Sunday, July 21, 2024
Homeसाप्ताहिककोलाजMacaw Bird : मकाव पक्षी माती खातात!

Macaw Bird : मकाव पक्षी माती खातात!

  • निसर्गवेद : डॉ. महालक्ष्मी वानखेडकर

मी जगातील विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण पोपटांवर माझा अभ्यास सुरू केला होता. जगातील सर्वात मोठे पोपट “मकाव” यांच्यावर चित्र काढायचे ठरवले, तेव्हा माझा मंत्रमुग्ध करणारा विषय म्हणजे ॲमेझॉन वर्षा वनामधील मकाव माती खातात. या विषयांवर मी अभ्यास करायला सुरुवात केली.

मकाव पक्षी मध्य आणि उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, उत्तर बोलीव्हिया, मेक्सिको ते कोलंबिया, ॲमेझॉन बेसिन आणि कॅरिबियन येथे आढळतात. हायसिंथ, इंडिगो, सोनेरी निळा, बफोन्स, लाल-हिरवा, निळ्या गळ्याचा, स्कार्लेट, मिलिटरी, गंभीर, रेड फ्रंटेड, क्युबन अशा मकाव पक्ष्यांच्या अनेक प्रजाती आहेत. स्पिक्स ही प्रजाती दुर्मीळ आहे. असं म्हटलं जातं की, जगात पोपटांच्या ३७६ पेक्षा जास्त प्रजाती आहेत. हाय सिंथ ही प्रजाती सर्वात मोठी आहे, जी ३.५ फूट लांबीपर्यंत असू शकते. यांचे पंख चार ते पाच फूट असतात. निळे पिवळसर, लाल, हिरवे मिश्रण असणारे असे अनेक मकाव वर्षा वनामध्ये दिसतात. हे सामाजिक कळपाने राहणारे पक्षी आहेत, मकाव बुद्धिमान, कर्कश्श आवाजात एकमेकांशी संवाद साधणारे आणि इतरांच्या आवाजाचे अनुकरण करणारे, कधी कधी मानवासारखे बोलणारे, रंगीबेरंगी मोठे मोठे पंख, लांब शेपूट असणारे पोपटाच्या जातीतील सर्वात मोठे अतिशय आकर्षक, सुंदर असे पोपट आहेत.

यांची चोच प्रचंड शक्तिशाली असल्यामुळे सहजपणे फळांच्या बिया वेगळ्या करू शकतात. अगदी नारळ सुद्धा फोडू शकतात. त्यांच्या खवलेयुक्त जिभेमध्ये एक हाड असते ज्यामुळे ते अन्नपदार्थांची चव सहज घेऊ शकतात. गर्द वर्षा वनातील रंगीत फळांप्रमाणे, फुलांप्रमाणेच तेही रंगीबेरंगी दिसतात. एक गोष्ट निदर्शनास आली की, गर्द जंगलातील जेवढे पशु-पक्षी, कीटक आहेत तेवढे सगळे खूप रंगीबेरंगी आणि आकर्षक, सुंदर, तलम पंखांचे, शरीराचे आहेत. याचे कारण लक्षात आले की, रंगीत फळ-फुले हा त्यांचा आहार असल्यामुळे त्यांच्या शरीराशी तो निगडित आहे. गर्द जंगलातील या वनस्पतींची पाने, फुले, फळे जमिनीवर पडल्यामुळे जी काही खत निर्मिती होते ती त्या वृक्ष लागवडीला पूरक असते आणि म्हणूनच हे निसर्गचक्र पशू-पक्षी आणि सर्व जीव अगदी निसर्ग नियमानुसारच करून संतुलन राखत असतात. त्यामुळेच हे निसर्गचक्र कुठेही ढासळले जात नाही आणि गर्द जंगलांची निर्मिती परत परत तशीच होत राहते. त्यामुळे सर्व जीवांना सकस, पौष्टिक आणि पूरक आहार मिळत असतो शिवाय प्रदूषणरहित शुद्ध वातावरण राहते. या जगामध्ये कोणताही जीव असो तो पर्यावरणाशी अनुकूलच बनलेला असतो. निसर्गात सहज मिसळणारे रंग तो घेतो त्याचे आकार, रंग, रूप, आवाज हे सर्व निसर्गाशी मिळतं जुळतच असत.

मकाव पक्ष्यांच्या बोटांची पकड ही खूप घट्ट असते. त्यांचे सगळ्यांचे रंग एकमेकांमध्ये मिश्रण झाल्यासारखे वाटतात. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की, पूर्णपणे एका रंगाचे असलेले पक्षी दुसऱ्या रंगांच्या मकावबरोबर संबंध ठेवत असल्यामुळे त्यातून अजून वेगवेगळी रंगनिर्मिती होत असते आणि म्हणूनच हे मकाव पक्षी खूप वेगवेगळ्या रंगांची मिश्रण झालेली आपल्याला दिसतात. हे जर जंगलात राहिले, तर कमीत कमी साठ वर्षे जगतात, असे म्हणतात. हे अन्नाच्या शोधात १५ मैलांपर्यंत उडू शकतात.

येथेही नर हा मादीपेक्षा उजळ आणि आकर्षक रंगाचा असतो. मादीच्या प्रजनन हंगामात मादी जेव्हा अंडी उबवते, तेव्हा नर शिकार करून मादीसाठी आणतात. नर आणि मादी शेवटपर्यंत एकत्र राहतात. घरटे एकत्र बांधतात आणि पिल्लांचा सांभाळही एकत्रच करतात. नर मादीची खूप काळजी घेत असतो. हे खूप खेळकर आणि रोमँटिक पक्षी आहेत. हे मकाव खूप वेगवेगळ्या प्रकारचे शिट्ट्याही वाजवतात आणि बोलतात. सर्वांना वाटतं की, हे खूप कर्कश्श ओरडतात. सर्वसामान्य लोकांना त्यांची भाषा समजत नाही; परंतु हे बडबडे असल्यामुळे सतत बोलत असतात. फक्त त्यांचा आवाज खूप मोठा असतो त्यामुळे तो कर्कश्श वाटतो. पक्ष्यांची भाषा समजताना त्यांच्या चेहऱ्याच्या हावभावावरून आणि कृतीवरून समजते. पक्ष्यांनासुद्धा आपली भाषा आपल्या बोलण्यावरून, आपल्या डोळ्यांच्या आणि चेहऱ्याच्या हावभावावरून अशी समजतच असते; परंतु पोपटांना आणि पाळीव पक्ष्यांना आपली भाषा ही शब्दांवरून सुद्धा समजते. म्हणूनच हे पक्षी पाळीव होतात, आपल्या दिलेल्या सूचनांप्रमाणे सुद्धा ते वागतात.

जंगलात विविध प्रकारच्या विषारी वनस्पती, कीटक असतात. नैसर्गिक चमत्कार म्हणजे आजूबाजूलाच त्यावर उपाय असणारी झाडं, पानं, फुलं, फळं ही असतात. कधी कधी हे पक्षी चुकून विषारी पान, फळं, फुलंही खातात आणि यांना ते औषध नैसर्गिकरीत्या बरोबर माहीत असते. या धरती मातेने आपल्या शारीरिक सर्व गरजा पूर्ण केलेल्या आहेत. जिथे आजार आहे तिथे नैसर्गिक औषधही आहेत. खरं तर असंख्य आजार हे मानवाने स्वतः निर्माण केलेले आहेत. आपल्या चुकीच्या पद्धतीच्या वागणुकीमुळे आपण आजारी पडतो आणि निसर्ग मात्र आपल्याला सशक्त करतो. आश्चर्य म्हणजे आपण निसर्गाला कमकुवत करतो.

‘ॲमेझॉन बेसिन’मधील पोपट आणि मकाव हे डिटॉक्स करण्यासाठी म्हणजेच नैसर्गिकरीत्या आंतरिक शरीर स्वच्छता करण्यासाठी उघड्या नदीकाठची माती खातात. ॲमेझॉनमध्ये कपारीतील माती खाण्यासाठी सर्व मकाव एकत्र येतात आणि तोच क्षण मी टिपला आहे. ७० सेंमी × १२० सेंमी असलेल्या या कलाकृतीत २२ मकाव पक्षी दाखवले आहेत. त्यांना कपारीतील माती उकरून खाताना, वेलीवर डोलताना, आपापसांत प्रेम करताना, काही उडताना, तर काही खेळताना, पानांच्या मागे लपून बसलेले असताना अशा प्रकारे २२ पक्षी वेगवेगळे त्यांच्या दैनंदिन जीवनातील कृती करताना दाखविले आहेत. यातील हाय सिंथ मकाव पक्षी एकमेकांच्या खांद्यावर डोके ठेवून विश्रांती घेत आहेत, मुख्य स्कारलेट मकाव त्याचे मोठे सुंदर आणि रंगीबेरंगी पंख पसरवून उडताना दिसत आहे, निळा मकाव पानांच्या मागे लपलेला आहे, स्कार्लेट जोडी एकमेकांच्या प्रेमात आहेत, काही पक्षी ओल्या मातीत तोंड घालून आहेत, अक्षरशः वेलींवर झुला घेतानासुद्धा स्कार्लेट दिसतोय. हे सर्व पक्षी निसर्गात कित्ती आनंदित, प्रफुल्लित आहेत. सर्व सृष्टीचा त्याच्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद बेमुरादपणे लुटत आहेत. कित्ती प्रेम करत आहेत सर्व पक्षी. इथे कुठेही दुःख-वेदना दिसत नाहीत. या सर्व कलाकृती करताना मीही निसर्गात रमून निसर्गाचा आनंद या सिमेंटच्या जंगलात राहून सुद्धा खूप घेतला. मला जाणवत होते की, ही सुद्धा माझी एक प्रकारे ध्यान धारणाच आहे, माझे स्वर्गसुखच आहे. या कलाकृती करताना मला सर्व जगाचा विसर पडतो हे मात्र नक्की. कारण मी खरोखरच निसर्गात रमलेले असते. खरं सांगू का या जगात निसर्गच एक असा आहे जो आपला आनंद द्विगुणित करत असतो. कितीही दुःखात असलं तरीही आपलं मन शांत करीत असतो. म्हणूनच आपण जपायला पाहिजे या निसर्गाला या धरणी मातेला.

निसर्गाला आपल्या दैनंदिन जीवनात कसे वापरायचे हेदेखील त्यांना चांगले माहीत आहे. निसर्गाकडून औषध कसे घ्यावे, याचे ज्ञान पशू-पक्ष्यांना आहे. या मातीतील खनिजे त्यांच्यासाठी औषधाचे काम करत आहेत. त्यांच्यासाठी हे मल्टीविटामिन आहे. या आर्ट वर्कमध्ये हा विषय निवडण्याचे कारण म्हणजे सर्वांना हे कळावं की, पक्षीसुद्धा त्यांच्या आजारावर नैसर्गिक उपचार करतात. शास्त्रज्ञांच्या मते मातीत असणारी खनिजे आणि सोडियम त्यांना उपयोगाचे असते. यात मला एक मत अजून मांडायचे आहे की, पावसाळ्यामध्ये सर्व औषधी वनस्पतींची मिश्रण पावसाच्या पाण्याबरोबर वाहून मातीत एकत्र होत असतात. त्यामुळे ती माती या सर्व खनिजांनी आणि औषधांनी परिपूर्ण असते. मकाव पक्षी हे मोठे असल्यामुळे त्यांच्या हाडांना आणि पिसांमधील बारीक स्नायूंना शक्ती येण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. त्यांची झालेली झीज भरून काढण्यासाठी कायम सशक्तपणे उडण्यासाठी म्हणून तेही माती खात असावीत. शिवाय पावसाळ्यामध्ये अन्नपचन न होणे पोट बिघडणे ही कारणे आहेतच. कारण मातीमध्ये असणारी खनिजे, सोडियम आणि कॅल्शियम हे त्यांच्या पूर्ण शरीराला सशक्त करतात. या मातीमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. सोडियम स्नायूंना बळकट करण्याचे कार्य करते.

खरं तर नामशेष पक्षी, नामशेष होत आलेले पक्षी आणि आता अस्तित्वात असणारे पक्षी याबद्दल कितीही संशोधन केले तरीही योग्य आकडा आपण सांगू शकत नाही. ग्लॉकोस, ब्ल्यू मकाव जवळजवळ नामशेष होत आले आहेत. आपण आपल्या गरजांसाठी वृक्ष तोडत आहोत. या पक्ष्यांच्या पिसांचा वापर आपण आपल्या सौंदर्यासाठी करत आहोत. पाळीव पक्षी म्हणूनही त्यांची शिकार करत आहोत. सरकारने कितीही बंदी घातली तरीही त्यांची शिकार केलीच जाते, त्यामुळे त्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या सर्व पक्ष्यांना वाचवायचे असेल, तर वर्षा वने संरक्षित करावीच लागतील.

dr.mahalaxmiwankhedkar@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -