सेवाव्रती: शिबानी जोशी
समाजामधील उपेक्षित व वंचित घटकांमधील प्रतिभावंत मुला-मुलींसाठी काम करण्याच्या हेतूने स्व. कृष्णाजी लक्ष्मण ऊर्फ किशाभाऊ पटवर्धन यांनी ४४ वर्षांपूर्वी पुण्यात ‘स्व’ रूपवर्धिनी नावाची एक अभिनव संस्था सुरू केली. किशाभाऊ हाडाचे शिक्षक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. शिक्षकी पेशातून निवृत्त झाल्यानंतर लगेचच त्यांनी हे काम सुरू करण्याचा निश्चय केला होता.
रास्ता पेठेतील राजा धनराज गिरजी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम करतानाच मुलांमधले विविध पैलू त्यांच्या नजरेस पडायचे. पुण्यातल्या विविध पेठा आणि वस्त्यांमधली गुणवान मुले शिकू इच्छितात; परंतु भोवतालचे वातावरण, आर्थिक परिस्थितीमुळे अनेक जण शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. बुद्धिमत्ता ही समाजातील कोणा एका गटाची मक्तेदारी नाही; तर सर्वच स्तरांतील विद्यार्थ्यांमध्ये काही ना काही विशेष गुण असतात. त्यांना योग्य वळण आणि मार्गदर्शन मिळण्याची गरज असते, असा किशाभाऊंचा ठाम विश्वास होता. अशी मुले हुडकून त्यांना योग्य दिशा आणि गुणवत्तावाढीला पोषक वातावरण देण्याचे किशाभाऊंनी ठरवले. या विचारांतून १३ मे १९७९ रोजी त्यांनी हे काम सुरू केले. विविध शाळांमधील गुणवान विद्यार्थ्यांना एकत्र करून रोज संध्याकाळी खेळ, अभ्यास, गाणी-गोष्टी यांच्या माध्यमातून त्यांना संस्कारित करण्याचे काम त्यांनी सुरू केले. लवकरच त्याला संस्थात्मक स्वरूप प्राप्त झाले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जिद्द त्यांनी अनेक मुलांच्या मनात निर्माण केली. तसेच, स्वतःच्या विकासाबरोबर समाजासाठी झटून काम केले पाहिजे, अशी बांधिलकीची भावनाही त्यांच्या मनात रुजवली. ‘समाजातील विधायक बदलांची बिजे पेरणारे शेतकरी म्हणजेच किशाभाऊंच्या शब्दांत ‘सेवेकरी’. समाजाच्या विविध थरांतून विशेषतः उपेक्षित घटकांमधून असे – ‘सेवेकरी’ आपल्याला निर्माण करायचे आहेत, असा त्यांचा ध्यास होता.
सामाजिक काम करताना आपल्याला सर्वत्र संधीची असमानता दिसते. पण प्रत्येक व्यक्तीमध्ये काही मूलभूत क्षमता असतात. विविध समाजघटकांमधील मुलांमधल्या अशा क्षमता शोधून त्यांना घडवण्याचे काम किशाभाऊंनी सुरू केले. त्यामागे एक शास्त्रीय विचार आहे. आता आपली शक्ती व साधने मर्यादित आहेत. त्यामुळे सुरुवातीला निवडून-पारखून घेतलेल्या मुलांच्या गटावर काम करू. त्यातूनच हे काम आणखी पुढे नेणारे सेवेकरी घडवू, असा किशाभाऊंचा प्रयत्न होता. त्यासाठी वैविध्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम आणि प्रयोग त्यांनी सुरू केले. पुण्याच्या मध्य वस्तीतील विविध शाळांमधील पाचवी-सहावीच्या निवडक १२ विद्यार्थ्यांनिशी किशाभाऊंनी या कामाला सुरुवात केली. प्रारंभी मंगळवार पेठेतील महापालिकेच्या एका शाळेत मुलांचे खेळ आणि अभ्यासतासिका होत असत; परंतु एक दिवस अचानक महानगरपालिकेने शाळेची परवानगी नाकारली. तेव्हाही हे काम न थांबवता मुलांचे रस्त्यावरच खेळ घेण्यात आले आणि परिसरातील कडबाकुट्टीच्या (जनावरांसाठी हिरवा चारा) कारखान्यातील पोत्यांवर बसून अभ्यासाच्या तासिका झाल्या.
