- कविता : एकनाथ आव्हाड
आमच्या घरी येते
रोज वर्तमानपत्र
आम्ही म्हणतो त्याला
आमचा ‘दैनिक’ मित्र
आठवड्याची माहिती
जे पत्र देते
‘साप्ताहिक’ म्हणूनच ते
ओळखले जाते
पंधरवड्यातून एकदा
प्रसिद्ध होते जे
‘पाक्षिक’ म्हणूनच
नावाजले जाते ते
महिन्याला हमखास
जे येते हाती
‘मासिक’ म्हणूनच
आहे त्याची ख्याती
दर तीन महिन्यांनी
जे आपण वाचतो
‘त्रैमासिक’ म्हणूनच
डंका त्याचा वाजतो
दर सहा महिन्यांनी
जे होते प्रसिद्ध
‘षण्मासिक’ म्हणूनच
ते होते सिद्ध
वर्षातून एकदा जे
प्रसिद्ध होते
‘वार्षिक’ नावानेच ते
सर्वदूर पोहोचते
नियतकालिकांचे हे
सारेच आहेत प्रकार
वाचनातून विचारांना
ते देत असतात आकार
काव्यकोडी : एकनाथ आव्हाड
१) चहूबाजूने झाडे
आत रंगीबेरंगी फुले
कारंज्याच्या भोवताली
खेळ खेळतात मुले
शहरातले हे नंदनवन
नाव दोन अक्षरांचं
मिळे येथे विरंगुळा
नाव सांगा याचं?
२) हालचालीवर आपल्या
नियंत्रण हा ठेवतो
भावनांची जाणीव
आपणास करून देतो
सभोवतालचे टिपण्यास
असतो सदा जागा
स्मरणशक्तीचे काम
कोण करतो सांगा?
३) भूकंपाचा उगम
जेव्हा समुद्रात होतो
समुद्र तेव्हा फारच
आतून खवळला जातो
उंचच उंच लाटा
किनाऱ्यावर आदळतात
सांगा या लाटांना
काय बरं म्हणतात?
उत्तरे :-
१) बाग
२) मेंदू
३) त्सुनामी