जयपूर: राजस्थानच्या दौसा येथे एका प्रवासी बसला झालेल्या भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे तर या अपघातात २४ जण जखमी झाले आहे. या अपघातातील जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात डीएमसह सर्व अधिकारी घटनास्थळी पोहोचले. हा अपघात नॅशनल हायवे २१वर झाला. येथे एक प्रवासी बस पुलाचे रेलिंग सोडून खाली रेल्वे ट्रॅकवर कोसळली. यामुळे रेल्वेच्या प्रवासालाही ब्रेक लागला.
दौसाचे डीएम कमर चौधरी यांच्या माहितीनुसार रविवारी रात्री सवा दोन वाजण्याच्या सुमारास नॅशनल हायवे २१वर हा भीषण रस्ते अपघात ाला. येथे हरिद्वार येथून जयपूरच्या दिशेने जाणाऱ्या या बसच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि पुलाचे रेलिंग तोडून ही बस खाली कोसळली. ही बस थेट जयपूर दिल्ली रेल्वे मार्गाच्या ट्रॅकवर कोसळली. बस पुलावर खाली कोसळून रेल्वे ट्रॅकवर पडल्याची बातमी ऐकून तातडीने तेथे पोलीस तसेच अॅम्ब्युलन्सची गाडी रवाना झाली.
अपघातानंतर काही वेळात जिल्हा अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अपघाताची माहिती जशी रेल्वे कंट्रोल रूमला मिळाली तसे तत्काळ जयपूर-दिल्ली रेल्वेमार्गावरील अप आणि डाऊन रेल्वे मार्ग बंद करण्यात आले.
पुलावरून खाली कोसळून पलटली बस
मिळालेल्या माहितीनुसार हरिद्वार येथून जयपूरच्या दिशेने जाणाऱ्या या प्रवासी बसचे रात्री सव्वा दोनच्या सुमारास नियंत्रण सुटले. वेगात धावणारी ही बस लोखंडाचे रेलिंग तोडून सरळ ट्रॅकवर जाऊन कोसळली. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २४ जण जखमी झाले त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.