या अनुभवामुळे किशाभाऊंनी संस्थेच्या कामासाठी स्वतःची वास्तू असली पाहिजे असे ठरवले. सरकारी मदतीचा एक पैसाही न घेता आणि बँकेचे कर्ज न काढता केवळ समाजातील दानशूर व्यक्ती व उद्योगांनी दिलेल्या आर्थिक मदतीच्या आधारावर १९८८मध्ये मंगळवार पेठेत ‘स्व’ रूपवर्धिनीची दोन मजली वास्तू उभी राहिली. नंतर त्यावर आणखी दोन मजल्यांचे बांधकाम करण्यात आले. संस्थेची स्वतःची वास्तू उभी राहिल्यानंतर गुणवान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या आणि त्यांच्यातूनच कार्यकर्ते घडवण्याच्या कामाला आणखी जोर आला. पाहता पाहता परिसरातील वस्त्यांमधील मुलांसाठी पाकोळी बालवाडी, पहिली ते चौथीच्या मुलांची ‘अभिमन्यू’ बालशाखा, दुपारच्या वेळात घरी एकट्या असणान्या मुला-मुलींसाठी ‘आजोळ’ असे प्रकल्प सुरू झाले. या मुलांच्या निमित्ताने संपर्कात आलेल्या माताभगिनींसाठी शिवण, भरतकाम प्रशिक्षण, गृहशुश्रूषा वर्ग, प्रौढ साक्षरता, महिला बचतगट, मस्लीम महिलांसाठी मराठी शिकण्याचा वर्ग असे किती तरी उपक्रम सरू झाले, विस्तारले आणि पेठेतील संस्थेची वास्तू गजबजून गेली.
स्वरूपवर्धिनीने १९९६मध्ये विज्ञानभारतीच्या मदतीने आणखी एक पाऊल पुढे टाकले. ते म्हणजे ‘फिरती विज्ञान प्रयोगशाळा’ प्रकल्पाचे पुण्याभोवतीच्या विशेषतः मावळ व मुळशी खोऱ्यातील अनेक खेड्यांतील शाळांसाठी हा प्रकल्प राबवला जात आहे. त्यातून हजारो विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानावरचा विश्वास रुजवता आला. प्राज कंपनीने दिलेल्या मदतीने हा प्रकल्प आणखी गतिमान व्हायला मदत झाली. आजमितीला हा प्रकल्प मावळ-मुळशीबरोबरच भोर, वेल्हे तालुक्यांमध्ये विस्तारला आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी दरवर्षी हजारो विद्यार्थी येतात. त्यांना उत्तम दर्जाचे आणि कमीत कमी शुल्कात मार्गदर्शन करणारे केंद्र ‘स्व’- रूपवर्धिनी संस्थेने सन २००० मध्ये सुरू केले. त्यातून आजवर राज्य लोकसेवा आगोयाच्या परीक्षेमार्फत विविध शासकीय पदांवर निवड झालेले साडेतीनशे अधिकारी उत्तम काम करत आहेत.
स्व-रूपवर्धिनीचे काम सुरुवातीला मंगळवार पेठेतील एका सायंकालीन केंद्रापुरते मर्यादित होते. ते आता पुण्यातील विविध भागांमध्ये विस्तारले आहे. वडारवाडी, पांडवनगर, बिबवेवाडी, धनकवडी, कर्वेनगर, धायरी अशा १६ ठिकाणी मुलांसाठीची सायंकालीन व्यक्तिमत्त्व विकास केंद्रे संस्थेतर्फे चालवली जातात. तसेच, मुलींसाठी दोन ठिकाणी अशी केंद्रे चालवली जातात. ‘स्व’ रूपवर्धिनी ही पूर्ण वेळची शाळा नाही, शाळेला पर्यायही नाही, तर विविध उपक्रमांद्वारे एकही दिवस सुट्टी न घेता वर्षभर रोज सायंकाळी राबविला जाणारा एक अनौपचारिक शिक्षणाचा प्रयोग आहे. तो आणखी पुढे नेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक मुलाला समजून घेऊन योग्य दिशा व मार्ग दाखवणारा, त्यांच्यात प्रेरणा जागवणारा ‘मेंटॉर’ जोडून देणारी ‘प्रगतिपालक’ योजना संस्थेने सुरू केली आहे. तसेच विविध वस्त्यांमधील मुला-मुलींच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ‘उत्थान’ नावाने अभ्यासिका सुरू करण्यात येत आहेत. काही ठिकाणी दूरशिक्षण पद्धतीद्वारे ‘व्हर्चुअल क्लासरूम’ची व्यवस्था करण्यात येत आहे.
संस्थेच्या प्रगतीचे आणखी एक पाऊल म्हणजे आळंदीजवळच्या चहोली येथे उभारण्यात आलेले ‘कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र’. वर्धिनीचे आतापर्यंतचे काम बहुतांश मंगळवार पेठेतील वास्तूमध्ये सुरू होते. १९८९ सालापासून तिथे गरजू मुली व महिलांसाठी उद्योग प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले. त्यातून शेकडो महिला स्वावलंबी झाल्या. त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबांचाही आर्थिक स्तर बदलला. त्यामुळे किशाभाऊ आणि संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तमभाई श्रॉफ यांना वाटले की, मुली आणि महिलांच्या उद्योग शिक्षणासाठी स्वतंत्र वास्तू हवी. त्यासाठी संस्थेने चन्होली परिसरात काही जागा घेतली; परंतु २००४ मध्ये किशाभाऊंचे निधन झाल्याने तिथे वास्तू कशी उभी राहणार, याची चिंता कार्यकर्त्यांना पडली. पण संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तमभाई श्रॉफ पुढे सरसावले आणि त्यांनी किशाभाऊंचे स्वप्न साकारण्यासाठी स्वतःची चहोली येथील एक एकर जागा वर्धिनीला दानपत्राने दिली. मध्यंतरीच्या कोरोना टाळेबंदीचा काळ आणि अन्य संकटांचा सामना करत आज तिथे संस्थेची तीन मजली भव्य वास्तू उभी राहिली आहे. युवती व महिला महिलांसाठी आरोग्य व स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे अनेक वर्ग तिथे सुरू होत आहेत.
निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि स्वतःचा वेळ देणारे ‘कार्यकर्ते स्वयंसेवक’ उभे राहिले, तर संस्थापकांनी दूरदृष्टीने पाहिलेली स्वप्ने साकारत संस्थेचे कार्य वेगाने वाढू शकते. याचे ‘स्व’ रूपवर्धिनी हे उत्तम उदाहरण आहे. गेल्या चव्वेचाळीस वर्षांत शासकीय मदत न घेता संस्थेच्या दोन वास्तू आज उभ्या आहेत. तसेच, विविध उपक्रमांचे योग्य पद्धतीने संचालन करणारे मनुष्यबळ संस्थेतूनच उभे राहिले आहे. संस्थेची सुरुवात संध्याकाळच्या उपक्रमांमधून झाली, तरी आता संस्थेच्या युवा, महिला, प्रशिक्षण, क्रीडा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांतून तिच्या कार्याचा परिघ विस्तारत आहे आणि प्रत्येक शाखेतील अनुभवी स्वयंसेवक नवनवीन मुलांना प्रशिक्षण देऊन त्यांचे विकासवर्धन करत आहेत. अशा या संस्थेची वैशिष्ट्ये थोडक्यात पुढीलप्रमाणे सांगता येतील.
‘स्व’ रूपवर्धिनी म्हणजे : सहवासातून शिक्षण व शिक्षणातून संस्कार घडवणारी संस्था. व्रती शिक्षक आणि तळमळीचे कार्यकर्ते यांच्याद्वारा हेतुप्रधान शिक्षण देणारी संस्था. आपुलकीने व जिव्हाळ्याने मुलांचे प्रश्न हाताळणारा, सर्वांना आपलासा वाटणारा परिवार. राष्ट्रीय चारित्र्य, सार्वजनिक शिस्त आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारा एक राष्ट्रीय प्रकल्प. परिस्थितीचा शाप आणि वातावरणाचा ताप असला, तरीही सदैव प्रगतीचाच मार्ग दाखवणारी, आपुलकी निर्माण करणारी संस्था. आपण सर्वांनीच या संस्थेचे काम एकदा तरी पाहावे आणि ‘स्व’रूपाच्या वर्धनाच्या प्रयोगात सहभागी व्हावे.
joshishibani@yahoo. com