमध्ये २४ टक्के गुंतवणूक केली. पण उच्च कर्जामुळे डबघाईला आलेल्या जेटला वाचवण्यास इतके पुरेसे नव्हते. गोयल यांच्यावर सातत्याने एअरलाईन्सचा निधी इतरत्र वळवण्याचा आरोप केला गेला. त्यातून अखेर गोयल यांना आपले दुकान बंद करावे लागले. प्रामाणिक व्यवसाय़ न करता भलत्याच गोष्टीत लक्ष घातले तर काय होते, याचे गोयल हे उत्तम उदाहरण आहे. गोयल यांची कंपनीच्या व्यवहारांवर आणि उधळपट्टीवर नियंत्रण मिळवण्याची अनिच्छा, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची कंपनीच्या व्यवहारात लुडबुड यामुळे गोयल इच्छा असूनही व्यवसायात वर येऊ शकले नाहीत.

कंपनीचा निधी अन्यत्र वळवण्याचा आरोप असलेले गोयल आता आपल्या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर लढाई खेळत आहेत. कंपनी बंद झाल्यावर कर्ज दिलेल्यांनी लिलाव पुकारला आणि अजूनही बँकांकडून घेतलेले पैसे चुकते करण्यास गोयल समर्थ ठरलेले नाहीत. गोयल आता अनेक मुंबईतील तुरुंगात आयुष्य कंठत असलेल्या व्यक्तींच्या सोबतीला जाऊन बसतील ज्यांनी आर्थिक गुन्हे केले आहेत. त्यांची नामवळी पाहिले तर धक्का बसेल. युनिटेकचे प्रवर्तक संजय चंद्रा, वाधवान बंधू, राणा कपूर आणि एचडीआयएलचे सारंग वाधवान यांचा त्यात समावेश आहे. त्यांनी आर्थिक अफरातफर करून देशाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. देशाला फसवणाऱ्यांना एक न एक दिवस तुरुंगात जावेच लागते, हा संदेश गोयल यांची ही कहाणी देतो. गोयल यांच्यासाठी इतका मोठा लेख का, असा प्रश्न असेल. तर माणसाला एकदा हाव सुटली की तो सारेच नीतीनियम पायदळी तुडवतो आणि मग नियती त्याला जबरदस्त शिक्षा देते. हे सांगण्याचा यात उद्देश आहे. पूर्वी गोयल यांना अनेकांनी सुरक्षित पणे संकटातून निसटण्याचा मार्ग दाखवला होता. पण त्यांनी साऱ्या ऑफर्स नाकारल्या. एअरवेज वाचवता येत होती,पण गोयल यांना आपला ताबा कंपनीवरील सोडायची इच्छा नव्हती. त्यांनी किंगफिशरचे विजय मल्ल्या यांच्याशी करारही केला होता. पण दोघेही आपापल्या भूमिकांवर ठाम राहिले आणि परिणामी कंपनी बुडून तळात गेली आणि गोयल तुरुंगाची हवा खायला गेले. नरेश गोयल यांच्या या कहाणीतून अनेक प्रेरणा घेता येतील. मेहनतीच्या जोरावर आणि नंतर लबाडी करून तुम्ही आपले साम्राज्य स्थापन करू शकता. पण ते टिकवण्यासाठी लबाडी कायम कामाला येत नाही. तुम्हाला कुठे तरी प्रामाणिकपणा दाखवावाच लागतो. तसे केले असते तर गोयल यांची कंपनी आजही विमान वाहतूक क्षेत्रात राज करत राहिली असती. पण तसे होणारच नव्हते. आपल्या कुटुंबीयांचे नसते लाड पुरवण्याची सवयही गोयल यांच्या अंगलट आली आहे. त्यांची अालिशान रहाणी आणि वाट्टेल तसे कंपनीचे पैसे उधळण्याची प्रवृत्ती ही गोयल यांना मारक ठरली. कंपनीचे विश्वस्त म्हणून काम न करता गोयल यांनी मनमानीपणे कंपनीचा वापर केला. परिणामी आज ते तर तुरुंगात जाण्याची शक्यता आहेच. पण त्यांच्या लाखो कर्मचाऱ्यांचे भवितव्यही टांगणीला लागले आहे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -