Thursday, April 17, 2025
Homeसाप्ताहिककोलाजMarathi theatre : मराठी रंगभूमीच्या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे

Marathi theatre : मराठी रंगभूमीच्या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे

  • प्रासंगिक : भालचंद्र कुबल

दरवर्षी ५ नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. विष्णूदास भावे यांनी १८४३ साली सीता स्वयंवर हे पहिले नाटक सांगली येथे रंगभूमीवर सादर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला. त्याला १९४३ साली शंभर वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्ताने सांगलीत ‘शताब्दी महोत्सव’ या नावाने ५ ते ७ नोव्हेंबर नाट्यमहोत्सव संमेलन आयोजित केले होते. मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने घेतला गेलेला हा धावता आढावा. अनेक रंगकर्मींचा उल्लेख न होऊ शकलेला हा आढावा नाट्याभ्यास करायला भाग पाडणारा आहे. महाराष्ट्र हे एकमेव राज्य असे आहे की, हा अभ्यास जागतिक पातळीवर घेऊन जाईल.

चिंतामणराव पटवर्धन यांच्या पदरी विष्णुदास भावे कारकुनी करीत असत. व्यवसायाच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रात थेट कारवारपर्यंत त्यांचा दौरा असे. त्याकाळी गोवा स्वतंत्र राज्य नव्हते. पश्चिम महाराष्ट्राचाच किंवा उत्तर कर्नाटकाचा भाग म्हणून गोवा गणले जाई. पटवर्धन संस्थानिकांचा व्यापार थेट गोव्यापर्यंत असल्याने विष्णुदास भावे तेथील व्यापाऱ्याच्या भेटी घेत असत. अशाच एका म्हापशातील व्यापाऱ्याने भाव्यांना पाहुणचाराच्या निमित्ताने लोककला रहित एक स्वतंत्र पौराणिक नाटक दाखवले. भाव्यांना ते अतिशय रंजक वाटले. सतत मनोरंजनाच्या नावाखाली लोककला पाहून कंटाळलेल्या प्रेक्षकवर्गाला असे नाटक सादर केल्यास नामी मेजवानी मिळेल, हे भाव्यांनी ताडले आणि ५ नोव्हेंबर १८४३ साली “संगीत सीता स्वयंवर”चा जन्म झाला.

पुढे देशात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. मनोरंजनातून राष्ट्राभिमान जागृत व्हावा या उद्देशाने महाराष्ट्रातील सर्व रंगकर्मींना एकत्र करून एखादे संमेलन आयोजित केले जावे, असा विचार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जाहीर केला व पहिल्या नाट्यप्रयोगाच्या शताब्दीचे औचित्य साधून ५ ते ७ नोव्हेबर १९४३ साली सांगली येथे वि. दा. सावरकरांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन पार पडले. भरतमुनी निर्मित नाट्यशास्त्र या अलौकिक ग्रंथसंपदेनुसार नाट्यविद्या ही चौदा विद्यांपैकी एक असून तिचे जतन व संवर्धन झाले पाहिजे हा ठराव या संमेलनात संमत करण्यात आला. याच दिवशी अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती स्थापित केली गेली व तिच्या अधिपत्याखाली ५ नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जाईल याची घोषणा होऊन, ठराव संमत केला गेला.

भारतीय रंगभूमी जवळपास दोन हजार वर्षांपूर्वीची आहे. तत्पूर्वी म्हणजे अर्वाचिन कालखंडात लोकरंगभूमी आणि लोककलाप्रकार, त्या त्या प्रादेशिक पातळीवर सादर केले जात होते. विशेषतः महाराष्ट्रात सादर होणाऱ्या अनेक विधीनाट्यांनी महाराष्ट्रीय जनजीवन समृद्ध केले आहे. मूलतः जेव्हा आपण भौगोलिकरीत्या सामाजिक जीवनमानानुसार समृद्धतेचा विचार करतो तेव्हा करमणूक अथवा मनोरंजन या घटकाचा विचार करावा लागतो. भारताचा उत्तर व दक्षिण प्रांत राजे-रजवाड्यांनी व्यापला गेल्यामुळे राजाश्रय मिळालेल्या कला विकसित झाल्या. त्यात प्रामुख्याने नृत्यकला तथा चित्रकला, अलंकार कला इत्यादींचा समावेष होतो; परंतु भारताच्या पूर्व व पश्चिमेकडे लोकाश्रय लाभलेल्या कला विकसित झाल्या. नाट्यकला आजही महाराष्ट्र आणि बंगालमधे जेवढी विकसित आहे, तेवढी उत्तर दक्षिणेत आढळत नाही. त्यामुळे पहिल्या प्रयोग निर्मितीच्या औचित्याने साजरा होणारा ‘मराठी रंगभूमी दिन’ इतर राज्यांत नाही.

