Thursday, July 18, 2024
Homeसाप्ताहिककोलाजRangbhumi Din : रंगभूमी

Rangbhumi Din : रंगभूमी

  • गुलदस्ता : मृणालिनी कुलकर्णी

भारतीय रंगभूमीचा इतिहास जवळजवळ दोन हजार वर्षांपूर्वीचा. लोकप्रकारांतील जागरण, गोंधळ, भारूड, दशावतार, कीर्तन, वाघ्यामुरळी, कळसूत्री बाहुल्या अशा अनेक रंगमंच कलाकृतीच्या जन्मातून, केवळ वाणीद्वारे भारतीय देशातील सांस्कृतिक वारसा जपण्याचे, त्यातून मानवजातीला बोध देण्याचे काम केले गेले. म्हणूनच भारतीय रंगभूमीचे, नाटकांच्या सादरीकरणाचे बीज या मौखिक परंपरेत आहे.

आज ५ नोव्हेंबर! मराठी रंगभूमी दिन! रंगभूमीच्या सेवेत असणाऱ्या प्रत्येक रंगकर्मीसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस. ज्येष्ठ पत्रकार जयंत पवार लिहितात, ‘खरं तर नाटकवाल्यांसाठी तो ज्या दिवशी नाटकाचा प्रयोग करतो तो त्याचा रंगभूमी दिन असतो. खरा नाटकवाला हा २४ तास नाटकवाला असतो.’ नटेश्वराची पूजा करून तिसऱ्या घंटेनंतर लाल मखमली पडदा बाजूला होत अंधारातले प्रेक्षक उजळलेल्या रंगमंचावर जिवंत कलाकृती पाहतात.

भारतीय रंगभूमीचा इतिहास जवळजवळ दोन हजार वर्षांपूर्वीचा. लोकप्रकारांतील जागरण, गोंधळ, भारूड, दशावतार, कीर्तन, वाघ्यामुरळी, कळसूत्री बाहुल्या अशा अनेक रंगमंच कलाकृतीच्या जन्मातून, केवळ वाणीद्वारे भारतीय देशातील सांस्कृतिक वारसा जपण्याचे, त्यातून मानवजातीला बोध देण्याचे काम केले गेले. म्हणूनच भारतीय रंगभूमीचे, नाटकांच्या सादरीकरणाचे बीज या मौखिक परंपरेत आहे. दैनंदिन जीवनात अनेक समस्यांनी त्रासलेल्या लोकांना आनंद देणे, मनोरंजन करणे हेच त्याकाळी नाटकाचे प्रयोजन होते. खेडोपाडी संध्याकाळी मोकळ्या ठिकाणी तत्कालीन दिवसा घडलेल्या घटना संध्याकाळी उपहासात्मक अनेकजण सादर करीत होते, तेच पथनाट्य.

भरत मुनीना ‘भारतीय नाट्य कलेचे जनक’ मानले जाते. त्यांनी लिहिलेल्या ‘नाट्यशास्त्र’ ग्रंथात नाटकाविषयी सर्व जाणकारी आहे. नाटक ही सादरीकरणाची कला (आर्ट ऑफ परफॉर्मिंग्ज) व्यक्त होण्याचे माध्यम असल्यामुळे साहित्यात नाटक हा वेगळा प्रकार आहे. नाट्यसंहिता, नाट्यदिग्दर्शन, अभिनेता रंगमंचावर संवाद सादर करताना त्या दृश्याचा परिणाम साधण्यासाठी वेषभूषा, रंगभूषा, नेपथ्य, ध्वनी, प्रकाश हे साहाय्यक घटक मदत करतात.

रंगभूमी! रंग म्हणजे आंगीक कलाविष्कार! व्यक्तीने किंवा समुदायाने कला सादर करण्याचे स्थान (भूमी) ती रंगभूमी! रंगभूमी ही एक समाजाची कला, जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे, तोपर्यंत रंगभूमी जिवंत राहील.

सांगली येथे चिंतामणराव पटवर्धन यांच्या आश्रयास असलेल्या विष्णुदास भाव्यांनी दशावतार आणि यक्षगानच्या प्रभावाखाली लिहिलेले ‘सीता स्वयंवर’ आख्यान ५ नोव्हेंबर १८४३ साली सादर केले. या प्रयोगामुळे विष्णुदास भाव्यांना ‘मराठी रंगभूमीचे जनक’ मानले जाते. त्यानंतर पौराणिक, ऐतिहासिक, प्रहसनानंतर ‘थोरले माधवराव पेशवे’ हे पहिले संपूर्ण लिखित नाटक. त्याआधी १८५५ साली महात्मा फुले यांनी सर्वात प्रथम लिहिलेले ‘तृतीय रत्नाकर’ नाटकावर ब्रिटिशांनी बंदी आणल्याने ते प्रकाशित झाले नाही.

विष्णुदास भाव्यांनी शंभर वर्षांपूर्वी सादर केलेल्या दिवसाचे महत्त्व आणि औचित्य जाणून १९४३ साली वि. दा. सावरकरांच्या अध्यक्षतेखाली ‘५ नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन’ म्हणून घोषित केला गेला.

१८० वर्षांची परंपरा असलेले नाटक, आज २१व्या शतकात मनोरंजन आणि प्रबोधन याची सांगड घालत, नव्या रंगभूमीचा प्रवास चालू आहे. रंगभूमी शिक्षण देते, साक्षरता वाढविते. रंगभूमी ही एक सांस्कृतिक घटना आहे. समाजाने आरशात स्वतःचे निरीक्षण करावे.

