लेखक, दिग्दर्शक, कलाकार, गायक, नेपथ्यकार, रंगभूषाकार, संगीतकार आणि निर्माता या सर्व आघाड्यांवर यशस्वी ठरलेले मराठी रंगभूमीवरील एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणून संतोष पवार यांच्याकडे पाहिले जाते. दैनिक प्रहारच्या गजाली कार्यक्रमानिमित्त संतोष पवार यांनी प्रहारच्या टीमसोबत संवाद साधला. यावेळी दैनिक प्रहारचे महाव्यवस्थापक मनीष राणे, संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांनी त्यांचे स्वागत केले.
एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व : संतोष पवार
भालचंद्र कुबल
मराठी रंगभूमीवर काही रंगकर्मी असे आहेत की ज्यांचे नाटक या माध्यमासाठीचे योगदान अधोरेखित केल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. संतोष पवार हे त्यापैकी महत्त्वाचे नाव. संतोष हे लेखक, दिग्दर्शक, कलाकार, गायक, नेपथ्यकार, रंगभूषाकार, संगीतकार आणि निर्माता या सर्व आघाड्यांवर यशस्वी ठरलेलं एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आहे. स्वतःच्या मर्यादा ओळखून प्रेक्षकांची नाडी गवसलेला तो उत्तम रंगकर्मी आहे. आजवर त्याने लिहिलेल्या ६५ नाटकांचा आलेख सातत्यात लोकप्रिय ठरत आला आहे. आजच्या घडीला “हिच तर फॅमिलीची गंमत आहे”, “संत तुकाराम”, “यदा कदाचित रिटर्न्स”, “संगीत शोले” अशी एका वेळी चार नाटके मराठी रंगभूमीवर सुरू असणारा तो एकमेव नाटककार म्हणावा लागेल. मराठीत ज्या प्रमाणे काही नामवंत कलाकारांचा स्वतःचा प्रेक्षकवर्ग आहे, तसाच तो संतोष पवार यांचाही आहे. स्वतःच्या सामर्थ्यावर विशिष्ट शैलीची विनोद निर्मिती, राजकीय घटनांबाबत चिमटे काढण्याची पद्धत आणि हसवता हसवता गंभीर विषयाकडे घेऊन जाण्याची रीत, यामुळेच संतोषची नाटके शहरांबरोबर ग्रामीण भागातही यशस्वी ठरली, लोकप्रिय झाली.
यदा कदाचित या नाटकाने तर लोकप्रियतेचा इतिहास रचला. या नाटकातील पौराणिक तथा महाभारतकालीन व्यक्तिरेखांमुळे बऱ्याच वादंगाना तोंड द्यावे लागले. हिंदू धर्माची विटंबना केल्याचा आरोपही त्याच्यावर झाला. एवढेच नाही तर ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये ‘यदा कदाचित’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान बाँबस्फोटही घडविण्यात आला. अशा कसोटीच्या काळातही स्वतः विचलित न होता, संयमीवृत्तीने मार्ग काढणारा संतोष पवार जेव्हा भूतकाळ उलगडत नेतो, तेव्हा असा जीवन संघर्ष अनुभवलेला हा एकमेव मराठी रंगकर्मी आहे, याची साक्ष पटते.
स्त्री-भ्रूण हत्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न, बेरोजगारी, लोकसंख्या नियंत्रण, कौटुंबिक सलोखा अशा अनेक सामाजिक विषयांना हात घालणारी त्याची नाटके, वरवर जरी विनोदी वाटत असली तरी शेवटच्या दहा मिनिटांत विषयाच्या गांभीर्याची सणसणीत चपराक देऊन जातात. महाराष्ट्राची लोकधारा या बहुरंगी कार्यक्रमातून खऱ्या अर्थाने त्याचे करिअर सुरू झाले. त्यातच त्याला शाहिर साबळेंसारखे गुरू लाभले. शाहिरांनी दिलेली कौतुकाची थाप त्याचा नाटकाचा प्रवास पुढे नेण्यास कारणीभूत ठरली.
