- अर्थनगरीतून… : महेश देशपांडे, आर्थिक घडामोडींचे अभ्यासक
आणखी एक लक्षवेधी बातम्यांचा आठवडा म्हणून सरत्या आठवड्याकडे बघता येते. उद्योग आणि एकूणच अर्थविश्वाच्या दृष्टीने हा काळ काही वेगळे सांगून गेला. येत्या काळात आयफोनची निर्मिती टाटांकडून होणार असल्याची बातमी महत्वाची आहे. ज्येष्ठ आयटी तज्ज्ञ नारायण मूर्ती यांनी उत्पादकता वाढवण्यासाठी सत्तर तास काम करण्याचा दिलेला सल्ला ही देखील एक दखलपात्र बातमी ठरली. दरम्यान, रिलायन्समध्ये अंबानी यांची तिसरी पिढी दाखल झाल्याची बातमीही नोंद घेण्याजोगी आहे.
तंत्रज्ञान आणि मोबाईल फोन उत्पादनाचे मोठे हब असलेल्या चीनला मोठा झटका बसला आहे. कोरोना आणि लॉकडाऊननंतर चीनची अर्थव्यवस्था वाईट अवस्थेत आहे. भारत आणि चीनमधील तणाव आणि तेढ कोणापासून लपून राहिलेली नाही. अशा परिस्थितीत जागतिक स्तरावर भारत उत्पादक बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. आता त्या दृष्टीने भारताला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. आता आयफोनची निर्मिती-आयफोनचे उत्पादन भारतात होणार आहे. देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा समूहाकडून हे काम पूर्ण केले जाणार आहे. ‘टाटा’ने ‘अॅपल’चा पुरवठादार ‘विस्ट्रॉन’चा कारखाना विकत घेतला आहे. ही कंपनी खरेदी करून टाटा येत्या अडीच वर्षांमध्ये आयफोनचे उत्पादन सुरू करणार आहे. टाटा समूहातील ‘टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड’ने ‘विस्ट्रॉन इन्फोकॉम मॅन्युफॅक्चरिंग (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी १२५ दशलक्ष म्हणजे सुमारे एक हजार कोटी रुपयांना विकत घेतली आहे. गेल्या वर्षभरापासून दोघांमध्ये याबाबत चर्चा सुरू होती. आता टाटा समूहासोबत ‘विस्ट्रॉन’ कारखाना घेण्याच्या कराराला मान्यता देण्यात आली.
या करारानंतर टाटा समूह अडीच वर्षांमध्ये देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेसाठी अॅपल आयफोन भारतात तयार करेल. टाटांचा आयफोन अडीच वर्षांमध्ये बाजारात दाखल होणार आहे. ‘विस्ट्रॉन’ने २००८ मध्ये भारतात प्रवेश केला. २०१७ मध्ये कंपनीने ‘अॅपल’साठी आयफोनचे उत्पादन सुरू केले. त्यांच्या प्लांटमध्ये आयफोन-१४ मॉडेलची निर्मिती करण्यात आली. दहा हजारांहून अधिक कामगारांसह हा प्लांट ताब्यात घेऊन टाटांनी मोठे यश मिळवले आहे. टाटाच्या अधिग्रहणानंतर ‘विस्ट्रॉन’ भारतीय बाजारपेठेतून पूर्णपणे बाहेर पडेल. विस्ट्रॉन व्यतिरिक्त फॉक्सकॉन आणि पेगाट्रॉनदेखील भारतात आयफोन उत्पादनात व्यस्त आहेत. आता भारतातील स्वदेशी कंपनी टाटानेही यात उडी घेतली आहे.
दरम्यान, ‘इन्फोसिस’चे संस्थापक नारायण मूर्ती यांनी दिलेल्या सल्ल्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. भारताला महाशक्ती बनायचे असेल, अर्थव्यवस्थेमध्ये चीनला मागे टाकायचे असेल तर तरुणांनी आठवडाभरात किमान ७० तास काम करायला हवे, असे नारायण मूर्ती म्हणाले. मूर्ती यांनी ‘द रिकॉर्ड’ या पॉडकास्टमध्ये मोहनदास पै यांच्यासोबत गप्पा मारल्या. या वेळी त्यांनी तरुणांना हा ७० तासांचा सल्ला दिला. सोशल मीडियावर मूर्ती यांच्या ‘७० तासां’च्या सल्ल्याची तुलना अभिनेता शाहरुख खानच्या ‘चक दे इंडिया’ चित्रपटातील सुप्रसिद्ध ‘७० मिनिटां’च्या सल्ल्याशी केली जात आहे. या संवादामध्ये शाहरुख हॉकीपटूंना उद्देशून अंतिम सामन्याप्रसंगी ‘येती ७० मिनिटे तुमच्याकडे आहेत, जी तुमची आहेत, ती तुमच्याकडून कोणीही हिरावू शकत नाही, तेव्हा जगाला तुमचे कौशल्य दाखवून द्या, या आशयाचा सल्ला देतो. हा संवाद प्रचंड लोकप्रिय झाला होता. त्यानंतर आता नारायण मूर्तींनी जणू अर्थव्यवस्थेमध्ये ‘चक दे इंडिया’ करायचे असेल तर तरुणांना आठवड्यातून ७० तास काम करावे लागेल, असे सांगितले.
वेगाने प्रगती करणाऱ्या चीन आणि जपानसारख्या देशांशी स्पर्धा करायची असेल तर आपल्याला उत्पादकता अर्थात प्रॉडक्टिव्हिटी वाढवावी लागेल. सध्या भारताची उत्पादकता कमी आहे. शिवाय आपली सरकारे निर्णय घेण्यासाठी घेत असलेला वेळसुद्धा प्रचंड आहे. त्यातच सरकारी बाबूंच्या भ्रष्टाचारावर अंकुश लावणे आवश्यक आहे. हे सर्व पाहता भारतातील तरुणांना आठवड्यातून ७० तास काम करावे लागेल, असे नारायण मूर्ती यांनी म्हटले. नारायण मूर्ती म्हणाले की दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी आणि जपान हे देश उद्ध्वस्त झाले होते; मात्र त्यांच्या देशातील नागरिकांनी, विशेषत: तरुणाईने तासनतास काम केले आणि जगाला नव्या कार्यसंस्कृतीचा परिचय दिला. भारताची तरुणाई या देशाची मालक आहे, तीसुद्धा याच ताकदीने अर्थव्यवस्थेसाठी काम करते.जगात स्वत:ला सिद्ध करायचे असेल, तर एकमेव पर्याय म्हणजे स्वत:चे काम. तुमचे कामच आहे, जे तुम्हाला ओळख मिळवून देते. एकदा तुम्हाला कामामुळे ओळख मिळाली, तर मान-सन्मान आपोआप मिळत जाईल आणि सन्मान तुम्हाला शक्तिशाली बनवेल. चीन याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. त्यामुळेच तरुणांना आवाहन आहे की पुढील २० ते ५० वर्षांसाठी दिवसा बारा तास काम करा, त्यामुळे आपला जीडीपी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल.
दरम्यान, नारायण मूर्तींच्या सल्ल्यानंतर तरुणाईमध्ये मतमतांतरे आहेत. ‘ओला’चे ‘सीईओ’ भाविश अग्रवाल यांनी नारायण मूर्तींच्या सल्ल्याशी सहमती दर्शवली. आमच्याकडे कमी काम आणि मनोरंजनासाठी वेळ नाही. अन्य देशांनी ज्यासाठी अनेक पिढ्या घालवल्या, ते आपण एकाच पिढीत साध्य करू शकतो, असे अग्रवाल म्हणाले. दुसरीकडे, सिनेनिर्माते रोनी स्क्रूवाला यांनी नारायण मूर्ती यांच्या विचारांशी असहमती दर्शवली. स्क्रूवाला म्हणाले की केवळ दीर्घकाळ काम केल्याने उत्पादकता वाढेल, असे वाटत नाही.
आता बातमी रिलायन्समध्ये दाखल झालेल्या नव्या पिढीची. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भागधारकांनी ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांची कंपनीचे बिगर कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. कंपनीने नियामक फाइलिंगमध्ये स्टॉक एक्स्चेंजला सांगितले की रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळावर तीन भावंडांना नॉन-एक्झिक्युटिव्ह संचालक म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. ९० टक्क्यांहून अधिक भागधारकांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. रिलायन्स इंडस्ट्रीजने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, हा ठराव २६ ऑक्टोबर २०२३ रोजी बहुमताने मंजूर करण्यात आला. ईशा अंबानी यांच्या नावासाठी एकूण ९८.२१ टक्के मते मिळाली तर आकाश अंबानी यांना ९८.०६ टक्के मते मिळाली. अनंत अंबानी यांना एकूण ९२.६७ टक्के मते मिळाली आहेत. २८ ऑगस्ट २०२८ रोजी ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी घोषणा केली होती की ईशा, आकाश, अनंत अंबानी यांचा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळात नॉन-एक्झिक्युटिव्ह संचालक म्हणून समावेश केला जाईल. या तिघांचाही संचालक मंडळात समावेश करण्याच्या प्रस्तावाला कंपनीच्या संचालक मंडळाने यापूर्वीच मान्यता दिली होती; पण भागधारकांच्या मंजुरीची प्रतीक्षा होती. आता भागधारकांनीही तिन्ही भावंडांचा संचालक मंडळात समावेश करण्यास मान्यता दिली आहे.
नीता अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला होता. ईशा, आकाश आणि अनंत अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजचे वेगवेगळे व्यवसाय हाताळत आहेत. रिलायन्स रिटेलची जबाबदारी ईशा अंबानीकडे आहे. याशिवाय तिला जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या बोर्डावर नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बनवण्यात आले आहे. आकाश अंबानी यांच्याकडे रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या टेलिकॉम आणि डिजिटल व्यवसायाची जबाबदारी आहे, तर अनंत अंबानीकडे ऊर्जा व्यवसायाची जबाबदारी आहे. ऑगस्ट महिन्यातील सर्वसाधारण सभेला संबोधित करताना मुकेश अंबानी म्हणाले होते की ते रिलायन्सच्या पुढच्या पिढीचे नेतृत्व तयार करतील. आकाश, ईशा आणि अनंत यांना मार्गदर्शन करणे हे त्यांचे सर्वात मोठे प्राधान्य आहे. यामुळे ते पुढील काळात सामूहिक नेतृत्व देऊन येत्या दशकात रिलायन्स समूहाला विकासाच्या नव्या उंचीवर नेऊ शकतील.