दृष्टिक्षेप: अनघा निकम-मगदूम
एकीकडे प्रत्येकाला वातावरणातील उष्णता दूर होऊन थंडीची प्रतीक्षा असतानाच पुढच्या आठवड्यात दिवाळी आपल्या दारात येऊन पोहोचते आहे. “दीप” म्हणजे “दिवा” आणि “आवली” म्हणजेच “ओळ”. म्हणजेच दिव्यांची ओळी अर्थात दिवाळी. सर्व सणांचा राजा असलेली ही दिवाळी किंवा दीपावली प्रकाशाचा, नात्यांचा उत्सव आहे. त्यामुळे या उत्सवावर प्रत्येकाचेच विशेष प्रेम आहे.
दिवाळीची सुरुवातच अंगणात उंच आकाशात आकाशकंदील लावून होते. आकाशकंदील, अंगणात रांगोळी, दारासमोर पणत्या लावून दिवाळीच्या उत्सवाला सुरुवात होते. पाऊस पाडून गेलेला असतो, थंडीची चाहूल लागत असते, शेतात नव पीक तयार झालेलं असतं. अशा वेळी शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. असं म्हणतात दिवाळी हा सण हजारो वर्षांपासून साजरा केला जात आहे. चौदा वर्षांचा वनवास संपवून श्रीरामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले. तो दिवस म्हणजेच दिवाळी. दिवाळी म्हणजे अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दिव्यांचा सण. दिव्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजर केला जातो. या दिवसांमध्ये केल्या जाणाऱ्या चकल्या, करंज्या, लाडू, चिवडा याचा आनंद काही औरच असतो. महाराष्ट्रात, तर याच दिवसांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची उजळणी करणारे मातीचे किल्ले बालगोपाळ करत असतात. त्यावर मातीची खेळणी मांडतात. त्यावर धान्य पेरतात.
दिवाळी सणाची सुरुवात आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीला म्हणजे वसुबारसला होते. यातूनच भारतीय कृषी परंपरा जपली जाते. या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा करतात. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे, या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. धनत्रयोदशीला सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो, असा समज आहे. आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन करून अ-लक्ष्मीला घराबाहेर घालून दिले जाते. आगामी वर्षभरात संपत्तीची बरकत असावी अशी मनोकामना या दिवशी मागितली जाते. “इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो” असे म्हणत बली प्रतिपदा आणि नवरा-बायकोचे नाते अतूट करणारा पडावा याच सनात साजरा होतो, तर भाऊ-बहिणीचं नातं अधिक घट्ट करणारा भाऊबीज हा सण सुद्धा याच दिवसात येतो.
हल्ली समाजव्यवस्था बिघडली आहे, असे म्हटले जाते. मुले आई-वडिलांपासून लांब गेली, भावा-भावांमध्ये वितुष्ट आले, भारतीय कुटुंब व्यवस्था लयास गेली, असे म्हटले जाते. खरं तर या आधुनिक काळात भारताची संपूर्ण मदार या युवा पिढीवर आहे. मात्र विभक्त कुटुंब पद्धतीचा परिणाम आजची युवा पिढी अधिक भोगताना दिसत आहे. ऐकून घ्यायला आई-वडील, चांगलं सांगणारे आज्जी-आजोबा, मस्ती करणारी भावंडं हे सगळीच लांब-लांब झाली आहेत. सगळं चकचकीत झालं आहे. मात्र त्यात मायेचा ओलावा आलेला दिसत नाही. त्यामुळे भारताचीही एखाद्या प्रगत देशाप्रमाणे रोबोटिक भावनाशून्य आयुष्य जगणाऱ्या पिढीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे का? असा प्रश्न पडत आहे. पण त्याच वेळी अशी नात्यातील गोडवा टिकवून ठेवणारे सण उत्सव जोपर्यंत भारतात सतत साजरे होत आहेत, तोपर्यंत तरी अशी कोणीतीही पिढी नक्की इथे घडणार नाही. उलट हेच सण आणि उत्सव पुन्हा एकदा बदललेली समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था पुन्हा प्रस्थापित करेल, असा विश्वास वाटतो आहे.