रंगभूमीवरील लाइव्ह परफॉर्मन्स (जिवंत अभिनय) प्रेक्षकांना स्पष्ट, मुक्त अनुभूती देतो. रंगभूमी, स्टेज कलाकारांना, प्रेक्षकांना जाणीव करून देतो आपण एकटे नाही. नाटकांत तत्काळ मूड बदलणे हे मोठं कसब असते. रंगमंचासाठी अभिनय ही सर्वसमावेशक प्रक्रिया आहे. संहिता तीच असली तरी प्रत्येक प्रयोगात प्रेक्षक वेगळा असतो. अभिनय अनोखा होतो. रंगभूमीवरचा प्रत्येक क्षण इतका टवटवीत असतो की दुसऱ्याच क्षणी तो मरून जातो. या तंत्रज्ञान युगात अनेक पडदे उपलब्ध असतानाही जिवंत कलाकृतींचा प्रभाव निश्चितपणे महत्त्वाचा असतो. किर्लोस्कर, देवल, गडकरी, खाडिलकर/वरेरकर, रांगणेकर/अत्रे, शिरवाडकर, तेंडुलकर, कानेटकर, मतकरी, दारव्हेकर ते प्रशांत दळवी… या नाट्यलेखकांनी, दिर्ग्दशकांनी, ताकदीच्या नटांनी, तंत्रज्ञांनी आजपर्यंतची मराठी रंगभूमी समृद्ध केली.

रंगभूमी! विविध रंगांच्या विचारांनी नाटक सजलेले आहे. रंगभूमी डॉट कॉममध्ये गायत्री देवरुखकर यांनी नवरात्रातील नऊ रंगांचा अभिप्रेत असलेल्या अर्थावरून आजच्या सर्व प्रकारच्या (सामाजिक, विनोदी, रहस्यमय, संगीत, काळाच्या पुढचे, तरुणाचे चालू प्रश्न, मनोरंजन) नाटकांचा परामर्श उत्तम घेतला आहे.

रंगभूमीचा इतिहास उलगडताना संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी ‘चि. सौ. कां. रंगभूमी’ या नाटकांत जुन्या संगीत नाटकातील पदे आणि काही प्रसिद्ध नाटकातील प्रवेश या दोन्हीचे सादरीकरण अतिशय कुशलतेने केले आहे. आज नाटकं पाहणे ही फक्त करमणूक नसून विचार करायला लावणारा रंगभूमीचा खेळ आहे. आंतरशालेय, महाविद्यालयीन, राज्यस्तरीय आणि विविध स्तरावर नाट्य स्पर्धा होणे आवश्यक आहे. आज अनेक हौशी तरुण कलाकारांचे ग्रुप ठिकठिकाणी नाटक करीत आहेत. बालनाट्य, समांतर नाट्य (रंगायन, अाविष्कार) यातून जे बाहेर येते ते उत्तमच असते. प्रयोग करणे म्हणजे रंगभूमीला काहीतरी नवे देणे. या साऱ्यांमुळे रंगभूमीचा विकासच झाला.

बदलत्या काळानुसार नाट्यलेखनात पुष्कळ परिवर्तन झाले आहे. बया दार उघड, इडियट, सुमी आणि आम्ही… नाटक म्हणजे अभिनयातून जनसमुदायाशी संवाद साधताना दिलेला संदेश. भावभावनांचे अंतरंग उलगडून दाखविणारी कला. ही कला सादर करताना १०० टक्के संवाद झाला पाहिजे, असे पु. ल. म्हणत. आजही काही नाटकांना हाऊसफुल्लचे बोर्ड लागतात. प्रशांत दामले यांचे १२,५०० प्रयोग, भारत जाधव यांचे सही रे सहीचे हजार प्रयोग. याचाच अर्थ मराठी रंगभूमीला मरण नाही.

‘जग ही एक रंगभूमी आहे.’ शेक्सपिअरचे प्रसिद्ध वचन! रंगभूमीकडून जगाकडे पाहा. यासाठी नाटकांचे विषय, विषयांची मांडणी हीच नाटकाची ताकद आहे. नाटकाशी जोडलेला प्रत्येक रंगकर्मी नाट्यसृष्टी आतून, बाहेरून पाहतो. येथे प्रत्येक क्षण सजीव असतो. नव्याने जन्म घेतो. हेच रंगभूमीच्या अभ्यासाचे तात्त्विक चिंतन आहे. दुसऱ्या बाजूने प्रत्येकाला आपल्या आयुष्यात आपली भूमिका पार पाडताना क्षणोक्षणी अभिनय करताना, तो चेहऱ्यावरचे रंग बदलतो, बोलणे फिरवितो. नाटकात तर लिहिलेलेच बोलले जाते.

दरवर्षी रंगभूमी दिनी प्रदीर्घ काळ रंगभूमीची सेवा करणाऱ्या कलाकारांना विष्णुदास भावे पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. रंगकर्मी घडताना आणि रंगभूमी घडविताना, प्रेक्षक हा सर्वात पहिला रंगकर्मी आहे. मराठी नाटक म्हणजे काय हा प्रश्न आताच्या मराठी मुलांना पडू नये. रंगभूमीचा आवाका मोठा, अभ्यासाच्या अनेक बाजू आहेत. मी फक्त मराठी रंगभूमी दिनानिमित्त या विषयाला स्पर्श केला. नमन नटवरा विस्मयकारा…

mbk1801@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -