‘दिवाळीपूर्वी योजनेचे उद्घाटन करा, अन्यथा उपोषण’
विरार : वसई – विरारला १८५ एमएलडी पाणी देण्यासाठी एमएमआरडीएकडून तयार झालेल्या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे दिवाळीच्या आत उद्घाटन करून जनतेला दिलासा द्यावा या मागणीसाठी रविवारी विरारमधील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरून नागरिकांनी जोरदार आंदोलन केले. या दिवाळीपूर्वी या योजनेचे उद्घाटन करा नाही तर नाइलाजास्तव १५ नोव्हेंबरनंतर यासाठी आमरण उपोषण सुरू करावे लागेल, असे ‘पाणी हक्क आंदोलना’चे प्रमुख नेते मयुरेश वाघ यांनी यावेळी जाहीर केले. त्यामुळे या पाणी योजनेच्या उद्घाटनासाठी आता पाणी हक्क आंदोलन आणखी तीव्र होणार आहे.
विरार पश्चिमेच्या विविध भागांतील नागरिकांनी रविवारी संध्याकाळी मयुरेश वाघ यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यांवर उतरून सूर्या पाणी योजनेचे रखडलेले उद्घाटन करण्याची मागणी केली. कोणीही श्रेय घ्यावे, पण जनतेला पाणी द्यावे व लवकरात लवकर सूर्या योजनेचे उद्घाटन करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली. विरारच्या बायपास रस्त्यावरून सुरू झालेल्या या मोर्चाचा समारोप पेट्रोल पंम्प येथे झाला. त्यात शेकडो महिला – पुरुष, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.
आम्ही सतत पाठपुरावा करून पाणी योजनेचे काम पूर्ण करून घेतले आहे, त्यानंतर पाणी योजनेच्या उद्घाटनासाठी सरकार दरबारी पण पाठपुरावा करीत आहोत आणि रस्त्यावर संघर्ष करून जनतेच्या तीव्र भावनाही सरकार व प्रशासनापर्यंत पोहोचवित आहोत. पाण्यासाठी लोक तहानलेले आहेत. दिवाळीपूर्वी पाणी योजनेचे लोकार्पण करून सूर्याचे पाणी लोकांना सुरू करा, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन उभारू आणि आपण १५ नोव्हेंबरनंतर आमरण उपोषण करणार, असे वाघ यांनी जाहीर केले. यास हजारो लोकांनी समर्थन दिले असून, आम्हीही आमरण उपोषणाला बसणार असे महिला – पुरुष कार्यकर्त्यांनी या मोर्चात सांगितले.
नुकतेच खा. गावित, वाघ यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाणी योजनेचे उद्घाटन करण्याबाबत निवेदन दिले आहे.
- २०१७ पासून सुरू झालेले सूर्या पाणी योजनेचे काम खासदार राजेंद्र गावित, आमदार प्रताप सरनाईक व मयुरेश वाघ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने मार्गी लागले असून, योजनेचे काम पूर्ण झाले आहे. जून महिन्यात पाणी योजनेचे काम पूर्ण झाले आहे, पण आतापर्यंत योजनेचे उद्घाटन झालेले नाही.
- विरार पश्चिमेच्या विविध भागांत अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक, विशेषतः महिला रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी पाणी देण्याची रविवारच्या आंदोलनात मागणी केली. रविवारी सकाळी १२ वाजता आंदोलनाची हाक देऊन सायंकाळी शेकडो लोक रस्त्यावर उतरून उत्स्फूर्तपणे हे आंदोलन झाले.