- कथा : रमेश तांबे
शिकारच झाली नाही, तर शाकाहारी प्राण्यांंची संख्या इतकी वाढेल की कोणाला गवत, झाडांंचा पालादेखील खायला मिळणार नाही. सारे जंगल संपून जाईल. हा समतोल राखण्यासाठी निसर्गानेच ही योजना केलेली आहे. त्यामुळे निसर्गाच्या या चक्रात, जंगलाच्या या नियमांत कोणालाही ढवळाढवळ करण्याची परवानगी नाही.
एका जंगलात एक हत्ती राहायचा. तो खूप चांगला होता. सगळ्यांना मदत करायचा. कधी कोणाला झाडाचा पाला काढून दे, कधी कोणासाठी पाणी आणून दे, कोण आजारी पडलं त्याची सेवा कर. या सगळ्या गोष्टी हत्ती अगदी मनःपूर्वक करायचा. सगळ्या जंगलामध्ये त्याचे खूप चांगले नाव झाले होते. पण वाघ, सिंह हे प्राण्यांना मारून खातात. याचं त्याला खूप वाईट वाटायचं! एक दिवस त्याने ठरवलं जर कोणी प्राण्यांना ठार मारत असेल, तर आपण त्यांना वाचवायचं!
मग तो रोज वाघ, सिंह, बिबळे, चित्ते, कोल्हे, लांडगे यांच्यावर लक्ष ठेवू लागला. एके ठिकाणी हत्तीने सशाला कोल्ह्यापासून वाचवले. पुढे चित्त्याच्या तावडीतून एका हरणाला सोडवले. आता हत्ती रोज पाच, सहा प्राण्यांचे जीव वाचू लागला. त्याला खूूप मोठे समाधान मिळत होते आणि खूप आनंदही मिळत होता. आपण दुसऱ्याच्या उपयोगी पडतो, याचा त्याला विशेष अभिमान वाटत होता.
आता हत्तीला असे वाटू लागले की, आपल्या एकट्याला एवढे मोठे काम जमणार नाही. आपण अजून काही हत्तींना तयार करू म्हणजे सगळे मिळून जंगलातले प्राणी वाचवता येतील! मग हत्तीने आपल्याच विचाराचे नऊ हत्ती गोळा केले. सगळ्या जणांना हत्तीचे हे अहिंसेचे विचार पटत होते. कोणी कोणाला मारू नये. कोणाचा जीव घेऊ नये. हे मत हत्तीने सगळ्यांना पटवून दिले आणि आता त्यांचा दहा जणांचा एक गट तयार झाला. ते साऱ्या जंगलभर फिरू लागले. तेव्हापासून बिबळे, चित्ते, लांडगे, कोल्ह्यांची उपासमार होऊ लागली. एकट्या हत्तीला वाघ, सिंह घाबरत नसत. मग दोन-तीन हत्ती मिळून त्यांच्यावर धावून जाऊ लागले. पकडलेल्या प्राण्यांना ते सोडवू लागले. सगळ्या शाकाहारी प्राण्यांना खूप आनंद होऊ लागला. त्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली.
दुसरीकडे दुबळे मांसाहारी, शिकारी प्राणी जसे की कोल्ह्या-लांडग्यांची उपासमार होऊ लागली. वाघ, चित्ते, बिबळ्यांना अजून अधून मधून शिकार मिळत होती. पण हत्तींचे काम जसे वेगाने सुरू झाले, तशी त्यांनाही आता शिकार मिळेनाशी झाली. आता सगळे शिकारी प्राणी हत्तींच्या या हल्ल्यांमुळे घाबरून गेले होते. रागावले होते. शेवटी त्यांनी ठरवले की, आपण आता जंगलचा राजा सिंहाकडेच जायचे. म्हणून सगळे प्राणी सिंह महाराजांकडे गेले आणि म्हणाले, “महाराज आम्हाला वाचवा. गेले कित्येक दिवस आम्हाला शिकार मिळाली नाही. शिकार पकडली की हत्ती धावत येतात. आमच्यावर हल्ला करतात. अशा वेळी शिकार सोडून द्यावी लागते. उपासमारीमुळे आम्हाला आता नवी शिकार पकडणेही शक्य होत नाही. आता काय करायचे? पोट कसे भरायचे? हा मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा आहे!”
सिंंह महाराजांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले आणि भली मोठी गर्जना करत म्हणाले, “हा तर अन्याय आहे. जगेल तो टिकेल हा जंगलचा नियम असून त्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार कुणालाही नाही.”
मग सिंह महाराजांनी जंगलची मोठी सभा बोलावली. सगळ्यांना आमंत्रित केले. हत्तींचा तो दहा जणांचा कळपही आला होता. त्यांना वाटले महाराज आपला सत्कार करतील. आपण जीव वाचवण्याचे काम करतो, चांगले काम करतो याचा महाराजांंना अभिमान वाटेल! पण सभा सुरू झाली, तेव्हा मात्र त्या दहा हत्तींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. त्यांंना काही कळेना, असे कसे झाले? आपण तर परोपकाराचे काम करतो. प्राण्यांचे जीव वाचवण्याचे काम करतो. मग आपण आरोपीच्या पिंजऱ्यात का?
तेव्हा महाराजांनी त्यांच्यावर आरोप ठेवला की, हत्तींचा हा दहा जणांचा कळप जंगलाच्या नियमाविरुद्ध वागला आहे. कारण जो सक्षम असेल तोच टिकेल. जो ताकदवान असेल तोच टिकेल हा जंगलचा नियम आहे. शिकारी प्राणी हे काही मजा म्हणून प्राण्यांना मारत नसतात. त्यांना भूक लागते. प्राण्यांचे मांस खाऊनच त्यांचे पोट भरते. जर हत्ती त्यांना शिकार करू देत नसतील, तर शिकारी प्राण्यांची उपासमार होईल. त्यांना जगणं अशक्य होईल आणि शिकारच झाली नाही, तर शाकाहारी प्राण्यांंची संख्या इतकी वाढेल की कोणाला गवत, झाडांंचा पालादेखील खायला मिळणार नाही. सारे जंगल संपून जाईल. हा समतोल राखण्यासाठी निसर्गानेच ही योजना केलेली आहे, की वनस्पतीवर जगणारे प्राणी आणि त्या प्राण्यांवर जगणारे शिकारी प्राणी. त्यामुळे निसर्गाच्या या चक्रात, जंगलच्या या नियमात कोणालाही ढवळाढवळ करण्याची परवानगी नाही. हत्तींना हा विचार पटला. आपली चूक त्यांना कळाली. त्यांनी सर्व शिकारी प्राण्यांची क्षमा मागितली.