मुलाखती दरम्यान असे कोणते एखादे शल्य एवढी यशस्वी कारकिर्द असतानाही जाणवते का? या प्रश्नाचे उत्तरही त्याने तितक्याच गांभीर्याने दिले. नाटकातील व्यस्ततेमुळे आपल्या कुटुंबाला हवा तसा वेळ देता आला नाही, हे शल्य आपणास कायम बोचत राहील, हे त्याने दिलखुलासपणे मान्य केले. स्वतःचे घाईगर्दीत उरकलेले लग्न किंवा मुलीच्या बारशालाही हजर न राहू शकल्याची खंत देखील त्याने बोलून दाखवली. नाटकातूनच आपण आपली कारकिर्द घडवावी असा विचारही नसलेला हा बहुआयामी रंगकर्मी केवळ अपघाताने या क्षेत्रात प्रवेशकर्ता झाला. रंगभूमीसाठी करावे लागणारे प्रत्येक काम त्याने वाहून नेले. त्यात नैपुण्य मिळवले आणि जनसामान्यांच्या पसंतीस तो उतरला. या क्षेत्रातील आर्थिक चढउतारांना सामोरे जात, कुणावरही अन्याय न होऊ देण्याचे धोरण त्याला “माणूस” बनवून गेले. म्हणूनच तर पंधरा-वीस जणांच्या सहकलाकारांचा ताफा व्यावसायिक नाटकात बाळगण्याचे धैर्य केवळ संतोष पवारच करू शकतो. चित्रपट अथवा मालिकांमध्ये संतोष कधीच रमला नाही. त्याच्या दुर्दैवाने या दोन्ही माध्यमातून त्याला आलेले अनुभव फारसे चांगले नसल्याने त्यानंतर त्याने कधी त्या माध्यमांचा विचारच केला नाही. मात्र “आयुष्यात एक तरी चित्रपट मी करणार” हा मनोदय या मुलाखती दरम्यान त्याने व्यक्त केला. शाळेत लाभलेले पराडकर सरांचे मार्गदर्शन, शाहिर साबळेंनी आयुष्याला दिलेली दिशा आणि विविध नाट्यनिर्मात्यांनी त्याच्या वैयक्तिक क्षमतेवर दाखवलेला विश्वास या शिदोरीवर आपला नाट्यप्रवास सुरू आहे, हे अलौकिक सत्य सांगण्यास तो विसरला नाही. आजवर संतोषला त्याने केलेल्या अनेक नाटकांसाठी सन्मानित करण्यात आले असले तरी २०१३ साली मिळालेला बबन प्रभू स्मृती पुरस्कार तो सर्वोच्च समजतो. पुरस्कारांसाठी, केवळ पैसा कमविण्यासाठी अथवा नावलौकिकासाठी आयुष्य खर्ची करण्यापेक्षा स्वतःच्या आनंदाबरोबरच कलाकार म्हणून समाजाला तथा प्रेक्षकांना मिळणाऱ्या आनंदात सर्वस्व मानणारा तो “हास्यदूत” असावा असे वाटत राहते.
सबकुछ संतोष पवार
वैष्णवी भोगले
मराठी रंगभूमीला अनेक वर्षांचा समृद्ध इतिहास लाभला आहे. याच मराठी रंगभूमी दिनानिमित्त दैनिक प्रहारच्या गजाली सत्रात हरहुन्नरी नाट्यकर्मी म्हणून ओळख असलेले संतोष पवार यांच्याशी दिलखुलास गप्पा रंगल्या. मराठी रंगभूमीवर नाटककार, अभिनेते, गीतकार, नाट्य दिग्दर्शक अशा आघाड्यांवर संतोष पवार आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत. शाळेत पाचवी इयत्तेत असताना वार्षिक स्नेहसंमेलनाला त्यांनी ‘अटेन्शन’ ही पहिली एकांकिका केली होती. त्याचवेळी शाळेतील शिक्षक म्हणाले होते की, ‘पुढे जाऊन तू नाटकात काम करणार.’ त्यामुळे थोडा आत्मविश्वास निर्माण झाला असल्याचे संतोष पवार सांगतात.
चिपळूण मुसाड गावचे रहिवासी असल्यामुळे गावातील पारंपरिक कार्यक्रमांशी नाळ जोडलेली होती. त्या कार्यक्रमामध्ये नमन याचे छोटे रूप म्हणजे दिंडी यामध्ये त्यांचे काका काम करायचे. ते आजारी असताना मित्रांच्या सांगण्यावरून त्यांनी काकांच्या जागी भूमिका केली. या भूमिकेचे कौतुक झाले. ‘कमी तिथे आम्ही’ या सूत्रानुसार कधी अभिनय तर कधी दिग्दर्शन असा प्रवास सुरू झाला. पण मध्यमवर्गीय कुटुंब असल्यामुळे वडिलांचे स्वप्न होते की, आपला मुलगा शिकावा, त्याने नोकरी करावी. त्यामुळे त्यांनी एका प्रिंटिंग प्रेसमध्ये अकाउंट डिपार्टमेंटमध्ये काम केले. त्याआधी एका फर्ममध्ये काम करत होते.
काही दिवसांनी ती कंपनी बंद पडल्यामुळे यापुढे आपण नोकरी करायची नाही असा निश्चय केला. मग स्वतःला त्यांनी रंगभूमीवर वाहून घेतले. ‘यदा कदाचित’ या नाटकामुळे न भूतो न भविष्यती असा प्रतिसाद त्यांना मिळाला. पण यावर टीकाही झाली. मात्र याकडे दुर्लक्ष करत ‘कुछ तो लोग कहेंगे’ म्हणत आपल्या कामात दंग झाले.त्यांच्या कामाची पोचपावती प्रेक्षकांच्या प्रतिसादातून मिळत होती. पण २०१३ सालचा बबन प्रभू स्मृती पुरस्कार ही मान्यवरांची पावती होती. त्यांची आतापर्यंतची गाजलेली नाटके म्हणजे आम्ही सारे लेकुरवाळे (लेखन, दिग्दर्शन), आलाय मोठा शहाणा (दिग्दर्शन), जळुबाई हळू (लेखन, दिग्दर्शन), तू तू मी मी (अभिनय), दिली सुपारी बायकोची (दिग्दर्शन), बुवा तेथे बाया (दिग्दर्शन), माझिया भाऊजींना रीत कळेना (अभिनय आणि दिग्दर्शन), यदा कदाचित (लेखन आणि दिग्दर्शन), युगे युगे कली युगे (अभिनय, लेखन, दिग्दर्शन), राजा नावाचा गुलाम (अभिनय), राधा ही कावरी बावरी (लेखन आणि दिग्दर्शन), लगे रहो राजाभाई (अभिनय, लेखन, दिग्दर्शन), स्वभावाला औषध नाही (दिग्दर्शन), हवा हवाई (अभिनय), हौस माझी पुरवा (अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन) ही होत. तसेच नवरा माझा नवसाचा आणि एक उनाड दिवस या चित्रपटामध्ये त्यांनी काम केले. हौस माझी पुरवा हे त्यांचे ५५ वे नाटक आहे. महाराष्ट्राची लोकधारा यात काम करत असताना मार्गदर्शक, गुरू म्हणून शाहिर साबळेंकडून खूप गोष्टी शिकण्यास मिळाल्या. प्रत्येक गोष्टीची जाणीव, आवड, कला अंगात असल्यामुळे मी या क्षेत्रात टिकू शकलो असे ते सांगतात. त्यांच्या कोणत्याही नाटकातून एक संदेश नेहमी मिळत असतो. शेवटी ते म्हणाले ज्याला करण्याची आवड आहे, त्या माणसाला करू तेवढे कमीच वाटते. त्यामुळे सतत मला हे करायचं होतं, ते करायचं होतं ती सल प्रत्येक कलाकाराकडे असायला हवी. नाहीतर तो कलाकार तिथेच संपून जाईल. काहीतरी करायचे आहे असं सतत वाटणारे संतोष पवार आज कमी तिथे आम्ही नाही तर ‘सबकुछ’ आहेत, हे नक्की.