- क्राइम : अॅड. रिया करंजकर
ॲग्रीमेंट म्हणून ५ लाख डिपॉझिट देऊनही श्रीधरला मात्र एकही दिवस त्या रूममध्ये राहता आले नव्हते. रूम सोडताना भाडेकरूला हेवी डिपॉझिट परत मिळतं. पण श्रीधर रूममध्येच राहायला गेला नाही, तर ते डिपॉझिट परत कसं मिळणार? हा प्रश्न त्याला आता पडलेला होता.
लोकं रोजगारासाठी गावाकडून शहराकडे वाटचाल करू लागली आहेत. त्यामुळे शहरांमध्ये लोकसंख्या वाढत चाललेली असून या औद्योगिक शहरांमध्ये लोकांना राहण्यासाठी जागा अपुऱ्या पडू लागलेल्या आहेत. म्हणून शहराजवळ असलेल्या उपनगरापर्यंत लोकांची वस्ती वाढत चाललेली आहे. जशी लोकांची परिस्थिती असेल त्याप्रमाणे लोक घरं विकत घेत आहेत, तर काही लोक हे भाड्याने राहत आहेत. भाडेकरू पूर्ण वर्षाचे भाडे देतात किंवा अमुक रक्कम डिपॉझिट ठेवून दर महिन्याने भाडे देतात. त्याचप्रमाणे काही घरमालक हेवी डिपॉझिट घेऊन आपला रूम भाड्याने देतात. त्यासाठी दोन्ही म्हणजे भाडेकरू आणि घरमालक यांच्यामध्ये ॲग्रीमेंट बनवली जाते आणि ॲग्रीमेंटचा कालावधी संपला की भाडेकरूला रूम खाली करावी लागते. उपनगरामध्ये भाडं कमी असल्याने किंवा डिपॉझिट कमी असल्याने लोकांचा कल हा उपनगरात जाऊ लागलेला आहे.
श्रीधर हा कळव्याला राहत होता. पण त्याला वसईला रूम पाहिजे होते. जेणेकरून त्याला आपल्या कामाच्या ठिकाणी जाणं सोपं होईल. म्हणून त्याने हेवी डिपॉझिट भरून रूम घेण्याचं ठरवलं. त्यासाठी तो ओळखीत असलेल्या एकाच्या आधारे रूमची शोधाशोध करू लागला. त्याला फर्नांडिस यांची रूम पसंत पडली व हेवी डिपॉझिट ५ लाखांसाठी ती रूम फर्नांडिस श्रीधरला भाड्याने देण्यास तयार झाले. ॲग्रीमेंट बनवून दोन वर्षांसाठी हेवी डिपॉझिट पाच लाख रुपये फर्नांडिस यांना दिले. पण ॲग्रीमेंट बनल्यानंतर ही श्रीधर याला त्या रूममध्ये राहता येईना. कारण फर्नांडिस यांनी “ॲग्रीमेंट बनवल्यानंतर ती रूम लगेच विकली गेली आहे”, असं श्रीधर यांना सांगितलं. “त्यामुळे मी तुम्हाला भाड्याने रूम देऊ शकत नाही” असं त्याने सांगितलं. पण ज्यावेळी श्रीधर याने ऑनलाइन चेक केलं, त्यावेळी ती रूम अजून विकली गेलेली नव्हती, हे स्पष्ट तिथे दिसत होतं. ज्यावेळी श्रीधर यांनी याबाबत फर्नांडिस यांना विचारलं, त्यावेळी प्रत्येक वेळी त्यांनी वेगवेगळी कारणे दिली. आज घराचे हे काम करायचे, आज दरवाजाचे काम करायचं, खिडकीचे काम करायचं… असं करून एक वर्ष फर्नांडिस यांनी ती रूम भाड्याने देण्यास श्रीधरला टाळाटाळ केली.
दोन वर्षांच्या ॲग्रीमेंटमध्ये एक वर्ष असंच अनेक कारणं दाखवण्यात गेलं. आता ॲग्रीमेंट प्रमाणे फक्त एक वर्ष बाकी राहिलेलं होतं. ॲग्रीमेंट म्हणून पाच लाख डिपॉझिट देऊनही श्रीधरला मात्र एकही दिवस त्या रूममध्ये राहता आले नव्हते किंवा त्या रूमचा उपभोग त्याला घेता आला नव्हता. श्रीधर रूम मालकाला म्हणजे फर्नांडिसला “आमची रक्कम परत करा” असं जेव्हा जेव्हा सांगायचा. त्यावेळी “मी आज करतो, उद्या करतो” अशी त्याच्याकडून उत्तर येऊ लागलेली होती. श्रीधरला एक वर्षानंतर कुठेतरी वाटू लागलं होतं की, आपली चांगल्या प्रकारे फसवणूक झालेली आहे कारण, ॲग्रीमेंट करून पाच लाख रुपये तर दिले. पण त्या रूममध्ये राहायला गेलो नाही, तर बाहेर पडताना जे त्याला हे हेवी डिपॉझिट परत मिळणार होतं ते आता कसं मिळणार? कारण ज्यावेळी डिपॉझिट देतो, त्यावेळी माणूस ती रूम सोडताना हेवी डिपॉझिट त्याला परत मिळतं. पण श्रीधर रूममध्येच राहायला गेला नाही, तर ते डिपॉझिट परत कसं मिळणार? हा प्रश्न त्याला आता पडलेला होता. कारण जोपर्यंत मालक डिपॉझिट पूर्ण देत नाही, तोपर्यंत भाडेकरू रूम सोडत नाही. पण इथे भाडोत्रीच राहायला गेला नाही, तर डिपॉझिट मिळणार कुठून? हा मुख्य प्रश्न होता. श्रीधरला नेमके आता काय करायचं सुचत नव्हतं. त्यांनी त्यावेळी आपल्या नातेवाइकांच्या जवळच्याच वकिलाची भेट घेतली व वकिलाने दिलेल्या सल्ल्यानुसार, “पहिल्यांदा पोलीस कम्प्लेंट नंतर नोटीस आणि नंतर तुम्ही ऑनलाइन जे पेमेंट केलेलं होतं त्यामार्फत केस फाइल करा”, असा योग्य सल्ला त्याला देण्यात आला आणि वकिलांना भेटल्यानंतर थोडा धीर त्याला आलेला होता की, तो कायदेशीर लढाई लढू शकत होता.
श्रीधर याने जेव्हा डिपॉझिटचे अमाऊंट दिले, ॲग्रीमेंट बनवली, त्याच वेळी चावी घ्यायला पाहिजे होती. ती चावी न घेतल्यामुळे आज तो आर्थिक संकटात अडकला होता आणि त्याची घोर फसवणूक झालेली होती.
(सत्यघटनेवर आधारित)