भल्या पहाटे
जंगलात पडली थंडी
सर्व पशुपक्ष्यांची
उडाली घाबरगुंडी
सर्वत्र पसरले
पांढरे दाट धुके
गारठलेला कुत्रा
जोरजोराने भुके
चिमणीची पिल्लं
खोप्यात बसली दडून
हरणाच्या अंगावरील शाल
कोल्ह्याने घेतली ओढून
हत्तीने घातला
उलनचा जाड कोट
बटण गेले तुटून
उघडे राहीले पोट
कुडकुडणाच्या माकडाने
घातली कानटोपी
जाडे भरडे पोते पांघरून
गाढव गेला झोपी
थंडीने केली
सर्वांची अशी दैना
उन्हाची वाट पाहे
राघू आणि मैना
खोकडून खोकलून
सिंह वैतागला जाम
गारठणाऱ्या थंडीत
सर्वांना फुटला घाम
– रवींद्र व्ही. चालीकवार, महागाव, जि. यवतमाळ
माणसांचे चेहरे, इथे
‘मुखवट्यात’ जगताहेत,
स्वतःच्याच प्रतिबिंबाकडे
प्रश्नांकित बघताहेत! …१
सरड्यासारखे घडी-घडिला
रंग नवे बदलताहेत,
सावली हरवून, स्वतःचे
अस्तित्व मात्र जपताहेत! …२
कर्तृत्वाची कोरी पाटी
कोळशाने गिरवताहेत,
चारित्र्याला काळे फासून
सफेदित मिरवताहेत! …३
विवेकाला टोपी घालून
जुनी कात टाकताहेत,
व्यभिचाराचं पोट फुगवून
उघडं पितळ झाकताहेत! …४
कावळ्यासारखे खरकट्यावर
ताव मारीत ढेकरताहेत,
बेडकाच्या औलादीचे
बैलाएवढे फुगताहेत! …५
हरिनामाचा टिळा लावून
टाळ-मृदंग कुटताहेत,
अभंगाचे शील-सत्व
लावणीसंगे लुटताहेत! …६
लाज-शरम चुलीत घालून
लिंगपिसाट पेटताहेत,
वासनेचे कुल्ले थोपटीत
आपलं घोडं रेटताहेत! …७
‘थुकी’ लावून कर्तव्याला
पोळी आपली शेकताहेत,
हात बांधून ढुंगणावरती
इमान आपले विकताहेत! …८
बुडाखालच्या अंधारात
दिशाहीन भटकताहेत,
आणि अखेर ‘तोंड घेऊन’ एकदाचे
भिंतीवर जाऊन लटकताहेत! …९
– पांडुपुत्र, कल्याण (पश्चिम), जि. ठाणे
भेंडीची भाजी चिकट चिकट
मिरच्या खायला खूपच तिखट
कारल्याची भाजी कडूच कडू
कांद्याला पाहताच येतंय रडू
हिरवा चुका लागतोय आंबट
शेपू मेथीचं दाताला संकट
गाजर मुळे आणि बटाटा बीट
चवीला कुठे लागतात नीट
लेकरं धरतात पक्कीच गुळणी
नावडतीचं मीठच अळणी
सर्वच भाज्यांना ठेवतात नाव
केवळ मागतात बटर पावं
– भानुदास धोत्रे, परभणी
राऊळाच्या पायरीचा देह तो उरणार आहे
मोहमाया लोभसारा कोणता सरणार आहे..
त्या तुक्याच्या सोबतीने देव माझा शोधताना
माणसाचा चेहराही आतला छळणार आहे..
या युगाचा हुंदका पण ओळखीच्या आसवांचा
काळजाचा घाव सारा शेवटी झरणार आहे
वेदनांचा गाव माझा आत माझ्या जागताना
ऐनवेळी जाणिवांचा पार तो रडणार आहे
मोक्ष देण्या पावलांना सावळ्या ये मायदारी
उंब-याचा कोंडमारा काय तो कळणार आहे…
– डॉ.पल्लवी परुळेकर-बनसोडे
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टेस्लाचे मालक इलान मस्क यांच्यात काल दूरध्वनीवरून चर्चा झाली. या चर्चेचा…
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…