आपण ज्या प्रदेशात राहातो, ज्या भाषेतून व्यक्त होतो, ज्या माध्यमांद्वारे संवाद साधतो आणि ज्या संवादात भावनिक आपलेपण जपतो, ती कृती म्हणजे नाटक. त्यामुळे महाराष्ट्रात खेळल्या जाणाऱ्या ‘नाटक’ या कृतीवर भारतीय रंगभूमीचा प्रभाव कसा आहे ते यानिमित्ताने जाणून घेऊ. जवळपास ३५० वर्षांच्या कालखंडात मराठी रंगभूमीवर नाटकांच्या अनेक परंपरा आणि प्रवाह आढळून येतात. लोकवाङ्मय, लोककला आणि लोकसंगीताचा प्रभाव तर आजच्या नाटकांवरही दिसून येतो. महाराष्ट्रातील पहिल्या-वहिल्या “सीता स्वयंवर” या मराठी संगीत नाटकावरही दशावतार आणि यक्षगानाचा प्रभाव होता. त्यामुळे भारतीय रंगभूमीवर सादर होणाऱ्या पारसी, इंग्रजी आणि गुजराती रंगभूमीचा मराठी रंगभूमीवर पडलेला प्रभाव नाकारता येणार नाही. खरं तर मराठी संगीत रंगभूमी आणि बुकिश नाटकांची परंपरा यातूनच सुरू झाली.

१८४३ ते १८८० चा कालखंड आधुनिक आणि प्रायोगिक रंगभूमीची बीजे रोवण्याचा काळ समजला जातो. १८५५ साली महात्मा जोतिबा फुले यांचे “तृतीय रत्न” हे नाटक पहिले प्रायोगिक नाटक समजले जाते. यात उच्चभ्रू समाजाकडून सर्वसामान्य कुणबी शेतकरी कुटुंबाचे होणारे आर्थिक, सामाजिक, मानसिक आणि भावनिक शोषण अत्यंत प्रभावीपणे मांडलेले दिसून येईल. १८८० ते १९३० पर्यंतचा कालखंड अभिजनांच्या संगीत नाटकांचा, आख्यान नाटकांचा, बहुजनांच्या ‘तमाशा’ लोकरंगभूमीचा, तसेच शेक्सपियर, मोलियर नाटकांच्या प्रभावाचा राहिल्याने मराठी रंगभूमीच्या दृष्टीने यास सुवर्णयुग म्हटले जाते. या सुवर्णयुगाच्या काळात पारंपरिक नाट्यमूल्य जोपासत अनेक नाट्यप्रवाह निर्माण झाले. लोकरंगभूमी आणि संगीत रंगभूमी ही पूर्वापार प्रभाव टाकत असतानाच, त्यातून मार्गक्रमण करीत प्रायोगिक रंगभूमी, कामगार रंगभूमी, दलित रंगभूमी, बाल रंगभूमी या नवप्रवाहांची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. १९६० नंतर मात्र मराठी रंगभूमीची विकास प्रक्रिया नावारूपास आलेली दिसते. नवतेचा विचार करता आजमितीला मराठी रंगभूमी भारतीय रंगभूमीच्याही पुढे गेलेली आढळते. धर्मवीर भारती, डाॅ. शंकर शेष, मन्नू भंडारी, भिष्म सहानी, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर, तेंडुलकर आणि अनेक दिग्गज प्रायोगिक लेखकांच्या संहिता याच काळात जन्माला आल्या. यातील बऱ्याचशा अमराठी लेखकांच्या होत्या मात्र मराठी रंगभूमीवरील त्या संहितांचा प्रभाव आजही जाणवतो. १९७० नंतरचा कालखंड मात्र रंगभूमीशी निगडित असलेले काही सिद्धांत मांडणारा ठरला. मधल्या काळात मुंबई, पुणे, नाशिक, छ. संभाजी नगर, कोल्हापूर, सांगली आणि नागपूर या शहरांतून मराठी नाटक सामान्य प्रेक्षकांपर्यंत रुजत गेले आणि व्यावसायिक नाटकांना या शहरातून मागणी मिळू लागली. दूरदर्शन आणि मराठी सिनेमातील चेहरे मराठी नाटकात दिसू लागल्यावर व्यावसायिकतेचे गणित बदलले. १९९२-९३ ते २०२३ हा तीस वर्षांचा काळ मात्र मराठी नाटकाला बरंच काही शिकवून गेला. १९९२ साली जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले होते. त्यामुळे होणारे आर्थिक, सामाजिक, तांत्रिक तथा कुटुंबिक बदल आपण पाहिले आहेत. नव्या पिढीने तंत्रज्ञानाचे बोट पकडून नव्या नव्या संकल्पना मंचावर आणण्यास सुरुवात केली. दरम्यान पारंपरिकतेला बाजूला ठेऊन स्वतःचा वेगळा मार्ग अवलंबिण्याचे तंत्र नव्या पिढीने आत्मसात केल्याने मराठी लेखणी समृद्ध झाली. शफाअत खान, राजीव नाईक, प्रेमानंद गज्वी, जयंत पवार, प्रशांत दळवी, मकरंद साठे आणि यांसारख्या अनेक लेखकांनी आपले विचार नव्या फाॅर्म सहित मांडण्याचे धारिष्ट्य याच काळातले. त्यामुळे मराठी रंगभूमी पारंपरिकतेला कवटाळून न राहाता स्वतःचे विधान स्पष्ट करून गेली. भारतीय रंभूमीवर हा बदल केवळ मराठी रंगभूमीने घडवून आणला. एक काळ होता, जेव्हा भारतीय रंगभूमीच्या घटकांचा मराठी रंगभूमीवर झालेला परिणाम आपण पाहात होतो. मात्र २०२३ साली मराठी रंगभूमी जागतिक रंगभूमीवर आपला ठसा उमटवू पाहातेय.

नव्या पिढीने संहितेची दृष्यात्मकता वाढावी म्हणून रंगमंचावर केलेले तांत्रिक बदल, सादरीकरणाची नवीन तत्त्वे (उदा. नाटकाची आंगिक, वाचिक, आहार्य आणि सात्त्विक या चार तत्त्वांबरोबरच “तात्त्विक” या अंगाचा प्रेमानंद गज्वी यांनी मांडलेला सिद्धांत), ग्रीप्स थिएटर, स्ट्रीट प्ले, नाट्य आदी नवनव्या संकल्पनेमधील शक्याशक्यता मागील काही वर्षांत केवळ मराठी रंगभूमीने पडताळून पाहिल्या आहेत. आजमितीला महाराष्ट्रात मराठी रंगभूमीचे अभ्यासक म्हणून गणना करता येतील असे अनेक आहेत. विदर्भातील डाॅ. सतीश पावडे, डाॅ. मंगेश बन्सोड, विलास देशपांडे, पराग घोंगे, संध्या अमृते, विरेंद्र गणवीर, दादाकांत धम्मविजय, डाॅ. काशिनाथ बऱ्हाटे, दिनकर बेडेकर आदी नाट्य अभ्यासकांनी मराठी रंगभूमीला दिशा देण्याचे कार्य विदर्भात राहूनच पार पाडत आहेत. विकसित झालेल्या दळणवळणाच्या साधनांमुळे निदान या मंडळींच्या रंगभूमी योगदानाची नोंद घेतलीच गेली पाहिजे. तीच स्थिती मराठवाड्यातील अभ्यासकांची आहे. मराठवाड्यात राहून जमेल त्या परिस्थितीत नाटक घडत ठेवायचं या एकमेव उद्दिष्टाने झपाटलेल्यांपैकी दिलीप घारे, यशवंत देशमुख, वसंत दातार, माधुरी दातार, अजित दळवी, अनुया दळवी, नंदन फाटक, नाथा चितळे, जयंत शेवतेकर, डाॅ. संजय पाटील देवळाणकर, डाॅ. सतीश सोळंकी, अॅड. सुभाष निकम अशा अनेक नाट्याभ्यासकांनी नाटक प्रगतिपथावर नेऊन ठेवलेय. ही नामावली प्रसिद्ध करण्याचा उद्देश एकच की पुणे-मुंबई-नाशिक प्रमाणे नानाविध प्रयोग या विभागातूनही होताहेत. यातील कित्येक रंगकर्मी तर विकसित शहरांकडे फिरकलेले सुद्धा नाहीत. मात्र नाटकाचा ध्यास घेऊन आजही रंगभूमीची सेवा अविरत सुरू आहे.

आजचं मराठी नाटक संहितेनुरूप प्रचंड प्रगल्भ मानावे लागेल. १९९२ नंतरच्या काळात जे तांत्रिक अंग नाटकात विकसित झालं ते सिनेमा, मालिकांसारख्या माध्यमातही झालं नव्हतं. कोविड काळात तर मराठी नाटकाने वेगळ्या माध्यमात शिरकाव करण्याचा प्रयत्नही झाला. सृजनशीलतेचं प्रमुख अंग असलेला व स्वतंत्र विचारांचा रंगकर्मी वर्ग लिहिता झाला. त्यांच्या अँगलने कथाबीजांचा वेगळाच पॅटर्न रंगमंचावर येऊ घातलाय… आणि हे सर्व होत असता, घडत असता, प्रयोगाधीन सामावले जात असता भारतीय रंगभूमीवर फार काही हालचाल चाललेली नाही. तो पुढाकार मात्र मराठी रंगभूमीने घेतलाय. विविध प्रकारचे ईझम्स, नाट्यपोषक तत्त्वे, रंगभूमीबाबत मते-मतांतरे यांची देवाण-घेवाण सुरू व्हावी याकरिता मराठी रंगभूमीने अनेक विचारवंत जन्माला घातले आहेत. ज्या महान विचारवंतांच्या साक्षीने ५ नोव्हेंबर या मराठी रंगभूमी दिनाचा उदय झाला, त्यांच्या विकसित झालेल्या विचाराचे झेंडे घेऊन पुढला प्रवास मराठी म्हणून सुरू ठेवायचा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -