एका सामान्य कुटुंबातून पुढे येत अपंगत्वावर मात करत मनीषाताईंनी आपले स्वत:चे अस्तित्व निर्माण केले अाहे. मनीषाताईंची उंची त्यांच्या कर्तृत्वाच्या आड कधी आली नाही. अतिशय धीट स्वभाव, स्वावलंबीपणा, जिद्द, दयाळूपणा, नवीन गोष्टींचा ध्यास हे सर्व गुण त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहेत. लहान-सहान कारणांनी निराशा येणाऱ्यांसाठी त्या एक आदर्श आहेत.
सन २०१५. एके दिवशी सकाळी माझा मोबाइल खणखणला. फोन मनीषाताई कदम यांचा होता. गोड व स्पष्ट आवाजात मनीषाताई यांनी मला विचारले, “आम्ही डाॅ. विजया वाड यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांसाठी बालकोश प्रसिद्ध करीत आहोत, तर त्यासाठी तुम्ही बालकथा द्याल का? संपूर्ण महाराष्ट्रातील लेखकांकडून आम्ही साहित्य मागवत आहोत.” मी बालकोशासाठी त्यांच्याकडे बालकथा पाठविल्या. तेव्हापासून आमची एकमेकींशी मैत्री जुळली. आपल्या व्यस्त दिनचर्येत मनापासून रममाण होणाऱ्या मनीषाताईंना मी अजून प्रत्यक्ष भेटले नसले तरी आम्ही दोघी फोनवर बोलत असतो. मनीषाताईंसोबत बोलून मला त्यांच्या जीवन संघर्षाबद्दल जाणून घ्यायचं होते. अपंगत्व असूनही जीवनाची लढाई त्यांनी कशी पार केली, हे जाणून घेण्याची उत्सुकता होती.
मनीषाताई एका सामान्य कुटुंबातील स्त्री. त्यांचे वडील गिरणी कामगार. त्यांची आई प्रेमळ, साध्या स्वभावाची. त्यांना अजून पाच भावंडे आहेत. आई-वडिलांच्या प्रेमळ छत्राखाली सर्वजण मोठे होत होते. मनीषाताईंचे प्राथमिक शिक्षण महानगरपालिकेतील शाळेत, तर माध्यमिक शिक्षण शारदाश्रम विद्यामंदिर येथे पूर्ण झाले. पुढे बी.ए.एम.ए. तसेच ग्रंथालय आणि माहितीशास्त्र पदव्युतर पदवी त्यांनी प्राप्त केली. शारीरिक अपंगत्व असूनही त्यांनी शिक्षणात कधी तडजोड केली नाही. मनीषाताई भरपूर शिकल्या, यासाठी त्यांच्या आईचे त्यांना सदैव प्रोत्साहन होते. अनेक गुरूजन, शिक्षक यांचा त्यांना सहवास लाभला.
दहावीनंतर महाविद्यालयातून घरी आल्यावर त्यांनी घरी शिकवणी सुरू केली. यातून त्यांना आत्मिक समाधान, तर मिळायचेच व दुसरे म्हणजे त्यांना स्वकमाईची सवय जडली. शारीरिक अपंगत्वामुळे नोकरी हा विषय मनीषाताईंच्या विचारात नव्हता; परंतु काहीतरी वेगळं करण्यासाठी ईश्वराने आपल्याला इथे आणले आहे, अशा विचारांनी त्या सकारात्मकरीत्या जीवनाला, परिस्थितीला सामोरे जाण्याचा प्रयत्न करीत होत्या.
मनीषाताईंची आई २००१ मध्ये निधन पावली. आईच्या आठवणीने हळव्या होताना त्या म्हणाल्या, “मी माझ्या आईला नेहमी म्हणायचे, आई, मी अशी अपंग. तुला माझी काळजी वाटत नाही का?” आई म्हणायची, “तुझं सर्व छान होईल.”
मनीषाताई म्हणतात, “मला तेव्हा वाईट वाटायचं. पण आता मला उत्तर मिळतयं. अपंगत्वाने मला बळकटी दिली. जिद्द दिली. माझ्या आईने माझ्यातील बळ जागृत केलं.” मनीषाताईंच्या भावंडांनी आपापल्या कुवतीनुसार शिक्षण घेऊन आपला छंद जोपासला आहे. त्या म्हणतात, “आम्ही कोणीच एकमेकांवर अवलंबून नसलो तरी वेळ पडल्यास एकमेकांच्या मदतीला धावून जातो.”
आई देवाघरी गेल्यानं मनीषाताईंना छत्रछाया, सुरक्षिततेचे कवच गेल्याची जाणीव झाली व स्वत्व काय असते याचे भान त्यांना आले. मनीषाताईंना आपण करत असलेले काम अतिशय आवडते. त्याबद्दल त्या कौतुकाने म्हणतात, “माझी नोकरी व शिकवणी या दोन्ही गोष्टीतील मुख्य दुवा ग्रंथ असल्याने दोन्ही ठिकाणी समतोल साधणे मला शक्य होते. ग्रंथालय व शिकवणी अशा दोन्ही ठिकाणी ज्ञानार्जनाचे काम असल्याने दिवस सत्कारणी लागतो. विद्यार्थी घडवत असताना नकळत माझे ज्ञान अद्ययावत होत असते.”
“भ्रमणध्वनीच्या अतिवापरामुळे, ऑनलाइन शिक्षण यामुळे विद्यार्थी व तरुण वर्ग यांचे वाचन, लेखन कमी झाले आहे. पुस्तक वाचन कमी झाले. त्यामुळे सामान्य ज्ञान, वाचन याची गोडी न राहाता सर्वजण यांत्रिकी बनले. २०२० मधील कोरोना परिस्थितीत तर या महाजाल यंत्रणेने सर्वांच्या हृदयाचा ठाव घेतला. भ्रमणध्वनी ही अत्यावश्यक गरज ठरली. कारण सर्वच कारभार ऑनलाइन झाले” असे मनीषाताई म्हणतात.
मनीषाताई विद्यार्थी-तरुण वर्ग यांना एक महत्त्वपूर्ण संदेश देऊ इच्छितात की, “नेहमी वर्तमानपत्र वाचा. चरित्र, विज्ञान वाचा. आपण जे वाचले त्याची रोज रात्री झोपताना उजळणी करा. वाचनातून प्रेरणा मिळेल. तुम्हाला काहीतरी लिहावसं वाटेल. आधुनिक काळात प्रमाणात भ्रमणध्वनी वापरला पाहिजेच. पण परंपरा, संस्कृती, वाचन विसरू नका.”
त्या अभिमानाने सांगतात की, “त्या प्रसिद्ध लेखिका डाॅ. विजया वाड यांच्या मानसकन्या आहेत. डाॅ. वाड यांच्या प्रत्येक प्रकल्पात मनीषाताईंचा सहभाग असतोच. मध्यंतरी डाॅ.वाड यांच्या संपादनाखाली जे विश्वकोशाचे काम चालू होते, त्यात मनीषाताईंनी अभ्यागत संपादक म्हणून आठ-नऊ महिने काम केले. त्यावेळी महाराष्ट्र कन्या चरित्र कोशाची सीडी तयार करण्याचे काम डाॅ. विजया वाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होते. तेव्हा विविध क्षेत्रांतील स्त्रिया-नामवंत, प्रज्ञावंत, यशवंत, कीर्तिवंत अशा २७५ महिलांची गाथा बनविण्याचे काम सुरू होते. यात मनीषाताईंनी जीव ओतून काम केले. खूप नोंदी लिहिल्या. त्यानंतर डाॅ. वाड यांनी बालकोश तयार केला. त्यात ३६५ दिवस पुरतील एवढ्या कथा व ३६५ कविता होत्या. त्यांनी बालकथा व कवितांचे पाच खंड काढले.
मनीषाताईंनी व्हाॅट्सअॅपवर लेखकांना डाॅ. वाडताईंनी दिलेले निमंत्रण टाकून संबंध महाराष्ट्रातले लेखक गोळा केले. हा मोठा प्रकल्प पूर्ण करताना मनीषाताई कित्येकदा डाॅ. विजया वाड यांच्या घरी राहात असत. त्या दोघी मिळून रात्री अडीच-अडीच वाजेपर्यंत कथांचे वाचन करीत. या सर्व परिश्रमांनंतर हे सुंदर बालकोश तयार झाले. मनीषाताईंची ग्रहणशक्ती अतिशय चांगली आहे. उंचीचा प्राॅब्लेम असल्याने त्या रेल्वेची-गर्दीची ठिकाणे टाळतात. मात्र कमी गर्दीचा बसचा प्रवास त्या करतात. त्यांची उंची त्यांच्या कर्तृत्वाच्या आड कधी आली नाही. अतिशय धीट स्वभाव, स्वावलंबीपणा, जिद्द, दयाळूपणा, नवीन गोष्टींचा ध्यास हे सर्व गुण मनीषाताईंकडून शिकण्यासारखे आहेत. इतके असूनही ‘मी सामान्य आहे’ अशी भावना त्या नम्रपणे व्यक्त करतात.
सध्या मनीषाताई बृहन्मुंबई महानगरपालिकेचे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, प्रभादेवी संचलित सार्वजनिक ग्रंथालय येथे कार्यरत आहेत. आपल्या ग्रंथालयाबद्दल कौतुकाने सांगताना त्या म्हणतात, “श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, प्रभादेवीच्या समोर तीन मजली टुमदार रहेजा इमारतीमध्ये सुमारे चाळीस हजार पुस्तके असलेले, मराठी साहित्यिक व संशोधक, विद्यार्थी यांचे हे हक्काचे दालन आहे. दुर्मीळ संदर्भ, पुस्तके, मासिके, दोलामुद्रीते अशा विविधतेने हे ग्रंथालय समृद्ध आहे. लक्ष वेधून घेणारी ग्रंथांची मांडणी, संगणकीय अद्ययावतपणा, जाणकार ग्रंथपाल यामुळे येथे मराठीतून संशोधन करणाऱ्याला सर्व पुस्तकांची पूर्ती होण्याची दखल घेतली गेली आहे.”
मनीषाताईंचे आपल्या मातृभाषेप्रती, मराठीप्रती योगदान निश्चितच मोठे आहे. अपंगत्वाचा बाऊ न करता, निराशामुक्त जगण्याचे टाॅनिक मनीषाताईंकडे आहे. लहान-सहान कारणांनी निराशा येणाऱ्यांसाठी त्या एक आदर्श आहेत. निर्मळ हास्य, प्रसन्न-आश्वासक चेहरा, अफाट कार्यशक्ती हे मनीषाताईंच्या सदैव उत्साही असण्याचे रहस्य असावे. मनीषाताई, तुमचे हे कार्य अखंडित चालू राहो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…